|| प्र. ना. परांजपे

करुणा गोखले यांच्या ‘चालता-बोलता माणूस’ या पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ त्याचे उपशीर्षक वाचल्यावरच लक्षात येतो. ‘माणूस बोलू का लागला, याचा उत्क्रांतीच्या अंगाने घेतलेला शोध’ असे हे उपशीर्षक वा स्पष्टीकरण आहे. शिवाय लेखिकेने ‘मनोगत’, ‘विषयप्रवेश’ व ‘समारोप’ यांतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माणूस बोलू का लागला (किंवा का बोलू लागला?), हे समजून घ्यायचे असेल तर तो झाडावरून उतरून चालू का लागला, हे समजून घ्यावे लागेल. ते करताना माणसाच्या शारीरिक उत्क्रांतीचा मागोवा घ्यावा लागतो. माणसे वेगवेगळ्या भाषा बोलत असूनही त्यांच्या भाषांत मूलभूत साम्ये का आढळतात, हे शोधताना माणसाच्या जनुकीय घटनेकडे वळावे लागते. म्हणजे हा शोध कोणत्याही एका ज्ञानशाखेच्या कवेत येणारा नाही. शरीरविज्ञान, समाजविज्ञान, मनोविज्ञान, भाषाविज्ञान या आणि आणखी बऱ्याच विज्ञानांच्या विकासाचा मागोवा घेऊन त्यातून मिळणाऱ्या मर्मदृष्टीची सांगड घातल्याशिवाय अशा प्रश्नांवर प्रकाश पडत नाही. पण असा सखोल आंतरज्ञानशाखीय पाठपुरावा करून केले जाणारे लेखन मराठीत दुर्मीळ आहे.

अर्थातच असे लेखन कठीण असते. वाचकांना ते अवघड वाटेल आणि त्यामुळे ते वाचण्यापासून वाचक परावृत्त होण्याचा संभव आहे याची लेखिकेला जाणीव आहे. म्हणूनच तिने वाचकाला अनेक प्रकारे मदत केली आहे. आपल्या मनोगतात लेखिका सांगते की, जसजसे माणसाचे शरीर बदलत गेले, तसतशी त्याची भाषा प्रगत होत गेली. इतिहासाच्या कालपटावर मानवी भाषा कशी उत्क्रांत होत गेली असेल, याविषयीच्या सिद्धान्तांची सखोल चर्चा या पुस्तकात सापडते. ती करताना अर्थातच व्याकरणाची तोंडओळखही करून द्यायला हवी. त्याचबरोबर माणसाच्या मेंदूत डोकवावे लागले आणि मानसशास्त्रातही फेरफटका मारावा लागला. एवढेच नाही तर अनेक मनोरुग्णांच्या व्याधींचीसुद्धा माहिती करून घ्यावी लागली.

भाषा ही माणसाची सर्वात सहजी नजरेस (खरे तर कानावर) पडणारी वर्तणूक आहे. भाषेत बिघाड हा माणसाच्या मेंदूतील बिघाडाचा द्योतक असतो. संपूर्ण पुस्तकाचा रोख हा माणसाच्या अस्तित्वात भाषेचे अनन्यसाधारण स्थान का आहे, हे समजावून सांगणे हा आहे. ते करताना उत्क्रांतिशास्त्र, शरीरशास्त्र, मेंदूशास्त्र, प्राणीवर्तनशास्त्र आणि अर्थातच व्याकरण अशा विविध क्षेत्रांना स्पर्श करावा लागला आहे.

‘विषयप्रवेश’ हे पुस्तकाचे पहिले प्रकरण. त्यातही पुस्तकाचा विषय काय आहे, हे लेखिकेने सांगितले आहे. त्यात म्हटले आहे : ‘पुढील काही प्रकरणांमध्ये आपण मुख्यत्वे पाच प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत- (१) चार पायांचे प्राणी आणि पक्षी यांची भाषा कशी असते? (२) मनुष्यप्राणी बोलू का लागला? (३) उत्क्रांतीच्या प्रवाहात त्याच्या शरीरात कोणते बदल झाले व ते त्याला भाषाविकासात कसे उपयोगी पडले? (४) भाषिक क्षमता विकसित होण्याआधी माणसाच्या मेंदूत इतर कोणत्या बोधनक्षमता विकसित व्हाव्या लागल्या? (५) त्याची भाषा काळाच्या ओघात कशी उत्क्रांत होत गेली?’

या पाच प्रश्नांचा स्पर्श न झालेला एक विषय लेखिकेने शेवटच्या- म्हणजे १४ व्या प्रकरणात हाताळला आहे. तो आहे- भाषिक वैश्विकांचा व भाषिक भेदांचा!

