कवयित्री संगीता अरबुने यांचा ‘मनीमानसी’ या शीर्षकाचा लेखसंग्रह नुकताच ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला आहे. आतापर्यंत कविता आणि कथा या साहित्यप्रकारांत लेखन केलेल्या संगीता अरबुने यांच्या या नव्या पुस्तकात मात्र त्यांचे ललितरम्य चिंतनशील लेखन वाचायला मिळते. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अरबुने यांच्या ३२ मुक्तचिंतनपर लेखांचा हा संग्रह आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच असलेल्या ‘लिहिता लिहिता..’ या शीर्षकाखालील मनोगतात अरबुने यांनी सर्जनशील लेखनामागच्या प्रेरणांविषयी लिहिले आहे. त्यात त्या लिहितात : ‘जीवनाचं एका उच्चतम पातळीवर होत गेलेलं आकलन, त्यातून येणारं वैराग्य या सगळ्याशी लेखक आतल्या आत झगडत असतो.. या आतल्या कोलाहलात तो रमू इच्छित असतो. कारण या कोलाहलातच त्याला स्वत:चा आतला आवाज ऐकू येतो. या कोलाहलातच त्याच्यातलं सर्जन फुलत राहतं. नकळतपणे त्याच्या आत माणूसपण समजून घेण्याची, त्याच्या जगण्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते..’ या संग्रहातील लेखांमध्येही याच प्रक्रियेचे प्रतििबब उमटले आहे. भवतालाच्या अनुभवाने लेखिकेच्या मनी उमटलेले तरंग, त्याविषयीचे चिंतन ललितप्राय शैलीत या लेखांमध्ये मांडलेले आहे. माणसाच्या जगण्यात शब्दांचे स्थान शोधणारा ‘शब्दचि आमुच्या जिवाचे जीवन’ हा या संग्रहातील पहिलाच लेख असो वा मंगेश पाडगावकरांच्या ‘तरुण असलं की तरुण असतं म्हातारपण..’ या काव्य-ओळीची आठवण करून देणारा ‘म्हातारपण तरुण होताना..’ हा लेख असो किंवा मानवी नात्यांचा वेध घेणारा ‘गोष्ट नात्यांची’ हा लेख असो, संग्रहातील सारेच लेख आपल्या आजूबाजूला दिसणारी उदाहरणे देत वाचकाला अंतर्मुख करतात. भोंडल्याच्या खेळाचे, त्यातील गीतसंचिताचे स्मरण करणारा ‘एक लिंब झेलू बाई, दोन लिंबं झेलू..’ हा लेख, तसेच ‘तंबूतला सिनेमा’, ‘नानाजींची हवेली’, ‘कुलदेवतेचा जागर करताना..’, ‘आठवणीतली दिवाळी’, ‘सुट्टी मे महिन्याची’ आदी आठवणींचा मननीय आलेख चितारणारे लेख वाचनीय झाले आहेत.

प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत म्हणजे- चुंबन! त्याचा काव्यात्म आढावा घेत ‘लिहिणं म्हणजेही एकप्रकारचं चुंबनच, लेखणीने कागदाला दिलेलं..’ या वाक्याने संपणारा ‘चुंबन! अभिव्यक्तीचं तरल माध्यम’ हा लेख, तसेच आजच्या स्त्रियांची बलस्थाने अधोरेखित करणारा ‘स्त्रीत्वाचा अवकाश जपताना..’ यांसारखे लेख वाचकांना विचार करण्यास उद्युक्त करतात. याशिवाय संग्रहातील शेवटचे दोन लेख- एक, पावसाच्या लयीशी समरस होत जगणे सुंदर करण्याचा विचार व्यक्त करणारा ‘रिमझिम गिरे सावन..’ आणि दुसरा, प्रेमाच्या अनुभूतीतील समृद्धता सांगणारा ‘एक गुलजार अनुभूती’- आवर्जून वाचावे असे आहेत. एकूणच सृजनशील जगणे आणि भवतालातील व्यावहारिकता यांच्यातीस द्वैत नाकारणारे हे लेख आहेत. त्यामुळे संपादनातल्या त्रुटी पुस्तकात काही ठिकाणी दिसत असल्या तरीही या लेखांचा आस्वाद घ्यायलाच हवा.

  • ‘मनीमानसी’- संगीता अरबुने,
  • ग्रंथाली प्रकाशन,
  • पृष्ठे- १५४, मूल्य- १८० रुपये