अलीकडेच पार पडलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतील महाअंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात लेखनासाठी जीवनानुभवाचे आणि जीवनमूल्यांचे असलेले महत्त्व, लिहिताना पाळावयाची पथ्ये, नाटकाचे व्याकरण आदी विषयांवर केलेल्या मुक्तचिंतनाचा संपादित अंश..

दर दहा वर्षांनी नाटक बदलते, कारण समाज आणि बोलण्याची भाषा बदलते. विषय, अग्रक्रम बदलतात. त्यामुळे नाटक बदलत जाते. कारण बदल केले नाहीत तर नाटकाला शिळेपण, साचलेपण येते. संगीतकाराला, नृत्य करणाऱ्यांनाही रोजचा रियाज करावा लागतो. लेखकाचा रियाज दिसत नाही, परंतु लेखकालाही रियाज करावा लागतो. त्यासाठी त्याला खूप वाचावे लागते. त्याला विविध कलांची नुसती ओळख करून घेऊन चालत नाही. विविध कलांचा आस्वाद त्याला घ्यावा लागतो. त्याने प्रवास केलेला असावा लागतो, पण मुख्य म्हणजे त्याने जीवन जगलेले असावे लागते. कारण जगणे हे त्याचे मूलद्रव्य आहे. मनाची समृद्धी वाढली तर ती लेखनात दिसते.

काही माणसे सांगतात, मी व्यावसायिक लेखक आहे व मी रोज दहा ते सहा या वेळेत लिहितो किंवा ही नवीन मुले इकडे मुंबईला येतात आणि मालिकांसाठी लिहितात. ती मला सांगतात, ‘सर, आम्ही स्वत:ला याच्यात झोकून दिले आहे. हेच करणार, यातच आयुष्य घालवणार.’ मी त्यांना सांगतो की, तू जर दहा ते दहा लिहीत राहिलास तर घरी जाऊन रात्री झोपणार. कमी लिहिले तरी चालते. पण मालिकेत लिहिणाऱ्यांना कमी लिहिलेले चालत नाही, कारण तो ‘जॉब’ आहे. काही सुचले नाही तर किंवा वाटले नाही तर नाही लिहिणार मी. पण म्हणून काही माझे काम थांबलेले नसते. आपण काहीतरी करतच असतो. आणि त्यामुळे आपल्या मनाची समृद्धी वाढतच असते आणि ती जर वाढली तर आपल्या लेखनात दिसते नाहीतर दिसत नाही. त्याच्यामुळे मी जीवन वाहून टाकले, उधळून टाकले अशा सुंदर, गोड शब्दात माणसे आपलीच फसगत करून घेतात, माध्यमाची फसगत करून घेतात आणि वयाच्या तिशीतच माध्यम त्यांच्या हातातून निसटून गेलेले असते. पुनरावृत्ती होऊ लागते. यश, भरपूर यश, पैसा मिळतो. किती मिळतो याचा अंदाजच नाही. आपल्याकडे यशाच्या कल्पनाही भाबडय़ा, विचित्र आहेत. नागपूरला सगळ्यात मोठा डॉक्टर कोण तर ज्याच्याकडे मर्सिडिज आहे तो! आता ज्ञानाचा व मर्सिडिजचा काही संबंध आहे का, पण तो आपण लावतो. मोठा लेखककोण तर जो पेडर रोडला राहतो तो. हे एक ढोबळ उदाहरण झाले.

लेखकालाही हे लक्षात ठेवावे लागते की, हे सगळे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या हातून आयुष्य, जगणे निसटलेले असते. आपले मूलद्रव्य हातातून नाहीसे झालेले असते आणि जर मूलद्रव्य हातून गेले तर मी काय लिहिणार? जगणे महत्त्वाचे ना? त्याच्यातून आपल्याला वेळ मिळाला तर आपण लिहावे. एक उदाहरण मी मागेपण सांगितले होते. मुले बाहेर खेळत असतात. बेभान खेळतात, कशाचीही शुद्ध नसते. अंधार पडला तरी खेळत असतात. आया त्यांना घरात ओढून आणतात व अभ्यासाला बसवितात. तसे हे आहे. आपण जगत राहावे. केव्हातरी कोणीतरी ओढून आणले तर लिहावे. लेखकाचा अग्रक्रम लिहिणे असतो असे मला वाटत नाही. हे जरा ऐकायला विचित्र वाटेल, विरोधाभास वाटेल. पण अग्रक्रम हा जाणीवपूर्वक आनंदाने जगणे यात आहे. हे करत असताना तुम्ही जर जीवन सर्वागाने अनुभवायला हवे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपोआपच संगीत, चित्रकला किंवा अन्य कलांकडे, माणसांकडे वळता. ही जर समृद्धी आहे आणि ती जर असली तर आपल्या लिखाणाला आवश्यक आहे ते मूलद्रव्य मिळण्याची शक्यता असते.

काही अटी लेखकाने स्वत:वर घालून घाव्यात. मला या गोष्टी खूप हळूहळू कळत गेल्या. कारण नाटक लिहिणे हा काही माझा अग्रक्रम नव्हता. कधीतरी लिहायचो, कधी नाही. जेव्हा वाटले तेव्हाच लिहिले. संगीत व तत्त्वज्ञान हा माझा अग्रक्रम होता व आजही आहे. मला लेखनात झोकून द्यायचे नव्हते. जगण्यातच मला एवढा आनंद होता की तोच माझ्यासाठी अग्रक्रम होता. पण आता लिहायचे आहे तर त्याचे व्याकरण मला समजून घेतले पाहिजे, ते नीट करता आले पाहिजे ही समज पुढे येत गेली.

मी फक्त अनुभव सांगतो आहे, मार्गदर्शन करत नाहीये. माझ्यापुरते ते बरोबर आहे. तुमच्यासाठी असेलच असे नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने वेगळे शोध लागतील. मग तुमच्या हाती ऐवज येईल तो तितकाच चांगला असेल. प्रत्येकाचा प्रवास त्याच्या प्रवृत्तीनुसार व स्वभावानुसारच होतो. केसरबाईंची चार मिनिटांची रेकॉर्ड ऐकल्यावर कळते की, त्यातील ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या आल्या की झाले. त्या सगळे दाखवत बसत नाहीत. त्यांनी सुरुवातीला जे विराम, मोकळ्या जागा घेतल्या आहेत त्या बोलक्या आहेत. श्वास संपला, म्हणून त्या थांबत नाहीत. कुमारजींच्या गाण्यातही या जागा दिसतील. थोडय़ा अवधीत खूप काही सांगण्याच्यापाठी विचार व तपश्चर्या असते.  त्यासाठी खूप काम करावे लागते. खूप गोष्टी शिकाव्या लागतात.

प्रत्येक व्यक्ती काय जगला, किती जगला, जगण्याची किती किंमत दिली आहे त्यावर त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व तयार होते. याचा कलाकृतीवर नक्की परिणाम होतो.

नाटकाच्या व्याकरणात वेळेचा व शब्दाचा अवकाश येतो. लोक संवाद बोलतात, त्यात किती विराम द्यायचे हे कळले पाहिजे. केव्हा संवाद पूर्ण म्हटला जाईल, केव्हा अर्धवट टाकला जाईल याचे गणित कळले पाहिजे. श्रवणावकाश आणि दृश्य अवकाश हे दोन येथे समजून घ्यावे लागतील. महाभारत ९० मिनिटांत दाखवायचे आहे, दाखवू शकतो, पण त्यासाठी ‘सिलेक्टिव्ह’ असावे लागते. महत्त्वाचे निवडावे लागते. १२० मिनिटांची एकांकिका ९० मिनिटांची करायची आहे. आपण बसतो व कापाकापी करतो. ३० मिनिटे कापतो. अनावश्यक भाग कापतो आणि मग लक्षात येते की, खूप काही अनावश्यक लिहिले आहे. आपण किती अनावश्यक गोष्टी करतो याचा अंदाज आपल्याला नसतो.  मला त्याचा अंदाज कसा आला तर आमच्या कॉलनीतील मुले नाटक करायची. नाटकात रंगमंचावर गालिचा, बुद्धाची मूर्ती, तसबिरी, टेलिफोन असे बरेच सामान होते. ते इतके होते की, नटांना रंगमंचावर फिरताही येत नव्हते. हे कशासाठी, असे विचारले तर मध्यमवर्गीय घरात हे सगळे असते म्हणून ठेवले, असे उत्तर त्यांनी दिले. पण हे अनावश्यक सामान मी त्यांना काढायला लावले. घरी आल्यानंतर माझ्या मनाला मी विचारले की, त्या मुलांना अनावश्यक सामान काढायला लावले. माझ्या लेखनातही अशा कितीतरी अनावश्यक गोष्टी असतील. त्याही काढायला पाहिजेत असे ठरविले आणि मी माझ्या लेखनातूनही अशा अनावश्यक गोष्टी काढायला लागलो आणि अनेक अनावश्यक वाक्ये मिळत गेली. नाटकात जे जे अनावश्यक असते, त्यामुळे नाटक असुंदर होते.

‘व्हॉटेवर इज अननेसेसरी इज अनब्यूटिफुल इन थिएटर.’ अनावश्यक नाटक कापता कापता जे नाटक तयार होते, त्यातून तुम्हाला जे विराम, ज्या  जागा मिळतात त्यात अर्थ ठासून भरलेला असतो. ते पोहोचविण्याची जबाबदारी नटाची असते. नाटक लिहिताना हे लक्षात येते की, सगळी जबाबदारी आपण नटावर टाकतो. रंगभूमीचा राजा लेखक नाही तर नट आहे असे मी मानतो. कारण मी काहीही लिहिले तरी तो येऊन जे करेल ते नाटक. नाटक लिहीत असताना मी विराम असे निर्माण केले पाहिजेत, असे लिहिले पाहिजे की, ज्यामुळे लेखकाला अभिप्रेत असलेल्या अर्थापासून नटाला दूर जाता येणार नाही. त्यासाठी आधीचे संवाद काळजीपूर्वक लिहावे. कधी कधी मला जे म्हणायचे आहे त्यापासून ती माणसे दूर जातातही, पण ठीक आहे, आपल्याला नवा अर्थ कळतो. संहितेला नवीन परिमाण मिळते. ते नाटक माझे नसेल राहिलेले, पण ते नाटक आहे. कदाचित तुम्ही जे लिहिले त्यापेक्षा ते बरे होत असेल, हीच नाटकाची गंमत आहे. या आणि अशा काही मूलभूत अटी समोर ठेवल्या तर चांगला ऐवज असलेल्या एकांकिका आपण लिहू शकतो. नंतर एखाद्याला मोठे नाटक लिहावेसे वाटले तर जरूर लिहावे, पण एकांकिका मोठे आव्हान आहे. त्यासाठी जगातील सगळ्या मोठय़ा, महत्त्वाच्या एकांकिका वाचा. दीर्घ अंकाची नाटके जर्मनमध्ये आहेत. अ‍ॅनेस्की, बेकेटची नाटके तुम्ही जरूर वाचा. तुमच्या लक्षात येईल की, ५० ते ६० मिनिटांच्या अवधीत किती भरीव सांगता येते. त्याचा परिणाम माझ्यावर बराच झाला.

‘पार्टी’, ‘आत्मकथा’, ‘रक्तपुष्प’ ही नाटके पावणेदोन तास चालतात. ही सगळी नाटके एकांकच आहेत. त्यांना कोणी एकांकिका म्हणतच नाही, पण त्या एकांकिका आहेत. आपण एकांकिकेचा अर्थ चुकीचा घेतो. प्राथमिक दर्जाचे लेखन म्हणून, अ‍ॅप्रेंटिसशिप करणाऱ्यांचे लेखन असे आपण म्हणतो, पण आता ते तसे राहिलेले नाही. हा आव्हानात्मक लेखन प्रकार आहे. पण लेखक सजग हवा. त्याला मोठा ऐवज देण्याचा आत्मविश्वास हवा. पण आजकाल लिखाण असे झाले आहे की, एखादी कथा घेतात आणि दृश्य स्वरूपात समोर आणतात. लघुकथा घेऊन येतात आणि याचे नाटक करा सांगतात. मी म्हणतो, लघुकथा आहे तर ती तशीच राहू दे, त्याचे नाटक कशाला करायचे? नाटक दिसावे लागते, असावे लागते. नाहीतर ते ‘कॉमिक बुक’सारखे, चित्रे काढल्यासारखे होते, असे होऊ नये. या सगळ्या प्राथमिक गोष्टी आहेत.

आम्ही एकांकिका करत होतो तेव्हा आम्हाला कोण पारितोषिके देत होते? कुठे लिहूनही येत नव्हते. विजयाबाई माझ्या एकांकिका करायच्या. एका वर्तमानपत्रात चार ओळी छापून यायच्या. पण शिकणे हाच आमचा अग्रक्रम होता. आपल्याला नक्की काय व्हायचे आहे ते ठरवा. लेखक, नाटय़धर्मी ज्यांना व्हायचे आहे त्यांनी माझ्या बोलण्याचा विचार करावा.

