08 March 2021

News Flash

समकालीन राजकीय संस्कृतीचं समाजशास्त्र

सध्या आपली सार्वजनिक राजकीय चर्चा प्राण्यांनी गजबजलेली दिसतेय.

सध्या आपली सार्वजनिक राजकीय चर्चा प्राण्यांनी गजबजलेली दिसतेय. अर्थात, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं म्हणणं खरं मानायचं तर साप, मुंगूस, कुत्री, मांजरी, चित्ता आणि वाघ ही प्राण्यांची नावं नसून ते विचारसरणींचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याच म्हणण्यानुसार, मोदींच्या पुनश्च येऊ  घातलेल्या लाटेला घाबरून हे सगळे एकमेकांचे कट्टर शत्रूसुद्धा एकत्र येऊ  पाहताहेत. भाजप आणि मोदींमुळे साप आणि मुंगुसांसारखे हाडवैरी एकत्र येऊ  लागले याचं श्रेय तरी किमान त्यांना द्यायला हवंच! शिवाय यात काही वाईट नाही असंही शहा म्हणालेत. राजकीय विचारसरण्या (?) विसरून सत्ताकारणासाठी एकत्र येणं हे बेहद्द आहेच; पण कुणालाच कुठलीच विचारसरणी नाही हे जाहीररीत्या सर्वानाच मान्य असणं, अशा नैतिकदृष्टय़ा पारदर्शक काळात आपण वावरतोय हेही अद्भुतच म्हणायला हवं. आणि तरीही आपल्याला असं वाटत असेल, की राजकारणाची भाषा किती बीभत्स होऊन गेलीय आणि आपण एका सार्वत्रिक ऱ्हासाच्या कयामत काळात विघटित होत चाललो आहोत, तर आपण आपल्याच नजीकच्या भूतकाळात एक चक्कर मारून येऊ..

पूर्वी- म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात.. ज्याला मराठीत ‘प्रबोधनाचा कालखंड’ म्हणतात- त्या काळातसुद्धा लोक सार्वजनिकरीत्या एकमेकांना बोचकारत, एकमेकांविरुद्ध अद्वातद्वा लिहीत आणि त्यात निरनिराळे प्राणी प्रतीकांच्या रूपात वावरत असत. उदाहरणार्थ, पुण्यातून ‘लोककल्याणेच्छू’ अशा भारदस्त नावानं निघणाऱ्या एका वृत्तपत्रात ‘गोल्या घुबड’ अशी सही करणारा आणि आपला पत्ता ‘शनिवारवाडय़ाचा पडका बुरुज’ असा सांगणारा कुणी इसम व्यंगपत्रे लिहीत असे. या पत्रांना ‘ज्ञानप्रकाश’मधून उत्तरं दिली जात आणि या संवादात अनेक कुचाळक्या होत असत. ठाण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘अरुणोदय’ या वृत्तपत्रात या प्रकाराबद्दल ३० मार्च १८७३ रोजी एक गमतीदार स्फुट प्रसिद्ध झालं होतं :