वाचकांच्या मदतीसाठी लेखिकेने आणखी एक गोष्ट केली आहे. ती म्हणजे बहुतेक प्रकरणांच्या शेवटी त्या प्रकरणात आलेल्या विषयाचा काही वाक्यांत सारांश देऊन पुढच्या प्रकरणात येणाऱ्या विषयाचे सूतोवाच केले आहे. उदाहरणार्थ, तिसऱ्या प्रकरणाच्या अखेरीस म्हटले आहे- ‘आतापर्यंत आपण माणसाच्या पूर्वजाने खाणाखुणा करताना कशाकशाचे अनुकरण केले असावे, याची चर्चा केली. पुढील प्रकरणात बघू या त्याची आवाजाची दुनिया..’

एवढेच नव्हे, तर पुस्तकाचा समारोप करताना लेखिका पुस्तकाचा सारांश सांगते : ‘मनुष्य या प्राण्याला संपर्कसाधनाची (साधण्याची?) गरज का भासली, येथपासून आपण सुरुवात केली. बदलाच्या भौगोलिक परिस्थितीत तगून राहण्यासाठी त्याच्या शरीरात कोणकोणते बदल कसकसे होत गेले याची थोडक्यात चर्चा केली. हे बदल त्याला आपसात संपर्क प्रस्थापित करण्यासाठी कसे उपयोगी पडले याचा आढावा घेतला. समूहात राहणाऱ्या मनुष्यप्राण्याची प्राथमिक स्वरूपातील संवादसाधने कशी असतील, याविषयीचे अभ्यासकांचे अंदाज नमूद केले. मनुष्यप्राण्याच्या शारीरिक विकासाबरोबर त्याचा बौद्धिक विकास कसा होत गेला, याचीसुद्धा थोडक्यात माहिती घेतली. माणसाच्या मेंदूचा विकास झाल्याने त्याच्यामध्ये कोणत्या बोधनक्षमता विकसित होऊ शकल्या, ते बघितले. या क्षमताच प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या त्याच्यामध्ये भाषिक क्षमता विकसित होण्यास कशा कारणीभूत झाल्या याची चर्चा केली. आधुनिक माणसाची भाषा ही त्याच्या बोधन- क्षमतेचे स्वरूप व त्याचा भोवताल यानुसार कशी ठरते, ते स्पष्ट केले. त्याचबरोबर माणसाची भाषा किती उपजत, किती संस्कारगर्भ (संस्कारसिद्ध?) या वादाचा संक्षिप्त परामर्श घेतला. जगभरच्या भाषांमध्ये साम्यस्थळे कोणती व का आढळतात, ते नमूद करून भाषांमध्ये एवढे वैविध्य का निर्माण झाले असेल याचा ऊहापोह केला. अखेरीस भाषा बदलतात का आणि अस्तंगत का होतात, त्यामागची कारणे उद्धृत केली.’

अशा रीतीने मानवी भाषेची उत्पत्ती का, कशी व कधी झाली, तिची गती किंवा प्रगती कुठल्या टप्प्यांतून होऊन ती आजच्या प्रगत स्थितीला पोहोचली आणि आधुनिकीकरणाच्या व जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळे अनेक भाषा (आणि त्यांच्यामधील ज्ञान व सांस्कृतिक वारसा) कशा नष्ट होत आहेत याचा आढावा लेखिकेने या पुस्तकात घेतला आहे.

भाषेच्या या डोहात उतरणे सगळ्याच वाचकांना- अगदी गंभीर वाचन करणाऱ्यांनाही- पेलवेल आणि मुख्य म्हणजे आवडेलच असे नाही याची लेखिकेला जाणीव आहे. म्हणून तिने काहीशा गोष्टीवेल्हाळ शैलीचा आधार घेतला आहे. वाचकांशी जणू आपण गप्पा मारतो आहोत अशी कथनशैली विवेचनातही वापरली आहे. तांत्रिक मुद्दे स्पष्ट करण्यासाठी अनेक उदाहरणे दिली आहेत. प्रसंगी पाल्हाळिकपणाचा धोका पत्करूनही चार-चार उदाहरणे देत वेगवेगळ्या वाक्यांतून एकच मुद्दा पुन्हा पुन्हा सांगितला आहे. मुख्य म्हणजे विवेचन कोरडे, तटस्थ, व्यक्तिगत स्पर्श नसलेले होऊ नये असा प्रयत्न सर्वत्र केला आहे. शिवाय वाचकाला विश्वासात घेऊन आपण काय करतो आहोत, हे सतत सांगितले आहे. त्यामुळे भाषेच्या विकासातील इतक्या ज्ञानशाखांचा सहभाग वाचताना वाचकाचा गोंधळ होत नाही. हा विषय असा आहे की त्याबद्दलचे सर्व वाचन इंग्रजीतून करून, ते पचवून, त्याची मांडणी व लेखन मराठीतून करताना कुणाचीही बौद्धिक व भाषिक दमछाक होईल. त्यामुळेच लेखिकेने केलेल्या या बव्हंशी यशस्वी प्रयत्नाबद्दल तिचे अभिनंदन केले पाहिजे.