अनेक पाश्चात्त्य लेखक सकाळी १० ते ६ या वेळेत लिहितात. सॉमरसेट मॉम असेच खूप लेखन करणारे म्हणून माहिती आहेत. त्यांना स्वत:ला माहिती होते, आपण पहिल्या दर्जाचे लेखक नाही. पण दुसऱ्या दर्जाच्या पहिल्या रांगेत बसणारा मी आहे, असे ते म्हणत. स्वत:चा अनुभव वाढवीत राहण्याची प्रक्रिया त्यांनी कधी थांबविली नाही. ते अखंड वाचन करत. प्रत्येक वेळी प्रवासात दोन पेटय़ा भरून पुस्तके त्यांच्याकडे असायची. दुसऱ्या दर्जाचा लेखक मोठे काम करू शकणार नाही, असे काही नसते. व्यावसायिक रंगभूमीवर आपल्याकडेही खूप चांगली नाटके लिहिली गेली. व्यावसायिक लेखन करणे हेही एक आव्हान आहे, त्यालाही मेहनत लागते, ते सोपे नाही. कामाची तसेच शारीरिक शिस्तही लागते. माझ्या ओळखीचे लेखक सकाळी टेबलावर बसतात, स्वत:चे लेखन सुचले नाही तर भाषांतर करतात, पण काहीतरी काम करतात.

मंगेश पाडगावकर यांच्याकडे पाहा ना. या वयात त्यांनी किती काम केले! कबीर, मीरा मराठीत आणले. बायबल आणले. लेखणी जिवंत ठेवण्याचे काम ती माणसे करत असतात, त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. मी स्वत:बद्दल बोललो की, मी आनंदासाठीच लिहितो. मला जेव्हा नाटय़लेखनात आनंद वाटेनासा झाला तेव्हा मी लेख लिहू लागलो. नंतर कळले की, त्यात मला जास्त आनंद मिळाला. कोणी आपली उंची कशी वाढवावी हे सांगण्याचा अधिकार मला नाही. अनेक व्यावसायिक लेखक मी पाहिले की जे खूप मोठय़ा उंचीवर पोहोचले आहेत.

ग्रॅहम ग्रीन यांना खरे तर नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते, पण त्यांच्याकडून ते निसटले. पण तो मोठा व्यावसायिकच लेखक होता. त्याची उपजीविका लेखनावर होती. एक लक्षात घेतले पाहिजे की, यातील अनेक लोकांनी आधी खूप विपन्नावस्था पाहिली आहे. वयाच्या पन्नाशीपर्यंत अनेक मंडळी अशा अवस्थेत होती. व्यावसायिक म्हणजे फक्त आर्थिक यश असे जर कोणी डोळ्यासमोर ठेवले असेल तर त्याला सारखेच पाणीच घालावे लागेल. लोकांना खूश करणारे लेखन करावे लागेल. त्यांच्यात क्षमता नसते असे नाही, पण एकदा निर्णय घेतला की त्याप्रमाणे त्यांना वागावे लागते.

‘प्रोफेशनल’ आणि ‘कमर्शियल’ हे काही मला कळत नाही आपण दोघांसाठी व्यावसायिक हाच शब्द वापरतो. आपले वाङ्मय विक्रीयोग्य करणारा लेखक आणि शिस्तीने लिहिणारा लेखक यात फरक आहे. तो पाश्चात्त्य लेखकांमध्ये दिसतो तेवढा आपल्याकडे ठळकपणे दिसत नाही. पैसे मिळाले नाहीत तरी चालतील, पण मी हे काम करत राहावे, असे त्यांना वाटते. हेन्री मिलर वयाच्या चाळिशीपर्यंत एका तळघरात राहात होता, घराला ओल आलेली, थंडीत घालायला स्वेटर नाही, न्यूयॉर्कभर पायी चालायचा, पोटात काही नाही. असे दिवस काढले. पण तो स्वत:ला प्रोफेशनल रायटर म्हणवतो. तो खरे तर वाङ्मयधर्मी समजला पाहिजे. पुढे त्यांना यश मिळाले ही गोष्ट वेगळी. त्यामुळे असे निश्चित कप्पे पाडता येत नाहीत.
 शब्दांकन- शेखर जोशी