प्राध्यापकांची पदोन्नती व पगारवाढ यासाठी अन्य बाबींबरोबरच त्यांनी शोधनिबंध सादर करणेही अनिवार्य असते. परंतु यातील बहुतांश शोधनिबंध हे अत्यंत सुमार दर्जाचे असतात, अशी ओरड गेल्या काही वर्षांपासून होत आहे. आणि त्यात तथ्य असल्याचेही दिसून येत आहे. असे थातुरमातुर शोधनिबंध लिहिणाऱ्यांत आता मराठी विभागप्रमुखांचीही भर पडताना दिसते आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांची पदोन्नती, पगारवाढ यासाठी अन्य बाबींबरोबरच त्यांनी शोधनिबंध सादर करणे आवश्यक ठरवले आहे. परंतु अनेक प्राध्यापकांचे शोधनिबंध हे अत्यंत सुमार दर्जाचे असतात अशी ओरड गेल्या काही वर्षांपासून होत आहे आणि त्यात बऱ्याच अंशी तथ्यही दिसून येत आहे. (याच विषयावर १७ मार्च २०१३ च्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘शोधनिबंधांची दुकानदारी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.) एवढेच नव्हे तर आता विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखांच्या शोधनिबंधांचा दर्जाही घसरत चालल्याची उदाहरणे आता आढळून येऊ लागली आहेत. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’मध्ये प्रकाशित झालेल्या दोन विद्यापीठांच्या मराठी विभागप्रमुखांचे लेख वाचले तर हे कुणाच्याही ध्यानी येईल. त्यापैकी पहिला लेख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर यांचा असून तो महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या अंकात (अंक क्र. ३५५, एप्रिल-जून २०१६, पृष्ठे : ३७-४३ वर) प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या लेखाचा मथळा ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील साहित्यविचार व साहित्यसमीक्षा’ हा आहे. त्यांनी स्वत:च आपल्या लेखाला ‘शोधनिबंध’ असे म्हटले आहे; परंतु तो लेख म्हणजे म. सा. पत्रिकेत आलेल्या लेखांची केवळ जंत्री आहे.

डॉ. सांगोलेकर यांनी आपल्या लेखात ‘केशवसुतांनी केलेल्या क्रांतीचे आकलन झाले आहे काय?’ या श्री. के. क्षीरसागर यांच्या लेखावर लिहिले आहे. पण क्षीरसागरांच्या प्रतिपादनाचे आकलन डॉ. सांगोलेकर यांना झाले आहे असे दिसत नाही. क्षीरसागरांची वाक्ये अशी आहेत : ‘‘केशवसुतांच्या वेगळ्या संप्रदायाचे वा त्यांनी मराठी काव्यात केलेल्या क्रांतीचे स्वरूप सामान्यत: त्रिविध तऱ्हांनी सांगण्यात येई. अगदीच ढोबळ आणि अशास्त्रीय तऱ्हा म्हणजे ‘तुतारी’ वळणावर समाजक्रांतीच्या कविता लिहिणारे कवी म्हणून केशवसुत क्रांतिकारक होत,’ ही होय. दुसरी म्हणजे कवितेच्या शैलीत, वृत्तात व काव्यप्रकारात जाणीवपूर्वक बदल करणारे म्हणून ते क्रांतिकारक होत, ही होय. आणि तिसरी म्हणजे त्यांचे काव्यविषयच वेगळे होते व त्यात ‘आत्मलेखन’ होते, म्हणून ते वेगळे होय. (अंक १५७, एप्रिल-जून १९६६, पृ. ९)’’

यावर डॉ. सांगोलेकरांनी लिहिले आहे- ‘‘श्री. के. क्षीरसागरांनी केशवसुतांनी मराठी काव्यात जी क्रांती केली तिच्याबद्दल साधकबाधक चर्चा केली आहे. ‘तुतारी’ वळणाच्या सामाजिक कविता लिहिणे, कवितेची शैली, वृत्त आणि काव्यप्रकार यांच्यामध्ये जाणीवपूर्वक बदल करणे, तसेच वेगळे काव्यविषय- विशेषत: आत्मपर काव्यविषय हाताळणे, अशी विविध क्रांती केल्याचे श्री. के. क्षीरसागर स्पष्ट करतात.’’

श्री. के. क्षीरसागरांची वाक्ये आणि सांगोलेकरांची वाक्ये मुळातून वाचणारांना सांगोलेकरांना ‘श्रीकेक्षी’ यांच्या लेखनाचे आकलन झालेले नाही हे सहज लक्षात येईल. क्षीरसागरांनी ‘ढोबळ आणि अशास्त्रीय तऱ्हा’ हे शब्द योजलेले असले तरी सांगोलेकरांनी ते लक्षात घेतलेले दिसत नाही.

तसेच शोधनिबंधामध्ये ‘एके ठिकाणी’, ‘काही अंकांमधून’ अशी मोघम शब्दयोजना अपेक्षित नसते. तिथे नेमके लेखन अपेक्षित असते. सांगोलेकरांच्या लेखात ‘एके ठिकाणी’ हे शब्द पृ. ३९ वर दोनदा आणि ‘काही अंकांमधून’ हे शब्द पृ. ४२ वर एकदा आलेले आहेत.

लेखाच्या शेवटी स्वत:चे नाव, पद, पत्ता वगैरे माहिती सांगोलेकरांनी दिली आहे. ही माहिती पृ. ४३ वर सर्वात शेवटी हवी. त्यानंतर ‘संदर्भ आणि टीपा’ या मथळ्याखाली पृ. ४२-४३ वर ज्या नोंदी दिल्या आहेत त्यातील माहितीचा क्रमही चुकला आहे. ‘संदर्भ आणि टीपा’ असे एका मथळ्याखाली कुठेच देत नाहीत. सांगोलेकरांनी टीपांचे क्रमांक दिले आहेत आणि नोंदीची सुरुवात लेखकाच्या आडनावाने केली आहे. वस्तुत: टीप क्रमांक दिल्यानंतर लेखकाचे स्वत:चे नाव (पूर्ण नाव किंवा आद्याक्षर), लेखकाने पित्याचे नाव दिले असल्यास ते नाव व त्यानंतर आडनाव असा मान्य क्रम असतो.

सांगोलेकरांची टीप क्र. १ ची नोंद अशी आहे-

१. देशपांडे पु. य., ‘पुरोगामी वाङ्मयाची लक्षणे’ (लेख)

अंतर्भूत : महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पुणे, फेब्रु. १९३८.

या नोंदीतील (लेख), अंतर्भूत, पुणे हे तिन्ही शब्द अनावश्यक आहेत. ही नोंद याप्रमाणे हवी..

१. पु. य. देशपांडे, ‘पुरोगामी वाङ्मयाची लक्षणे,’ महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक.., फेब्रुवारी १९३८,  पृ. ..

नियतकालिकाच्या नावानंतर गावाच्या नावाची नोंद ही एकाच नावाची दोन नियतकालिके असतील तेव्हाच करतात.

मी नोंदवलेल्या या आक्षेपांमधून डॉ. सांगोलेकर यांच्या लेखनातील उणिवा हा लेख वाचणाऱ्यांच्या सहज लक्षात आल्या असतील.

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील दुसरा लेख डॉ. सतीश बडवे यांचा असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे विभागप्रमुख आहेत. ‘समीक्षा पद्धती आणि उपयोजन’ असे त्यांच्या लेखाचे नाव असून तो महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या अंक क्र. ३५८, जानेवारी-मार्च २०१७, पृ. ५ ते ९ वर आला आहे. त्यांचा लेख वाचल्यानंतर त्यावरचे माझे आक्षेप मी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. पुरुषोत्तम काळे यांना पत्र लिहून कळवले होते व ते पत्र महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या एप्रिल ते जून २०१७ च्या अंकात छापावे अशी विनंती केली होती. माझे ते पत्र खाली उद्धृत करीत आहे-

‘‘प्रा. बडवे यांच्या लेखामध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या अनेक मतांबद्दल लिहायचे म्हटले तर एक विस्तृत लेखच लिहावा लागेल. परंतु त्यासाठी लागणारा वेळ आज माझ्याकडे नसल्यामुळे फक्त पृ. ७ वरील पहिल्या दहा ओळींबद्दल लिहीत आहे.

प्रा. डॉ. बडवे यांनी लिहिले आहे, ‘मराठीत तत्त्वज्ञ समीक्षकांची वानवा आहे. कधी संस्कृत साहित्यशास्त्र, तर कधी इंग्रजी साहित्यशास्त्राचा आधार घेत केलेली मांडणी पृष्ठस्पर्श झालेली आढळते.’ या वाक्यात व्याकरणदोष आहे.

बडवे यांचे त्यानंतरचे वाक्य- ‘‘कित्येक वेळा हे जाणवते की, विधायकतेपेक्षा निषेधाचा सूर तिच्यात अधिक उमटतो. पाल्हाळ, उपरोध, उपहास यांत रमणाऱ्या या समीक्षेने वाङ्मयीन-अवाङ्मयीन विचारांची गल्लतही केलेली दिसते.’’

माझ्या मते, ही विधाने मोघम आहेत. बडवे यांना ज्या समीक्षकांच्या लेखनात हे दोष आढळले त्या समीक्षकांची आणि त्यांच्या ग्रंथांची नावे त्यांनी द्यायला हवी होती. त्याच परिच्छेदात त्यांनी लिहिले आहे.. ‘‘समीक्षेमध्येच आदर्शवाद, सौंदर्यवाद, वास्तववाद, आकृतिवाद, कलावाद यांची चर्चाही कमी प्रमाणात झाली आहे.’’ बडवे यांचे हे मत दुरूस्त करण्याची आवश्यकता आहे. ज्यांच्या नावाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ समीक्षा / वाङ्मयीन संशोधन, सौंदर्यशास्त्र, ललित कला आस्वादपर लेखन या विषयांतील पुस्तकांना दरवर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार देते, त्या श्री. के. क्षीरसागर यांचे नाव, तसेच त्यांची ‘टीकाविवेक’, ‘वादसंवाद’ या पुस्तकांची नावेही बडवे यांना माहीत नसावीत असे वाटते. त्यांनी ही पुस्तके पाहावी व सौंदर्यवाद, वास्तववाद इत्यादींवर लिहिलेली प्रकरणे वाचावी असे मी सुचवते.

बडवे यांनी त्याच परिच्छेदात ‘‘वाङ्मयीन संप्रदाय’ व ‘वाङ्मयीन वाद व स्वरूप’ याव्यतिरिक्त ग्रंथरूपाने केलेली मांडणी अभावानेच आढळेल..’’ असे लिहिले आहे. त्यांनी ज्या ग्रंथांची नावे दिली आहेत ते ग्रंथ त्यांच्या लेखाच्या वाचकांना माहीत आहेत, हे गृहीत धरणे योग्य नाही.

संदर्भ देण्याच्या पद्धतीबद्दलही बडवे अनभिज्ञ असावेत असे मला वाटते. त्यांनी तीन टीप क्रमांक दिले आहेत. पण त्यानंतर कंसात दिलेल्या माहितीत सातत्य (कन्सिस्टन्सी) दिसत नाही. तसेच टीप क्रमांक दिल्यानंतर कंसामध्ये लेखकाचे नाव, पुस्तकाचे नाव इत्यादी माहिती देण्याची पद्धत कुठेही अवलंबिली जात नाही.’’