|| अनिल गांधी

‘सेमी प्रायव्हेट रूम’ ही डॉ. अमित बिडवे यांची कादंबरी मानवी जीवनाचा सखोल वेध घेणारी आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी डॉक्टरला इस्पितळात राहून चोवीस तास डय़ुटी करावी लागते. साहजिकच वरिष्ठ डॉक्टर, सहकारी, परिचारिका, मामा-मावश्या आणि विविध व्याधींनी ग्रासलेले रुग्ण यांचा जवळून अनुभव येतो. त्यात डॉ. बिडवे यांच्यासारखा सूक्ष्म निरीक्षण, बुद्धिमत्ता लाभलेला लेखक भाषेवरच्या प्रभुत्वाने साहित्यनिर्मिती करतो तेव्हा त्याची कादंबरी वाचनीय होतेच.

लेखकाने यात निवडलेली मुख्य पात्रे- ‘नाना सुखात्मे’ (एक सेवानिवृत्त आयकर अधिकारी) आणि ‘होशांग वीरकर’ (एक निष्पाप बालक) यांचा एका सेमी प्रायव्हेट रूममध्ये संपर्क येतो. सुखात्मे म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला एक तर्कट म्हातारा, तर होशांग हा रक्ताच्या कर्करोगासारख्या दुर्धर रोगाने ग्रासलेलं कोमल फुलपाखरू. ‘मला प्रायव्हेट रूमच पाहिजे,’ असा सुरुवातीला सुखात्मेंचा हट्ट. डॉक्टर, नर्सेस, मामा-मावशी आणि स्वत:ची बापडी बायको यांच्यावर सतत तोंडसुख घेण्यात आनंद माणणारी व्यक्ती. किरकोळ वेदनेने इस्पितळ डोक्यावर घेतात. याउलट होशांग हा निरागस मुलगा. त्याच्या आजार आणि उपचारांमुळे होणाऱ्या मरणप्राय यातना कशा सहन करतो, याचे चित्र फारच चांगले रेखाटले आहे. त्याच्या या यातना, वेदनादायी उपचार व अंध:कारमय भविष्य कळल्याने सुखात्मे हेलावून जातात. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात हळूहळू कणव येऊ लागते, त्यांच्या अंत:करणाला पाझर फुटतो.

जेव्हा मेंदूतील रक्तस्रावाने होशांग या जगाचा निरोप घेतो तेव्हा ते पूर्णपणे उन्मळून पडतात. आपल्या स्वत:च्या आयुष्यात आपली पत्नी, एकुलता एक मुलगा यांच्याशी आपण कसे कठोर वागलो, याची त्यांना जाणीव होते. मुलाला लठ्ठ पगार मिळत असला तरी त्याने वडिलांच्या सल्ल्याने खर्च करावा, त्यांच्याच पसंतीच्या मुलीशी लग्न करावे हा त्यांचा अट्टहास पूर्ण न झाल्याने मुलाशी वैर, बोलणे बंद. अमेरिकेला त्याच्याकडे जाणे, नातवंडांचे लाड करणे तर दूरच; त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंधही तोडले. मात्र होशांगच्या मृत्यूने त्यांना आपल्या विचित्र वागण्याची उपरती होऊन अमेरिकेला जाण्यास ते आतूर होतात. तेथे रमतात.

या मुख्य पार्श्वभूमीवर इस्पितळातील परिचारिका, मामा, मावशा यांच्यातले हेवेदावे, कुचाळक्या चांगल्या चित्रित केल्या आहेत. या रेसिडेन्सीच्या काळात डॉक्टर-डॉक्टर, परिचारिका यांचा जवळून दीर्घ संपर्क येतो. त्यातून प्रेम प्रकरणे रंगतात. काही सफल, तर काही विफल होतात. यावरही कादंबरीत प्रकाश टाकला गेला आहे.

बॉस लोकांपैकी चारू प्रधान आणि डॉ. मेघना या पती-पत्नीमध्ये मुलाच्या अपघाती मृत्यूने दरी निर्माण होते. त्याचे मार्मिक विश्लेषण केले आहे. मेघना कॉन्फरन्ससाठी परगावी गेली असताना मुलगा रात्री खेळणी मांडून बसलेला. चारूने अर्धा पेग रिचवलेला असताना इच्छा नसतानाही बालहट्टापायी मुलाला मोटरसायकलवरून आइस्क्रीम खाण्यासाठी चारू घेऊन जातो. परतीच्या मार्गावर बेफाम ट्रकच्या धडकेने मुलगा जागेवरच दगावतो, तर चारू मेंदूच्या माराने बेशुद्ध होतो. परगावहून परतल्यावर मेघना कोलमडून जाते. चारूचीच सर्वस्वी चूक आहे असे गृहीत धरून मेघना चारूला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून विभक्त राहण्याचा निश्चय अमलात आणते.

मेघना ही बाल कर्करोगविषयक तज्ज्ञ म्हणून कार्यरत असते. होशांगवर उपचाराची जबाबदारी तिने घेतलेली असते. होशांग अतिशय लाघवी मुलगा असल्याने मेघनासकट इस्पितळातील सर्व स्टाफचा त्याच्यावर जीव जडलेला असतो. मेघनाला एक दिवस अतिदूरच्या इस्पितळामध्ये जावे लागते. त्याच वेळी दुर्दैवाने होशांगच्या मेंदूत रक्तस्राव होतो. अतिदक्षता विभागात शर्थीचे प्रयत्न करूनही डॉक्टर होशांगला वाचवू शकत नाहीत. होशांगला आपली जास्त गरज असताना आपण नेमके उपलब्ध नव्हतो, याचे मेघनाला शल्य वाटू लागते. ती स्वत:ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करते. ती अशी उन्मळून पडल्याने चारू तिची समजूत घालतो, ‘तू हजर असतीस तरीही प्राप्त परिस्थितीत होशांग वाचला नसता; निष्कारण स्वत:ला दोष देऊ नकोस.’ तेव्हा मेघनाच्या लक्षात येते, की आपण मात्र मुलाच्या मृत्यूबद्दल चारूला दोषी ठरवले, कठोर शिक्षा सुनावली. चारूनेही स्वत:चा मुलगा गमावला होता. त्याचे दु:ख तिच्यापेक्षा नक्कीच कमी नव्हते. शिवाय तो न केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा भोगत होता. ‘देर आये पर दुरुस्त आये’ या जाणिवेने मेघनाला पश्चात्ताप होतो आणि पुन्हा चारू मेघनाचे मिलन! त्यानंतर अनाथ मुलांचे नाथ होण्याचा निर्णय घेऊन एकप्रकारे मुलाच्या आणि होशांगच्या आठवणीत, सहवासात रमण्याचा निर्णय दोघे घेतात.

लेखकाची भाषा साधी, सोपी, ओघवती आणि सद्य: काळाला साजेशी आहे. वाचकाला सतत खिळवून ठेवणारी, उत्कंठावर्धक लेखनशैली आहे. मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे कादंबरीत अचूक टिपले आहेत. एकंदरीत ‘सेमी प्रायव्हेट रूम’ ही कादंबरी वाचनीय आहे. नियतीचा घाला कधी, कसा व कोणावर येईल, याची जाणीव वाचकांच्या मनाला चटका देणारी आहे. निरागस बालकावर घातलेली झडप, फुलपाखरावर झडप घालणाऱ्या खेकडय़ाने चित्रित करून पुंडलिक वझेंनी अतिशय कल्पक मुखपृष्ठ रेखाटले आहे.

  • ‘सेमी प्रायव्हेट रूम’- डॉ. अमित बिडवे,
  • मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे- १८५, मूल्य- २०० रुपये.