X

नव्या दमाच्या विज्ञानकथा

‘‘ब्रह्मांडाची कवाडं’ हा मराठी विज्ञानकथांच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

‘‘ब्रह्मांडाची कवाडं’ हा मराठी विज्ञानकथांच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये नव्या दमाच्या लेखकांच्या विज्ञानकथा एकत्रित वाचायला मिळतात. म्हणूनच हा आजच्या काळातला क्राऊडसोर्सिगचा एक अनोखा प्रयोग म्हणायला हवा..’ अशी लक्ष्मण लोंढे आणि डॉ. मेघश्री दळवी यांच्या मनोगताची सुरुवात वाचताना या पुस्तकाबद्दलचे कुतूहल जागृत झाले आणि सहजच संपूर्ण मनोगत वाचले गेले. या प्रस्तावनेत ‘साय-फाय कट्टा’ हा विज्ञानकथा लिहिणाऱ्या ग्रुपचा जन्म, त्या ग्रुपचे ऑनलाइन माध्यमातून विज्ञानकथा लिहिणे.. अशा कितीतरी गोष्टी समजतात. त्यानंतरच्या डॉ. बाळ फोंडके यांच्या प्रस्तावनेतून कथासाहित्य, विज्ञानकथा, त्या पाश्र्वभूमीवर या कथासंग्रहाचे महत्त्व यावरचे अभ्यासपूर्ण चिंतन वाचायला मिळते. अशा तऱ्हेने या वैशिष्टय़पूर्ण कथासंग्रहातील कथा वाचण्याची मनोभूमी तयार होते.

या कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत. यात कॅ. सुनील सुळे, स्मिता पोतनीस यांच्या प्रत्येकी तीन, तर डी. व्ही. कुलकर्णी, प्रसन्न करंदीकर, सुरेश भावे, शरद पुराणिक यांच्या प्रत्येकी दोन कथा आहेत. डॉ. मेघश्री दळवी, प्रिया पाळंदे यांची एकेक कथा आहे. यातील बहुतेक कथा आटोपशीर आहेत. परंतु प्रसन्न करंदीकर यांची ‘भारद्वाज’ ही कथा मात्र बरीच मोठी- म्हणजे पन्नास पानांची आहे, तर कॅ. सुनील सुळे यांची ‘विलीज ड्रायव्हिंग स्कूल’ ही कथा सहा पानांची आहे.

हे सर्व कथालेखक विज्ञानकथालेखन कार्यशाळेत सहभागी झाले होते. त्यांच्यात वाचनाचे, लिखाणाचे निश्चितच अंगभूत गुण होते. या कार्यशाळेमुळे त्यांना विज्ञानकथा कशी लिहावी याचे मार्गदर्शन मिळाले. एखादे वैज्ञानिक तत्त्व, सिद्धान्त वा गृहितकाभोवती कथा गुंफण्याचे कौशल्य जाणून घेता आले. त्याचा उपयोग करून त्यांनी हे प्रत्यक्ष कथालेखन केले आहे.

माणसाच्या कुतूहलाचा कायमच केंद्रबिंदू असलेल्या मानवी मेंदूच्या रचनेच्या अभ्यासात वैज्ञानिकांनी फार मोठी मजल मारली आहे. त्यामुळे मेंदूचे कार्य, मेंदू आणि माणसाची वागणूक, मेंदूतील रसायनांमधील बदल, विविध भावभावनांचे कल्लोळ इत्यादी गोष्टी या विज्ञानकथांचे विषय झाले आहेत. त्याचबरोबर चंद्रावर जन्म घेतलेल्या मुला-मुलींचे विश्व, रोबो, क्लोन्समुळे भविष्यात काही समस्या निर्माण होण्याच्या शक्यता, आभासी सत्य, आभासी मानवी वर्तणूक, मांसभक्षक झाडांमुळे तयार झालेली उपद्रवी जंगले, महाझोपेमागील विज्ञान अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात वाचायला मिळतात.

या कथा वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या असल्यामुळे लेखनशैलीत आणि सादरीकरणातही वैविध्य आढळते. काही कथांमध्ये विज्ञान कमी आणि अवतीभोवतीची कथेची गुंफण अधिक आढळते, तर काही कथांमध्ये कथेच्या ओघात विज्ञान न येता ते आधी सांगितले गेले आहे. अर्थात सरावाने, सातत्याने लिहून या त्रुटी या विज्ञानकथा लेखकांना सहजच कमी करता येतील. काही कथा वाचताना लेखकाला त्यातील बरेचसे इंग्रजी शब्द कमी करणे शक्य होते असेही जाणवले. लेखकांनी आपल्या कथांमधून निर्माण केलेले प्रश्न आपले लक्ष वेधून घेतात. या प्रश्नांचा त्यांनी चिकित्सक वृत्तीने आणि साहित्याच्या अंगाने शोध घेतला तर या कथा अधिक प्रगल्भ होतील. पुस्तकात शेवटी कथालेखकांचा परिचय दिला आहे. तो योग्यच आहे. परंतु त्यांचे ई-मेल पत्तेही द्यायला हवे होते. म्हणजे वाचकांना त्यांच्याशी संपर्क साधता आला असता आणि त्यांचे इतर लेखन समजून घेणेही सहजशक्य झाले असते.

या ब्रह्मांडाची.. विश्वाची अनेक गुपिते आहेत. ती शोधण्याचे काम माणूस अव्याहतपणे करतो आहे. तर्कसंगत विचार, परीक्षणे, निरीक्षणे या मार्गानी त्यामागचे विज्ञान वैज्ञानिकांकडून समजावून घेतले जात आहे. विज्ञानकथांच्या माध्यमातून रंजक पद्धतीने हे विज्ञान आम लोकांसमोर मांडले जाते. म्हणूनच या कथासंग्रहाचे ‘ब्रह्मांडाची कवाडं’ हे नाव समर्पक ठरते.

‘ब्रह्मांडाची कवाडं’,

संपादन- लक्ष्मण लोंढे, डॉ. मेघश्री दळवी,

गार्गीज् प्रकाशन,

पृष्ठे- २३२, मूल्य- २५० रुपये

कविता भालेराव – kabhalerao@yahoo.com