पुस्तकात अनेक आकृत्या, छायाचित्रे इत्यादी दृश्य साधनसामग्रीचा उपयोग केलेला आहे. त्यातील काही सामग्रीचा विषय समजून घेण्यासाठी वाचकाला उपयोग होईल. मात्र, लहान आकार, कागदाची गुणवत्ता व कृष्णधवल छपाई यामुळे त्याचा मजकुराचा एकसुरीपणा कमी करण्याव्यतिरिक्त वेगळा असा उपयोग होत नाही. पुस्तकाच्या गुणपूर्णतेचा परिचय करून घेतल्यानंतर त्याच्यातील काही दोषांचा किंवा त्रुटींचाही उल्लेख करायला हरकत नाही. पुस्तकातील संदर्भग्रंथांच्या यादीत एकाही मराठी पुस्तकाचा समावेश नाही. अशी शक्यता आहे, की या विषयाशी संबंधित असे एकही मराठी पुस्तक लेखिकेने वाचले नसावे किंवा संदर्भ- ग्रंथांच्या यादीत समाविष्ट करण्याइतक्या दर्जाचे ते ग्रंथ आहेत असे तिला वाटले नसावे. परंतु कालेलकर, केळकर, माहुळकर, मालशे, पानसे अशा काही लेखकांनी या विषयाशी संबंधित मराठीत लेखन केलेले आहे. निदान त्यांनी वापरलेल्या मराठी संज्ञांचा लेखिकेला उपयोग झाला असता. शिवाय वाचकाला अधिक वाचनासाठी, कुतूहलपूर्तीसाठी, तुलनेसाठी अन्य काही ग्रंथांची नावे कळली असती.

तसेच पुस्तकात एके ठिकाणी नोम चॉम्स्कीसंबंधी लावलेला टवाळीचा सूर अनुचित वाटतो. चॉम्स्कीच्या ‘सिंटॅक्टिक स्ट्रक्चर’ या छोटेखानी पुस्तकाने, त्यातील भाषिक रचनांचा अंत:स्तर व पृष्ठस्तर (‘डीप स्ट्रक्चर’ आणि ‘सरफेस स्ट्रक्चर’) या संकल्पनांनी १९७० च्या दशकातील भाषाविज्ञानात क्रांती केली. उपजत भाषिक क्षमतेचा सिद्धान्त त्याने जोरकसपणे मांडला. अशा अनेक बाबी विचारात घेता अनभिज्ञ वाचकाच्या मनात चॉम्स्कीबद्दल गैरसमज निर्माण होईल असे लेखन- तेही तिसऱ्याच एका पाश्चात्त्य मानसशास्त्रज्ञाच्या खांद्यावर बंदूक ठेवून करणे- हे निषेधार्ह वाटते. त्या तुलनेत अन्य भाषिक प्रमाद- इंग्रजी संज्ञांचा, शब्दसंहतींचा अपरिहार्य नसलेला वापर, उदा. ‘मेटॅफर’, ‘एरिया’, ‘उद्धृत’ या शब्दांचा काही ठिकाणी चुकीच्या अर्थाने केलेला वापर, ‘स्वयंनिर्भर’ या हिंदी शब्दाचा वापर आदी दोष क्षम्य आहेत. ‘नवनवी वाक्ये करण्याची काहीएक कृती माणसाच्या मेंदूत असणार’ या वाक्यात ‘कृती’ऐवजी ‘क्षमता’ किंवा ‘कार्यक्षमता’ हा शब्द वापरता येणार नाही का?

या पुस्तकाला विषयसूची व उल्लेखसूची यांची जोड दिली असती तर वाचकांची खूपच सोय झाली असती. परंतु त्यामुळे ते पाठय़पुस्तक आहे असे वाटेल अशी भीती तर लेखिकेला वाटली नाही ना? असो. मात्र, करुणा गोखले यांच्या ‘चालता-बोलता माणूस’ या पुस्तकामुळे इतक्या व्यापक विषयावर आंतरज्ञानशाखीय, समग्र (होलिस्टिक) दृष्टिकोनातून एक अभ्यासू पुस्तक वाचकांना उपलब्ध झाले आहे, हे नक्की!

‘चालता-बोलता माणूस’- करुणा गोखले,

राजहंस प्रकाशन, पुणे,

पृष्ठे- १६०, किंमत- २२० रुपये.