जमातवाद किंवा हिंदू-मुस्लिम संघर्षांचा प्रश्न हा भारतात किमान शंभर वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे. पण स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही राजकारण प्रचलित झाल्यावर या प्रश्नाची गुंतागुंत आणखी वाढली. एकीकडे थेट हिंदू-मुस्लीम दंगली, तर दुसरीकडे इतिहासाचे आकलन, धर्माची चिकित्सा, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची जडणघडण यांच्याभोवतीच हा प्रश्न फिरत राहिला. त्यामुळे जमातवादाची चर्चादेखील एकीकडे हिंसा आणि दंगलींची चर्चा आणि दुसरीकडे या प्रश्नाच्या स्वरूपाची वैचारिक चर्चा अशा दोन मुख्य मुद्दय़ांभोवती होत राहिली. अर्थात ही सगळी चर्चा सरळसरळ दोन भिन्न भूमिकांच्या स्वतंत्र आखाडय़ांमध्ये अंतर्गत आणि आपसात अशा दोन्ही प्रकारे होत राहिलेली दिसते.
मराठीत जमातवादाची गंभीर चर्चा स्वातंत्र्योतर काळात साठच्या दशकाच्या शेवटी किंवा खरे तर सत्तरच्या दशकात सुरू झाली असे म्हणता येईल. हमीद दलवाई यांचे लेखन हा त्याचा आरंभिबदू मानता येईल. त्यांच्याबरोबर, पाठोपाठ नरहर कुरूंदकर आणि अ. भि. शहा यांच्या लेखनात ही चर्चा पुढे नेण्याचा प्रयत्न झालेला आढळतो. साधारणपणे तेव्हापासूनच- म्हणजे सत्तरच्या दशकापासून थेट गेल्या दशकाच्या आरंभापर्यंत- म्हणजे उणीपुरी चार दशके वसंत पळशीकर यांनीदेखील सातत्याने या प्रश्नावर चिंतन आणि लेखन केले आहे. (खुलासा : हे वसंतराव पळशीकर आणि प्रस्तुत परीक्षणाचे लेखक यांच्यात फक्त आडनावसाधम्र्य आहे.) वसंत पळशीकर यांच्या जमातवादविषयक लेखनाचा एक संकलित संग्रह भा. ल. भोळे यांनी यापूर्वी (१९९७ मध्ये) संपादित केला असून आता अलीकडे आणखी एक संग्रह किशोर बेडकिहाळ यांनी ‘जिहाद, गुलाल आणि सारीपाट’ या नावाने संपादित केला आहे. (सत्तरच्या दशकात या हिंदू-मुस्लीम प्रश्नाला जमातवाद म्हणण्याऐवजी ‘जातीयवाद’ असे बऱ्याच वेळा म्हटले गेले आणि वसंतराव पळशीकर आणि किशोर बेडकिहाळ हेदेखील तोच शब्दप्रयोग करतात. म्हणजे समस्या काय आहे, आणि समस्येचे वर्णन कसे करायचे, हे दोन्ही मुद्दे अनिर्णीत राहिले आहेत हे यावरून स्पष्ट व्हायला हरकत नाही.)
भोळे संपादित लेखसंग्रहात पळशीकरांच्या १९९०-९२ पर्यंतच्या लेखनाचा समावेश आहे, तर आता या नव्या संग्रहात प्रामुख्याने १९९० पासून २००३-०४ पर्यंतच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. हे लेखन म्हणजे मुख्यत: पळशीकर यांनी जमातवादाच्या काही इतर विवेचनांना दिलेला प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद चार प्रकारच्या लिखाणाला आहे. एक म्हणजे वर उल्लेख केलेल्या तीन मराठी विचारवंतांना पळशीकर प्रतिसाद देतात (शहा, कुरूंदकर आणि दलवाई). पळशीकरांच्या प्रतिसादाचं दुसरं लक्ष्य आहे- गांधींची खिलाफत चळवळीबद्दलची भूमिका (आणि तिची बी. आर. नंदा यांनी केलेली चिकित्सा); तर तिसरं लक्ष्य आहे- हिंदू जमातवादाचे एक महत्त्वाचे टीकाकार फक्रूद्दीन बेन्नूर यांचे विवेचन आणि सरतेशेवटी हिंदुत्ववादी विचारांच्या चौकटीतून हिंदू-मुस्लीम प्रश्नाकडे पाहणारे स. ह. देशपांडे (आणि एक कट्टर रा. स्व. संघनिष्ठ लेखक मिलिंद ओक) यांचे लिखाण. यातील पहिल्या आणि दुसऱ्या प्रतिसादाचा विषय असलेलं मूळ लिखाण बऱ्याच आधी प्रसिद्ध झालेलं असलं तरी पळशीकर यांचं प्रतिसादात्मक लेखन मात्र नव्वदीच्या दशकात झालं आहे. मात्र, या संग्रहातील अनेक लेख आज सहजगत्या उपलब्ध नसलेल्या नियतकालिकांमध्ये विखुरलेले आहेत आणि म्हणूनच ते निवडून व एकत्र प्रसिद्ध करून संपादक किशोर बेडकिहाळांनी अभ्यासकांची मोठी सोय केली आहे.
शहा, कुरूंदकर आणि दलवाई यांच्या हिंदू-मुस्लीम प्रश्नांच्या आकलनाचा एकेकाळी मराठी विचारविश्वावर मोठा प्रभाव होता. पण १९९० नंतरच्या काळात त्यांच्या लेखनाची चिकित्सक चर्चा सुरू झाली. त्यांच्या मांडणीमध्ये एकीकडे इस्लाम व मुस्लीम समाज यांविषयीच्या त्यांच्या आकलनाचा अडथळा येतो आणि दुसरीकडे त्यांच्या काहीशा अतिऔपचारिक उदारमतवादी आणि बुद्धिवादी भूमिकेमुळे मर्यादा पडतात. त्यामुळे पळशीकर या दिग्गजांच्या विश्लेषणाच्या मर्यादा दाखवतात. नव्वदच्या दशकात जेव्हा हिंदुत्वाचा नव्याने विस्तार होऊ लागला तेव्हा हिंदुत्ववादी भूमिका कशी बरोबर आहे, हे सांगण्यासाठी ‘पुरोगामी’ मानल्या गेलेल्या शहा-कुरूंदकर-दलवाई यांच्यासारख्यांचे दाखले देण्याची रीत उदयाला येत होती. एकापरीने विचारांच्या लढाईत ‘पुरोगामी’ गटांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांच्याच किल्ल्यातील दारूगोळा त्यांच्यावर उलटवण्याचा हा प्रकार होता. तो शक्य झाला, कारण हिंदुत्वाचा प्रतिकार करताना आणि मुस्लीम प्रश्नांचे आकलन करून घेताना हिंदुत्वाच्या विरोधकांनी ढिसाळपणा दाखवला होता. ही पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर नव्वदच्या दशकात नव्याने शहा-कुरूंदकर-दलवाई यांची चिकित्सा का सुरू झाली ते समजून घेता येते. ही जी दुहेरी वैचारिक लढाई होती- एकीकडे हिंदुत्ववादी विचारांशी आणि दुसरीकडे पुरोगामी वर्तुळातील चुकांशी किंवा मर्यादांशी- तिचा एक भाग म्हणून वसंत पळशीकर यांचे हे प्रतिवादात्मक लेखन झालेले आहे.
मात्र, त्याबरोबरच हिंदुत्वाची अधिकाधिक अचूक चिकित्सा व्हावी आणि मुस्लीम प्रश्नांचे अधिकाधिक संतुलित आकलन केले जावे, हा पळशीकरांचा आग्रह राहिला आणि त्यामुळेच हिंदुत्वावर जोरदार टीका करणाऱ्या प्रा. बेन्नूर यांच्या मांडणीत असलेल्या कच्च्या दुव्यांचाही ते परामर्श घेतात. आता दोन दशकांनंतर हिंदुत्वाचा रोख बदललेला आहे आणि त्याचा प्रतिकार करण्याच्या नव्या वैचारिक व्यूहांची गरज आहे. त्यामुळे एकापरीने पळशीकर जे सर्व तपशील मांडतात आणि इतरांच्या लेखनाची जी चिकित्सा करतात त्याचे समकालीन संदर्भ क्षीण झाले आहेत. आणि तरीही मुख्यत: एका टप्प्यावरील सकस चर्चा म्हणून त्याचे महत्त्व आहे. पण या लिखाणाचे आणखी एक महत्त्व राहतेच. जमातवाद आणि जमातवादविरोधी भूमिका अशा दोन स्पष्टपणे भिन्न आणि विरोधी विचारविश्वांची जर आपण कल्पना केली तर जमातवादविरोधी विचारविश्व हे अद्यापि भोंगळपणा किंवा अतिउत्साही, पण कच्चा आणि फारसा जनाधार नसलेला धडाकेबाजपणा यांच्या विळख्यात मग्न असलेले दिसते. त्यामुळे इतिहास, तात्त्विक बठक आणि व्यवहार या तिन्हीच्या दृष्टीने अधिक स्वीकारार्ह अशा मांडणीचा शोध घेणे कसे आवश्यक आहे याची आठवण करून देण्यासाठी पळशीकरांच्या या लिखाणाचे महत्त्व उरतेच.