‘पुण्याचा ‘ज्ञानप्रकाश’ आणि ‘छू’ (‘लोककल्याणेच्छू’ला ‘छू’ म्हणणं म्हणजे उदाहरणार्थ थोरच!) यांचा अलीकडे बराच तंटा चालू आहे. याची कारणे वेळोवेळी वेगळाली बाहेर येतात. अलीकडे ‘गोल्या घुबड’ आणि ‘गाढव’ हा एक विषय झालेला आहे. यासंबंधाने प्रकाशाने एक पत्र छापले असून त्यात छूच्या उखाळ्यापाखाळ्या काढलेल्या आहेत. त्यात लिहिले आहे की, ‘अलीकडे गोल्या घुबडाने व खापऱ्या कुंभाराच्या अस्सल गाढवाने फारच कटकट व लाथाळे चालविले आहे व ही कृती करण्यास या बेटय़ा नीच जनावरास घरही तसेच नीच मिळाले आहे. (घर म्हणजे तेच ‘छू’ वृत्तपत्र!) या घराची किंमत दीड रुपयांपेक्षा जास्त नाही. असो. या घराच्या मालकास दोन हजार रुपये पाहिजे होते. कारण दिवाणी तुरुंगात जाण्याचा प्रसंग त्याजवर येऊन अगदी ठेपला आहे. सबब कर्ज मागण्याकरिता गोल्या घुबडाचा मित्र कावळा आणि खापऱ्या कुंभाराच्या अस्सल गाढवाचा स्नेही खेचर याजकडे गेला. पण त्याच्या प्रामाणिकपणाची कीर्ती जगभर पसरली असल्याकारणाने कर्ज मिळाले नाही..’ आम्हांस (म्हणजे अरुणोदयास) वाटते, की एखाद्या विषयाच्या संबंधाने एकमेकांचे वाद होणे हे साहजिक आहे. पण त्यात एकमेकांच्या खासगी उखाळ्यापाखाळ्या काढीत बसणे हे काढणाऱ्याने आपली योग्यता कमी करून घेण्यासारखे आहे.’

या ‘अरुणोदय’ पत्राशी स्पर्धा करणारे एक पत्र ‘सूर्योदय’ नावाने गोपाळ गोविंद दाबक नावाचे गृहस्थ काढत असत. पण त्यांची खरी प्रसिद्धी होती ती ‘हिंदूपंच’ या विक्षिप्त नावाच्या एका व्यंगखोर पत्रामुळे. पुढे या दोन्ही पत्रांची मालकी कृष्णाजी काशिनाथ फडके यांच्याकडे गेली. या पत्रात वात्रटपणाला ऊत आलेला असे. त्यात १३ महिन्यांच्या बालकाने आपल्या आईच्या शीघ्रगरोदरपणामुळे आपली आबाळ होत असल्याबाबत वडिलांना पाठवलेल्या नोटिशीसारखी एखाद् दुसरी अराजकीय गंमत असायची. पण राजकीयदृष्टय़ा विरोधी असणाऱ्या मंडळींना हास्यास्पद करून सोडण्याचं आणि त्यांची खिल्ली उडवण्याचं काम हे प्रामुख्यानं केलं जाई. अर्थात, यात प्राण्यांचा वापर चपखलपणे केला जाई. नेमस्त सुधारकी नेते गोपाळ कृष्ण गोखले हे ‘हिंदूपंच’चे आवडते व्यंगपात्र होते. विठ्ठलराव घाटे सांगतात : ‘‘हिंदूपंच’ गोखल्यांना कधी गाढव बनवी, कधी मरतुकडे तट्टू, तर कधी गोखले पोपट बनून विलायतेला उडून जात आहेत असे दाखवण्यात येई.’

टिळक-आगरकरांच्या भांडणात ‘शेपूट घातलेला ग्रामसिंह’, ‘गंजीवरील पिसाळलेला कुत्रा’ इत्यादी प्राणीसृष्टीतल्या उपमांचा सढळ वापर होत असे, हे तर विख्यातच आहे.

टिळकोत्तर काळात आणि विशेषत: दोन महायुद्धांदरम्यानच्या मत-मतांतरांच्या वावटळीत स्वराज्यप्राप्ती, हिंदू-मुसलमान दुही, अस्पृश्यता निवारण, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद असे अनेक प्रश्न अटीतटीला आले होते आणि त्यानिमित्तानं वादांच्या धुळवडींना तोटा नव्हता. या गोंधळात प्रतीकात्मकरीत्या वापरल्या गेलेल्या प्राण्यांची उदाहरणं निव्वळ थक्क करणारी आहेत. नमुन्यादाखल एकच देतो.

सापांमध्ये सुद्धा जाती आहेत!

रामभाऊ  मंडलिक पेणहून ‘कुलाबा समाचार’ नावाचं जिल्हा वार्तापत्र चालवीत असत. त्यात आलेली ३ जून १९२९ या दिवसाची हकिकत थोडक्यात पाहू : ‘या दिवशी पिठय़ा महादू नावाच्या महार गृहस्थास बेशुद्धावस्थेत डॉक्टरांकडे आणलं असता त्याला ताडे येऊ  लागल्यामुळे त्यांनी फौजदारांना बोलावलं. त्यांनी रोग्याला पाहिल्यावर तर्क केला, की त्याला सर्प वगरे काही विषारी जनावर लागलं असावं. लागलीच त्यांनी रोग्याला एका सर्पमांत्रिकाकडे पाठवलं. तिथले उपचार अपुरे पडल्यामुळे त्याला आणखी एका सर्पमांत्रिकाकडे नेण्यात आलं. त्या मांत्रिकाने रोग्याच्या अंगात सर्पसंचार झाल्याचे निदान करून त्याच्यावर मंत्रित पाणी मारलं आणि सापाला बोलतं केलं. यावेळी मांत्रिक आणि रोग्याच्या अंगात आलेला साप यांची प्रश्नोत्तरे झाली. त्यावेळी सापाने रोग्याचा पाय लागल्यामुळे मी त्याला चावलो असं सांगितलं. पुढे सापाला तुझी जात काय, असे विचारल्यावरून त्यानं आपली जात चांभार असल्याचं सांगितलं. मग तो साप जातीचा चांभार असल्यामुळे त्याला त्या मांत्रिकाने पायताणाची शपथ घ्यायला लावून या रोग्याला त्या सापापासून मोकळं केलं.’ ही सुरस आणि चमत्कारिक हकिकत देऊन ‘कुलाबा समाचार’ पुढे असं सांगतो की, ‘ही हकिकत सरकारी डॉ. कर्णिक यांनी समक्ष पाहिली असून, वरील मजकूर आम्ही त्यांना दाखवूनच प्रसिद्ध करीत असल्यामुळे त्याच्या खरेपणाविषयी संशयाला जागा नाही.. मनुष्यांमधील जातीचे बंड मोडण्याला निघालेल्या सत्यसमाजिष्टांना अथवा जातपात तोडक मंडळांना सरपटणाऱ्या प्राणीवर्गामध्येही जातीचे बंड आहे, हे वरील हकिकतीवरून समजून ते कसे मोडावे याची नवी चिंता यापुढे उत्पन्न न होवो म्हणजे झाले.’

‘बहिष्कृत भारत’मध्ये ही साद्यंत हकिकत देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर अतिशय मार्मिक टिपण्णी केलेली आढळते. आंबेडकर लिहितात : ‘कुलाबा समाचारांतील वरील हकिकत वाचून साप वगैरे सरपटणाऱ्या प्राणीवर्गामध्येसुद्धा जातीचे बंड आहे अशी आमची खात्री होत नाही. मात्र, त्या हकिकतीवरील समाचारकर्त्यांची संपादकीय मल्लीनाथी वाचून माणसांमध्येसुद्धा काही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जातीचे लोक आहेत. ते आपल्या विषारी विचारांनी भोळसर लोकांची विचारशक्ती पंगु करण्याचा प्रयत्न करतात याविषयी आमची खात्री होऊन चुकली!’ (‘ब. भा.’- १६ ऑगस्ट १९२९)

आपला काळ (द्वैअर्थ अभिप्रेत!)

तर अशी ही उदाहरणे तेव्हा आणि नंतरही विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे भाषिक असंस्कृतता आणि अंधश्रद्धा हा काही आपल्याच काळाचा मक्ता नाही. अगदी लांब जायचं नसेल तर आचार्य अत्रेंच्या किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या संपादकीय फटकाऱ्यांची आणि प्रतिपक्षाला नेस्तनाबूत करणाऱ्या भाषणांची आठवण झाली तरी पुरेसं आहे. मे. पुं. रेगेंनी बाळासाहेबांच्या भाषेचं ‘जाणूनबुजून वापरण्यात येणारी अशिष्ट, वाह्य़ात, काहीशी विकृत अशी भाषा’ असं वर्णन केलं होतं. आणि हे केवळ उजव्या विचारसरणीच्या मंडळींचंच वैशिष्टय़ आहे असंही नाही. निरनिराळ्या स्वरूपाचे तीव्र विरोधाभास असणाऱ्या आणि एकाच वेळेस अनेकानेक काळांत वावरत असणाऱ्या आपल्यासारख्या समाजात ही वृत्ती वेगानं पसरताना दिसते आहे. अर्थात आजच्या काळात माहितीची देवाणघेवाण द्रुतगतीनं होत असल्यामुळे आणि जालीय जल्पकांचा सुळसुळाट झाल्यामुळे आपण एका असंस्कृत राजकीय संस्कृतीचा अभूतपूर्व विकास पाहतोय. खेरीज आपल्या राजकीय मतभेदांतून चक्क खून पडायला लागलेले दिसतात. दाभोलकर, पानसरे यांची उदाहरणं विस्मृतीत जाण्यासारखी नाहीत. त्यामुळे असंस्कृत राजकीय भाषेची आपल्याला दीर्घ परंपरा असली तरीही आजच्या काळातली राजकीय संस्कृती मूल्यहीनता आणि अनैतिकता याबाबतीत बरीच पुढे गेलेली दिसते. ही चिंतेची बाब खरीच. खेरीज मागच्या काळात ज्या भाषिक लाथाळ्या होत असत त्यात वैयक्तिक हेवेदावे आणि महत्त्वाकांक्षा जरी असल्या तरीही त्यापेक्षा व्यापक असं काहीतरी पणाला लागलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ‘मला जन्मभूमी नाही’ असं महात्मा गांधींना सांगतात; दादासाहेब खापर्डे आणि त्यांचा मुलगा यांच्यात ‘टिळक विरुद्ध गांधी’ असं जेव्हा रणकंदन होतं; किंवा प्रबोधनकार ठाकरे आणि शाहू महाराज यांच्यातले क्षात्रपीठाबद्दल झालेले मतभेद अथवा लोकमान्य टिळक आणि वा. रा. कोठारी यांच्यातले ‘गीतारहस्या’संदर्भातले वाद असोत; त्याला वैयक्तिकतेच्या पलीकडच्या व्यापक सामूहिक आकांक्षांचे आणि मुक्तीच्या शक्यतांचे संदर्भ होते. त्या अर्थानं आजची राजकीयता ही बरीचशी वैयक्तिक स्वार्थापलीकडे न पाहू शकणारी, सार्वजनिक नैतिकतेला पूर्णपणे फाटा देणारी आणि वंचितांच्या दडपलेल्या अवकाशाचं किमान भानही विसरून निस्सीमपणे पोकळ झालेली दिसते.

त्यामुळे ‘आपला काळ ऱ्हासाचा आहे’ हा विचार मात्र जरासा गुंतागुंतीचा आहे. म्हणजे जर्मन तत्त्वज्ञ कार्ल जास्पर्स यांनी आपल्या ‘मॅन इन द मॉडर्न एज’ या पुस्तकात इजिप्तमधील ४००० वर्षांपूर्वीचा बांबूच्या कागदावरचा एक उतारा उद्धृत केलाय. त्यात लिहिलं होतं : ‘चोरांचा सुळसुळाट आहे. लोक म्हणतात उद्याचा काही भरवसा नाही. भुकेकंगाल डुकराच्या पुढचे अन्न ओढून खातात. कुणाच्याही चेहऱ्यावर हास्य नाही. कलानिर्मिती थंड पडली आहे. माणूस जन्मला नसता तर बरे झाले असते. स्त्रियांनी यापुढे गर्भ धरू नये.’ (भि. वि. मराठे यांनी आल्बेर काम्यू लिखित ‘रिबेल’ या पुस्तकाच्या मराठी भाषांतराला लिहिलेल्या प्रस्तावनेतून.) तर- ही जाणीव बरीच पुरातन आहे. शिवाय यातून ‘मागे सगळं चांगलं होतं..’ असा कलियुगी विचार रुजत जातो. कुठलीही परंपरा कधीच एकरेषीय असत नाही. ती बहुप्रवाही तर असतेच, आणखी विरोधाभासीदेखील असते.

आधुनिकता वजा समाजशास्त्र = गोंधळ

पण मग तरीही काहीतरी गोंधळ झालाय, तो कशाचा नेमका? या प्रश्नाच्या अनेक बाजू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपलं आधुनिकतेशी असणारं संदिग्ध स्वरूपाचं नातं. वसाहतिक काळापासून आपण आधुनिकतेच्या स्वरूपाविषयी संभ्रमात आहोत. आधुनिकता म्हणजे  प्रगती, सामाजिक न्याय, समता, विज्ञान, तंत्रज्ञान, विवेकाधिष्ठित सार्वजनिक व्यवहार आणि स्वातंत्र्य. युरोपीय इतिहासाच्या एका विशिष्ट संदर्भात जन्माला आलेल्या आधुनिकतेनेच वैश्विक आणि सार्वकालिक अशा मूल्यांचा घोष केला. त्यांच्या आधारावर एका बाजूला भारतीय समाजांतर्गत विषमतेच्या चौकटींना प्रश्न विचारणं शक्य झालं, तर दुसरीकडे स्वत: वसाहतवादाच्या चौकटीतून अवतरलेल्या आधुनिकतेने भारतीयांना मात्र वर्णद्वेष्टी वागणूक दिली. समतेचं मूल्य सार्वकालिक आणि वैश्विक मानलं गेलं, पण कायमच ते निव्वळ आश्वासित राहिलं. या आधुनिकतेच्या संपर्कातून जन्मलेल्या आपल्या समाजातल्या नवजागरणातून प्राचीन परंपरेचं गौरवीकरण करणाऱ्या किंवा तिला निव्वळ शोषण-शासनाच्या स्वरूपात पाहणाऱ्या अशा ज्या दोन प्रमुख प्रतिक्रिया उमटल्या, त्या दोन्हीही एकांगी होत्याच; शिवाय आधुनिकतेतूनच जन्मलेल्या होत्या आणि पर्यायानं कायमच परस्परसंबद्ध होत्या. आर्थिक उदारीकरणानंतरच्या आधुनिकोत्तर मानल्या जाणाऱ्या नव्वदोत्तरी काळात जरी आधुनिकतेच्या निश्चित तत्त्वांना प्रश्न विचारले गेले, तरीही त्यातून नव्या अनिश्चितता आणि नैतिक मूल्यांविषयीचेच संभ्रम निर्माण झाले. या कुठलीही राजकीय भूमिका न घेणाऱ्या आणि आत्यंतिक सुखवादी अशा आधुनिकोत्तर आणि नवभांडवलदारी काळात आपण आत्ता उभे आहोत, ही या गोंधळाची दुसरी बाजू.

आधुनिकतेचे आयुध होती : टीका. विवेकावर आधारित असणाऱ्या सार्वजनिक व्यवहारातल्या सामाजिक, राजकीय आणि तात्त्विक टीकेतूनच समता आणि स्वातंत्र्याची वैश्विक मूल्ये प्रत्यक्षात आकाराला येणार होती. ‘कुलाबा समाचार’च्या असंस्कृत राजकीयतेला आणि जातीय अंधश्रद्धेला डॉ. आंबेडकरांच्या बुद्धिनिष्ठ आणि सुसंस्कृत राजकीयतेनं प्रत्युत्तर दिलं. मराठी प्रबोधनकाळात आधुनिकतेच्या आश्वासक उमेदीतून न्याय, स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांसाठीच्या संघर्षांतून नव्या राजकीयतेच्या नैतिक चौकटी रचण्याचा जो प्रयत्न झाला, त्याची पायाभरणी नव्या आधुनिक सामाजिक शास्त्रांनी केली होती. इतिहासकार रामचंद्र गुहा त्यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या महाराष्ट्राला भारतीय आधुनिकतेचं केंद्र मानतात. ‘द एपिसेंटर ऑफ क्रिटिकल थिंकिंग’ असा त्यांचा शब्दप्रयोग आहे. हे जे ‘क्रिटिकल थिंकिंग’ आहे ते ‘२१ अपेक्षित’च्या संचात किंवा एम. बी. ए.च्या कोर्समध्ये सापडत नाही. ते सामाजिक शास्त्रांमधून विकसित करावं लागतं. आणि ही सामाजिक शास्त्रांची आयुधं वापरूनच स्व-टीका करत समाजाची पुरोगामी प्रगती शक्य होते. सामाजिक शास्त्रांतून निर्माण झालेल्या संकल्पना आपल्याला विषमतेची किंवा असमानतेची जाणीव करून देतात. उदाहरणार्थ, ‘जेन्डर’ (लिंगभाव) ही संकल्पनाच आपल्या वैचारिक जाणिवेचा भाग नसेल तर स्त्री-पुरुष विषमतेची जाणीव, मांडणी आणि सोडवणूक करण्याचा प्रयत्न अपुराच राहील. किंवा वर्ग ही संकल्पनादेखील आपल्याला आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय अशा संबद्ध शोषणाचं व्यापक भान देणारी आहे. तिच्या उपयोजनाचा पत्ता नसला तर आपल्या सार्वजनिक विषमतांचे विविध आकार-उकार आपण नीट ओळखू शकणार नाही.

इथे अर्थात मला केवळ बी. ए. किंवा एम.ए.ला शिकवल्या जाणाऱ्या सामाजिक शास्त्रांचा कोर्स नाही, तर आपल्या समाजव्यवस्थेची आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरेची सखोल आणि मार्मिक मीमांसा करणाऱ्या महात्मा फुले आणि लोकहितवादींपासून डॉ. आंबेडकर आणि कॉ. डांगेंपर्यंतची सर्जनशील आणि मुक्तीभिमुख सामाजिक शास्त्रे अभिप्रेत आहेत. आपल्या परंपरेच्या चिकित्सेची ही साखळी- सुहास पळशीकरांची प्रख्यात उपमा वापरायची तर- आपण ‘आखूड लोकांचा प्रदेश’ झाल्यापासून विस्कळीत झाली. त्यांच्या उपमेचा विस्तार करायचा तर, आखूड होत जाणं हा आपला चालू वर्तमानकाळ आहे. आपलं आखूड होत जाणं थांबलेलं नाही, तर ती विस्तारत जाणारी बहुस्तरीय सांस्कृतिक प्रक्रिया बनली आहे.

महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ची निर्मिती करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारच्या कोशांची निर्मिती, महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या साधनांचं प्रकाशन, जागतिक महत्त्वाच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद अशी अनेक कामं या संस्थेतर्फे केली गेली. आधुनिकतेच्या मराठी अनुवादाचा हा अख्खा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय ‘नवभारत’, ‘समाजप्रबोधन पत्रिका’, ‘परामर्श’ अशी वैचारिक नियतकालिके चिकित्सक वैचारिक लिखाण प्रसिद्ध करत होती. या वैचारिकतेचा आणखी एक पदर म्हणजे सत्तरीच्या दशकातल्या महाराष्ट्रभर पसरलेल्या अनेकविध सामाजिक चळवळी-  विज्ञानप्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-मुक्ती, दलित पँथर, मागोवा गट, युक्रांद, सत्यशोधक मार्क्‍सवादी पक्ष, एक गाव- एक पाणवठा चळवळ, दलित साहित्याची चळवळ, साहित्यिक अनियतकालिकांचे प्रयोग या सगळ्या भानगडींतून भरपूर चिकित्सक लिखाण होत होतं. थोडक्यात, वैचारिक लिखाण सातत्याने मराठीत प्रकाशित होत होतं आणि वाचकांची भाषा व लेखकांची भाषा यांतलं अंतर बरंच कमी होतं. त्यानंतर सुमारे ४०-५० वर्षांनी- म्हणजे आज हे वातावरण नाहीये. समाजशास्त्रीय लिखाणाची भाषा आणि वाचकाची भाषा एकमेकांपासून दुरावलेली आहे. याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राने केलेली सामाजिक शास्त्रांची अपूर्व आणि घनघोर उपेक्षा. सामाजिक शास्त्रांचा अभ्यास मागासलेला राहिल्यामुळे वृत्तपत्रं, मासिकं, नियतकालिकं, दूरचित्रवाहिन्या, आंतरजालावरचं लिखाण अशी जी आजची ‘पॉप्युलर’ माध्यमं आहेत, त्यामधला ‘कंटेन्ट’ या आधुनिक समाजशास्त्रातल्या संकल्पनांपासून पूर्णपणे दुरावलेला आहे.

म्हणजे शासकीय पातळीवर, विद्यापीठीय पातळीवर, चळवळी संपल्यामुळे आणि जुन्या वैचारिक नियतकालिकांचेही मृत्यू झाल्यामुळे एकूणच सर्वदूर सार्वजनिक चर्चेत सगळीकडे सामाजिक शास्त्रांची हद्दपारी झालेली आहे. आणि दुसरीकडे आपल्या समाजात जसा जागरूक वैचारिक चिकित्सेचा स्तर निकृष्ट होत गेला तसं हिंसक आणि ज्याला जातीयवादी किंवा अप्रागतिक राजकारण म्हटलं जाईल, त्याची वाढ होत गेली. गेल्या २५-३० वर्षांमध्ये आपण पाहतोय, की संकुचित, असंस्कृत आणि हिंसक राजकीयतेचा विकास महाराष्ट्रात झाला आहे. या राजकीय संस्कृतीचा आपल्या ज्ञानाच्या घसरलेल्या स्तराशी, शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जाशी थेट जैविक संबंध आहे. मराठी आधुनिकतेच्या समाजशास्त्रीय प्रकल्पातल्या सगळ्या वजाबाक्या जमेला धरूनही त्या प्रकल्पाची पुनर्रचना आवश्यक आहे.

काही वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठात केरळच्या सामाजिक इतिहासावर पीएच. डी. करत असलेला एक मित्र मला भेटण्यासाठी मुंबईतील भायखळ्याच्या प्राणिसंग्रहालयाजवळ थांबला होता. मी पोहोचल्यावर उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत होतो, तर तो मला म्हणाला, ‘‘काही हरकत नाही. इतिहास विभाग आणि प्राणिसंग्रहालय यांच्यात तत्त्वत: फरक नसतो. प्राणिसंग्रहालयात प्राण्यांना माणसाळवलं जातं, तर इतिहास मनुष्यत्वावर हाच प्रयोग करत असतो. (‘झू टेम्स अ‍ॅनिमल्स, व्हाइल हिस्ट्री टेम्स ह्य़ुमॅनिटी’) त्यामुळे मी इतिहास विभागात आहे असंच समजून निवांत होतो.’’

आपण प्राणिसंग्रहालयाच्या आत किंवा त्याच्या बाहेर कुठंही असलो तरी सर्वत्र आपल्या बंडखोरीच्या शक्यता बोथट होत आहेत याची जाणीवसुद्धा इतिहास आणि समाजशास्त्रांच्या अभ्यासातूनच निर्माण होणार आहे.

– राहुल सरवटे

rahul.sarwate@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 12:50 am

Web Title: political agenda change with the time in india
Next Stories
1 आजोळ
2 पर्यटकांचा मार्गदर्शक-मित्र
3 वर्तमानाचा स्वशोध
Just Now!
X