पिंपरी -चिंचवड: महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात वेगळीच चर्चा रंगली आहे. अजित पवार हे महायुती सोबत असून श्रीरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार आहेत. बारणे यांनी २०१९ ला झालेल्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. हाच पराभव अजित पवारांसह पार्थ पवारांच्या जिव्हारी लागला होता. संजोग वाघेरे यांनी लग्नाच्या व्यासपीठावर अजित पवारांचा आशीर्वाद घेतल्याने संजोग वाघेरे यांना छुपा पाठिंबा नाही ना? अशी शहरात चर्चा रंगली आहे.

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी शुक्रवारी संध्याकाळी गाठी- भेटीचा कार्यक्रम होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेते ही कार्यक्रमाला हजर होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आले. संजोग वाघेरे यांनी अजित पवारांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतले. यामुळे मावळ लोकसभेत वेगळीच चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले संजोग वाघेरे हे शिवबंधनात अडकले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मावळ लोकसभेची उमेदवारी मिळाली, तर महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली.

हेही वाचा : पिंपरी : मावळमध्ये ‘या’ वाघेरेंचा अर्ज बाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे महायुतीच्या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत बारणेंना प्रचंड मतांनी विजयी करा अस कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आवाहन केलं होतं. त्याच बैठकीत बारणेंनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत अप्रत्यक्षरीत्या पार्थ पवारांच्या पराभवाचा उल्लेख केला होता. अस असलं तरी पार्थ पवारांचा पराभव हा राष्ट्रवादी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या जिव्हारी लागला होता. ते तो पराभव विसरू शकले नाहीत. तेच अजित पवार बारणेंच्या समर्थनार्थ प्रचार करत आहेत. परंतु, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी अजित पवारांचे आशीर्वाद घेतल्याने मावळ लोकसभा आणि पिंपरी- चिंचवड शहरात वाघेरे यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे का? अशी चर्चा रंगली आहे.