खिलाफतविषयी महात्मा गांधींची भूमिका हा एक वादाचा विषय राहिला आहे. गांधींनी खिलाफतीला पािठबा का दिला असावा याची पळशीकर संतुलित चर्चा करतात. मात्र, गांधींच्या त्या निर्णयामुळे त्यांच्या धर्मनिरपेक्षतेविषयीच्या मौलिक भूमिकेला काही धक्का पोहोचतो का, या जटिल प्रश्नाचा न्यायनिवाडा आज आपण करू शकत नाही हे खरेच आहे. त्यामुळे अशा ‘निवाडा’ करण्याच्या भूमिकेपेक्षा पळशीकर स्वीकारतात ती ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्याची रीत अधिक उपयुक्त आहे असे त्याविषयीचा प्रदीर्घ लेख वाचल्यावर जाणवते. अर्थात जिहाद आणि गुलालाचा सारीपाट मांडून आपापल्या संकुचित भूमिका लोकप्रिय करण्याची स्पर्धा करणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम संघटनांना इतिहासातून अशी एकमेकांना आणि इतिहासाला झोडपण्याची साधने हवी असतात आणि खिलाफत हे असेच एक साधन राहिले आहे. या लेखसंग्रहाचे संपादक किशोर बेडकिहाळ यांनी यासंदर्भाची चर्चा प्रस्तावनेत केली असती तर हा इतका भलामोठा लेख या लेखसंग्रहात का आहे, हे वाचकांना समजणे सोपे झाले असते.
बेडकिहाळ म्हणतात त्याप्रमाणे- पळशीकर यांची हिंदू-मुस्लीम जातीयवादाविषयीची भूमिका सरसकट जशीच्या तशी मान्य होईलच असे नाही. (पण प्रस्तावनेत स्वत: बेडकिहाळ अशा मतभेदांचा पुरेशा स्पष्टपणे उल्लेख करीत नाहीत.) तरीही तीन कारणांसाठी हा लेखसंग्रह महत्त्वाचा ठरतो. एक म्हणजे लोकशाहीच्या वाटचालीत ‘जमातवादी’ राजकारण घडणे अपरिहार्य आहे याची स्पष्ट जाणीव या लेखांमध्ये ध्वनित होते आणि त्यामुळे ‘सेक्युलर’ गटांचे जमातवादाचे आकलन मुदलातच कसे तकलादू आहे हे नजरेत भरते. दुसरे म्हणजे गांधी आणि नेहरूंच्या कर्तबगारीमुळे किंवा पुण्याईमुळे स्वातंत्र्यानंतर काही दशके जमातवादाचा ‘प्रश्न’ काहीसा पुढे ढकलला गेला, हे सूचित होते. म्हणजे आज ज्यांच्या धर्मविषयक दृष्टीला बदनाम केले जाते त्यांच्याचमुळे स्वातंत्र्यानंतर लोकशाहीमधील हा विपर्यास थोडा लांबणीवर पडला आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याच गांधी-नेहरू यांच्या दृष्टीकडे परत जाणे आवश्यक आहे, हे अधोरेखित होते. तिसरे आणि सर्वात कळीचे कारण असे की, १९९० नंतरच्या हिंदुत्वाची चर्चा करताना पळशीकर म्हणतात त्याप्रमाणे त्या हिंदुत्वाचे स्वरूप उच्च जातीकेंद्रित न राहता ‘बहुजन’केंद्रित झाले, या वास्तवाकडे हिंदुत्वाच्या विरोधकांनी पुरेसे गांभीर्याने पाहिले नाही की त्याचे विश्लेषण केले नाही- या त्रुटीची जाणीव हा लेखसंग्रह वाचताना झाल्याशिवाय राहत नाही.
मराठीतील जमातवादाची चिकित्सा एका स्वनिर्मित वैचारिक परिप्रेक्ष्यामध्ये अडकून राहते आणि त्यामुळे ती नेहमीच सद्धान्तिकदृष्टय़ा अपुरी आणि राजकीय व्यवहार म्हणून निरुपयोगी राहिली आहे. अर्थातच पळशीकर किंवा बेडकिहाळ हा मुद्दा इतक्या रोखठोकपणे मांडत नाहीत. पण हे लेख आजच्या समकालीन संदर्भात वाचायला घेतले
तर त्यातून हा काहीसा अस्वस्थ करणारा निष्कर्ष
हाती येतो.
‘जिहाद, गुलाल आणि सारीपाट’-
हिंदू-मुस्लीम जातीयवादावरील वसंत पळशीकर यांचे निवडक लेख, संपादन- किशोर बेडकिहाळ,
लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई,
पृष्ठे -२९८, मूल्य- ३५० रुपये
सुहास पळशीकर

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
Narendra Modi on elon musk
“पैसा कोणाचाही लागो, घाम माझ्या देशातील…”, एलॉन मस्क भारतात येण्याबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार