..प्रकाश संतांची यानंतरची भेट मुंबईला झाली. माझ्या आणि त्यांच्या पुस्तकाला एकाच वर्षी राज्य पुरस्कार मिळाला होता. या निमित्ताने मुंबईला त्या गुरदाळ्यात संतांची गाठ पडली. आतापर्यंत आमच्या सवयी एकमेकांना माहीत झाल्या होत्या. संत माणूसघाणे मुळीच नव्हते. कुणी बोलले तर ते हसून त्याच्याशी बोलत. पण स्वत:हून कोणत्या घोळक्यात शिरण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. घोळक्यापासून दूर कुठले तरी दूरस्थ पडघम ऐकत राहणे किंवा फार तर एकदोघा जवळच्या मित्रांत रमणे त्यांना आवडे. माझाही थोडा फार तसाच स्वभाव आहे. त्यामुळे ते दोन दिवस आम्ही दोघेच एकत्र फिरलो. खूप गप्पा मारल्या. नव्या लेखनाचे संकल्प एकमेकांना सांगितले. पुरस्कार वितरणानंतर दुसऱ्या दिवशी आयोजकांनी लेखकांना मुंबई दर्शनची ट्रीप घडवून आणली. त्या ट्रीपमध्ये मेयरची भेट हा एक कार्यक्रम होता. त्यांच्या निवासस्थानी आम्ही पोहोचलो, तर ते एका मीटिंगसाठी गेले आहेत असे कळले. बराच वेळ आम्हाला तेथे अडकून पडावे लागले. संतांना ते मुळीच आवडले नाही. मेयर आल्यावर त्यांच्यासोबत फोटो काढण्याची अनेक लेखकांची धडपड सुरू झाली. आम्ही दोघे एका कोपऱ्यात बसून ती गंमत पाहत होतो..

संतांचे वडील वारले तेव्हा ते दहा वर्षांचे होते. नंतर इंदिराबाईंनी त्यांना वाढविले. आई-मुलात एक अत्यंत हृद्य नाते असते. इथे त्याची उत्कटता अनेक पटींनी वाढली होती. म्हणून आई वारल्यावर प्रकाश मनाने खूपच खचले. एवढय़ा प्रदीर्घ सहजीवनानंतर आईच्या जाण्याने ते व्यथित झाले. इंदिराबाई वारल्यावर मी संतांना पत्र लिहिले होते. त्या पत्राचे लहानसेच, पण उत्कट उत्तर त्यांनी पाठविले : ‘..आईच्या मृत्यूनंतर मला प्रचंड एकाकीपण आले. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मोठा मुलगा म्हणून माझे आणि तिचे अतूट नाते निर्माण झाले होते. ते बंध ६३ वर्षांच्या दीर्घकाळानंतर सुटून गेले. मला सर्व सावरून पुन्हा पूर्ववत पातळीवर यायला अजुनी अवकाश लागेल. अपरिहार्य हे होतच असतं, पण ते मानताना त्रेधा होते. असो. तुमच्या छोटय़ाशा पत्रातून व्यक्त होणारा मत्रीचा धागा अमूल्य असाच वाटतो. तो तसाच राहावा अशी इच्छा आहे.’

पण तो जो कुणी असे धागे जुळवितो, त्याची मात्र तशी इच्छा नव्हती. एके दिवशी अचानक संत वारले आणि हा धागाही तुटून गेला. प्रत्येक धागा तुटणारच असतो. आपल्या हातात राहिलेले त्याचे टोक फक्त आपण जपून ठेवू शकतो. आणि मग जेव्हा आपलीही मूठ उघडण्याचा अटळ क्षण येतो तेव्हा सारे धागे सुटून जातात..

मात्र हे जितके खरे तितकेच हेही खरे, की जोपर्यंत स्मृती आहे तोपर्यंत माणूस आठवणींचे धागे मनात पकडून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. एकदा आम्हाला गणपतीपुळेला जायचे होते. नांदेडहून पुळ्याला जायचे म्हणजे १६ तास लागतात, म्हणून आम्ही वाटेत संतांकडे मुक्काम करण्याचे ठरविले. पुष्पाने संतांसाठी खास घरी केलेला खवा घेतला होता. टाटासुमो घेऊन निघालेलो आम्ही सात जण, रस्त्यात उशीर झाल्यामुळे त्यांच्या घरी रात्री दहा वाजता जाऊन पोहोचलो. मात्र अपरात्री येऊन धडकलेल्या इतक्या माणसांचीही त्यांनी एवढी उत्तम सोय केली, की वाटावे ही यांच्या नेहमीच्याच सवयीची गोष्ट आहे. माझी पत्नी, मुले प्रथमच संतांच्या घरी आली होती. त्यांनाही हे घर विलक्षण आवडले. जिथे समृद्धी आहे पण तिचा माज नाही, विद्वत्ता आहे पण दर्प नाही, आणि संस्कृती आहे पण तिचा गर्व नाही असे हे घर. पाहता पाहता पुष्पाचेही त्या घराशी दृढ नाते बनून गेले.

या वास्तव्यातला एक प्रसंग मला नेहमीच आठवतो. संत मला आणि पुष्पाला संगमावर घेऊन गेले होते. शेजारी अनेक मंदिरे आहेत. पुष्पाला देवदर्शनाची अत्यंत ओढ. ती अतिशय सश्रद्ध आणि भाविक आहे. तिची आवड पाहून संतांनी तिला जवळची सारी मंदिरे दाखविली. संत स्वत: देवदेव न करणारे. ते देवळाबाहेर उभे राहात आणि पुष्पा दर्शन घेऊन बाहेर आली, की तिच्याबरोबर दुसऱ्या देवळात जात. मला वाटले, की संतांचा देवाबद्दलचा तटस्थपणा तिला पटणार नाही. मी घरी आल्यावर तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘‘संतांनी

देवाच्या कशाला पाया पडायला हवे? ते स्वत:च देवमाणूस आहेत.’’

माझ्या पत्नीने याहून मोठे प्रशस्तिपत्र आयुष्यात कुणालाच दिले नाही.

संतांच्या आकस्मिक निधनानंतर प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या ‘झुंबर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आम्ही दोघे नांदेडहून निघालो, तेव्हा आम्हाला हे सारे आठवत होते. एवढा मोठा समारंभ, संतांच्या घरी खूप माणसे येणार, म्हणून आम्ही विद्याधर म्हैसकर यांच्याकडे उतरलो. समारंभ अप्रतिम झाला. एका दिवंगत लेखकाच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी हजारएक माणसे जमली होती, हे दृश्यच विलक्षण भारावून टाकणारे होते. यांत कराडकरांच्या प्रेमाचा जसा वाटा होता तसाच संतांच्या लेखनाचा व व्यक्तिमत्त्वाचाही होता. या प्रसंगी प्रकाश संतांनी काढलेल्या चित्रांचे एक प्रदर्शनही मांडले होते. अजून कार्यक्रम सुरू होण्यास अवधी होता, म्हणून सहज ते पाहावयास गेलो आणि मला धक्काच बसला. एखाद्या कुशल चित्रकाराच्या कुंचल्यातून यावी अशी चित्रे संतांनी वयाच्या विशीत रंगविली होती. चित्रांची रचना, रंग, अवकाशाचा वापर हे सारेच अप्रतिम होते. सारी चित्रे निसर्गाचे विविध विभ्रम दाखविणारी होती. संतांनी लेखनास सतराव्या वर्षी सुरुवात केली, पण नंतर त्यांची लेखणी मूक बनली ती तब्बल ३० वर्षे. मग मात्र धोधो पाऊस सुरू झाला. त्यांच्या चित्रकलेचाही बांध असाच फुटला असता तर..

समारंभापूर्वी वहिनी भेटल्या. पुष्पाला पाहिल्याबरोबर त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. तीही रडवेली झाली. त्यांनी मायेने तिला आपल्याजवळच बसवून घेतले.

दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो. फाटकातून आत शिरताच प्रथम जाणवले ते बागेचे ओकेबोकेपण. तिच्यात पूर्वी असलेले चतन्य निघून गेल्यासारखी ती भासत होती. आम्ही घरात गेलो. बठकीच्या खोलीत संतांचा एक मोठा फोटो हार घालून ठेवलेला होता. साऱ्या घरावर एक उदास कळा आलेली होती. दुपार कलली होती. सायंकाळच्या खिन्न सावल्या घरात पसरू लागल्या होत्या.

पुष्पा व वहिनी बराच वेळ बोलत बसल्या. खूप दिवसांनंतर त्या दोघींना मनातले बोलायला मिळाले होते. मी बठकीत येऊन बसलो. तीन वर्षांपूर्वी या वास्तूत घालविलेले ते दिवस मला आठवत होते. मन ओझावून गेले होते.

काही वेळानंतर पुष्पा व वहिनी बठकीच्या खोलीत आल्या. वहिनींच्या हातात संतांचा शेवटचा कथासंग्रह होता. त्यांनी तो मला भेट दिला. म्हणाल्या, ‘‘खूप चांगले वाटले तुम्ही आलात ते. असेच येत जा. तुमचे मित्र नसले तरी..’’ त्यांना पुढे बोलवेना.

मी पुस्तक उघडून पाहिले. वहिनींनी पहिल्या पानावर लिहिले होते : ‘विजय पाडळकर व सौ. पुष्पा पाडळकर यांना स्नेहपूर्वक. तुमच्या आवडत्या लेखकाची चिरंतन आठवण.’

त्याक्षणी मला जाणवले.. काहीतरी कायमचे तुटून गेलेले असले तरी सारेच काही संपलेले नाही. आपुलकीचा, जिव्हाळ्याचा दुसरा एक धागा अजून हातात आहे.

मी वहिनींना वाकून नमस्कार केला. हा नमस्कार जसा त्यांना होता तसाच माझ्या त्या ज्येष्ठ मित्राच्या स्मृतीसही होता. बाहेर पडलो. पुष्पा म्हणाली, ‘‘घरात किती उदास, कोंदट आणि अंधारे, प्रकाश नसल्यासारखे वाटत होते!’’

मी एकदम चमकलो. मग एक उसासा टाकून म्हणालो, ‘‘होय. ‘प्रकाश’ हरवलेले घर होते ते.’’