‘माझे ‘मी’ पण’ या हेमा लेले यांच्या ‘आत्मवृत्ता’तील दोन मुद्दे मला या पुस्तकाचा मर्मसार वाटतात. एक म्हणजे, ‘पुस्तक लिहिणं, कविता करणं, कार्यक्रम करणं, व्याख्यान देणं, टीव्ही सादरीकरण या माझ्या ऊर्मीबरोबरच मी माझा गृहकृत्यदक्षपणा सहज निभावते. फुगणारी पोळी, चवीष्ट जेवण, प्रसन्न नीट मांडणी असलेलं घर ही फार मोठी यशोगाथा नसली तरी ती बाईची ‘इन्स्टिंक्ट’ भागवणारी गोष्ट असते.’ आणि दुसरं एक नेमकं वाक्य तिथं उद्धृत केलंय. ती म्हणते, ‘माझं आयुष्य रंगवण्यासाठी माझ्या हाती रंग आहेत. या साऱ्या रंगांमध्ये माझं स्वत्व जपत मी रंगते.’
या दोन्हींचा सूर एकच आहे, तो म्हणजे, आपल्या व्यक्तित्वाचे सारे अनोखे पदर अनुभवत असताना आपलं घर, कुटुंब, खुद्द आपण त्या व्यक्तित्वातील छटांनी आनंदित ठेवू शकतो. आपण काय करतो आहोत, याची स्पष्टता आपल्या मनाशी पक्की असेल तर करीअर आणि कुटुंब दोन्हीत आपण आनंद मिळवू शकतो आणि देऊही शकतो.
करीअरीस्ट स्त्रीकडे बघण्याचा भोवतीच्या रिकामटेकडय़ा त्रयस्थांचा दृष्टिकोन बदलायला हे ‘आत्मवृत्त’ दिशादर्शक तर ठरेलच, शिवाय खुद्द रसिकतेनं स्वत:च्या आवडी जपणाऱ्या स्त्रीच्या मनात ‘कुटुंब कर्तव्याकडे दुर्लक्ष तर होत नाही ना’ ही चुकचुकणारी पाल पुसून टाकायलाही मदत होईल.
घर आणि घरापलीकडचं जग जगणाऱ्या, कर्तृत्वामुळं समाजात ‘नाव’ आणि ‘स्थान’ असलेल्या, आता साठीच्या आसपास असलेल्या एका पिढीचेच हे आत्मकथन आहे. या पिढीच्या लहानपणात शाळेतल्या मैत्रिणींमध्ये असलेला निव्र्याजपणा, कला, साहित्य, व्याख्यान, नाटक या भोवतीचं समृद्ध वातावरण, मध्यमवर्गीय घरातील माय-लेकीचं नातं, एकत्र कुटुंबाच्या त्या काळात नातेसंबंध जपण्याचे संस्कार, या साऱ्याचा ‘नॉस्टेल्जीया’ हेमाच्या पिढीच्या साऱ्या जणी हे आत्मवृत्त वाचताना अनुभवतील.
विशेष म्हणजे तिनं वैयक्तिक अनुभव खुलेपणाने मांडत, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा स्वत:चा दृष्टिकोन स्पष्टपणे नोंदवत हे स्वत:चं जीवनसार लिहिलेले आहे. उदाहरणार्थ, ‘निरागस रसिकतेमुळेच अनेक निर्णय मी घेऊ शकले’ किंवा ‘निर्णयाचं स्वातंत्र्य जिचं तिनंच मिळवायचं’ किंवा ‘स्वच्छता राखून काम करता येणं, हे मी कोणत्याही महागडय़ा इंटिरिअर डेकोरेशनपेक्षा महत्त्वाचं समजते. मी चांगली जगले’, ‘बाईची सौंदर्यदृष्टी तिच्यापुरती न राहता ती संबंध घरात शिरते हा माझा स्वानुभव आहे.’.. इत्यादी इत्यादी..
हेमा सहजपणे नोंदवते की, ‘प्रेमाची माणसं आजूबाजूला असणं म्हणजे आपण दखलपात्र आहोत असं मानणं, हे तितकंसं बरोबर नाही ही जाणीव एखाद्या संभ्रमातून बाहेर निघाल्यासारखी ज्या दिवशी होते, तो दिवस क्रांतिकारक मानायला हवा. आपले म्हणून काही विचार असणे, आपल्या अस्तित्त्वाची अविभाज्य लक्षणं निर्माण होणं, आपलं स्वत:चं एक वेळापत्रक असणे, आवडी-निवडीचा रोख स्पष्ट होणं, आपल्याला विचारमग्न करणाऱ्या गोष्टीचा आपल्याला ओढा असणं.. एक ना दोन- अनेक गोष्टी जेव्हा आपण पायरी पायरीने चढू लागतो तेव्हा हळूहळू स्वअस्तित्त्वाची खूणगाठ पक्की व्हायला लागते.’
..आणि ‘माझा बहुरूपी मनस्वीपणा, विविध गोष्टींबद्दलची माझी रसिकता, या साऱ्या गोष्टींसाठी आरती ओवाळायला ना माझा नवरा तयार होता ना आई-वडील, माझी तशी अपेक्षाही नव्हती. पण त्यांच्या मनातील शंका-कुशंका मोकळेपणाने जाणून घेऊन कधी कधी दोन तत्त्व बाजूला ठेवून मी सारा संभ्रम, धूसरता हळूहळू संपवण्यात यशस्वी झाले.’ इतका मोकळा कबुलीजबाबही तिनं दिलाय.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरच्या आठवणी खूप सविस्तरपणे नोंदवल्यात. शाळेच्या काळात गाजणारी रानडे वक्तृत्व स्पर्धा, महाविद्यालयीन काळातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, यूथ फेस्टिव्हल, राजेश खन्नाची क्रेझ, आवडती गाणी, नातूंचं बॅडमिंटन कोर्ट, चिनी आक्रमण, वाजणारे भोंगे, व्हेस्पाचं अप्रूप, प्रजासत्ताकदिनी (२६ जाने. ७१) दिल्लीवारीसाठी झालेली निवड आणि इंदिराजींची झालेली भेट, वेळूचं बन, चिमणगाणी, प्रियचं सादरीकरण, आत्मनेपदी, अंतरंग, सलाम बहारीन या पुस्तक लेखनाचे नि प्रवासाचे अनुभव, मंगलामुळे झालेली आशा भोसले भेट, ग्लॅमरचं जग अशा अनेक आठवणी.
‘डॉ. श्रीरंग संगोराम यांनी माझ्यामधल्या लेखिकेची ओळख मला प्रथम करून दिली. शिक्षणाचा भविष्य निर्णय घ्यायला कारणीभूतही डॉ. संगोरामच!’ हे ऋण ती मानते आणि ‘परकीय लेखकांनी लिहिलेली मराठी व्याकरणे’ हा पीएच.डी.चा विषय घेण्याचा सल्ला विंदा करंदीकरांनी दिला हेही आवर्जून सांगते.
हे ऋणनिर्देश करत असताना मोहन, स्मिता, किशोर कदम, आनंद मोडक, सुमित्रा भावे, अनुया पालेकर, नाना पाटेकर, माधुरी पुरंदरे, सचिन, सोनू निगम, टी.ए.तले सहकारी अशा सर्व कलावंतांशी असलेले ऋणानुबंधही ती मांडते.
नवऱ्याचा आजार, स्वत:चं ब्रेस्ट कॅन्सरचं आजारपण, राजकीय संघटनेची लढाई करताना स्वत:तल्या प्राध्यापिकेचा झालेला अंत, अशा दु:खद गोष्टीही सांगते आणि म्हणते, ‘स्वप्नभंग नव्हे स्वप्नांचा तपशील बदलला.’ व्वा! या साऱ्या चढ-उतारात तिचं ‘आनंदस्वप्न’ एकच – ‘‘पीएम’ परफ्यूम लावून, हिरा, नवी रेशमी साडी घालून कविता गाता यावी.’
बी.ए. फायनलला असताना व्यक्तिगत जीवनात लग्न, अपघात, प्रेग्नन्सी अशा अनेक उलथापालथी झाल्या, पण विद्यार्थिनी म्हणून मी या काळातही जागरूक होते. म्हणून बी.ए.ला मराठी घेऊन पहिली आले. सुवर्णपदक मिळवलं. तसेच मधुराशी असलेलं लव्ह-हेट रीलेशन, सुभाषच्या (नवरा) आजारात ‘योगेश’चा शांतपणा, असं मुला-मुलीशी असलेलं नातं सांगताना, हीना आणि पराग या सून-जावयाचे नातेसंबंधही खुलेपणाने मांडते. कथा – कादंबरीत शोभावी अशी स्वत:च्या बाबांच्या पूर्वायुष्याची कहाणी आणि योगेशचा स्पर्श घडवलेली आजी, परफेक्शनचा ध्यास शिकवलेली ‘माँ’ हे सारं मुळातूनच वाचायला हवं!
‘माझे ‘मी’ पण’- हेमा लेले,
उन्मेष प्रकाशन,
पृष्ठे-२५६ , मूल्य- ३०० रुपये

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी