‘जन ठायीं ठायीं तुंबला’ या विनय हर्डीकर यांच्या ग्रंथाचे महत्त्व राजकीय अर्थकारणाच्या संदर्भात मलाच्या दगडासारखे आहे. कारण हा ग्रंथ केवळ राजकीय लेखांचा संग्रह नाही, तर या ग्रंथाचा आशय अर्थकारणाच्या समीक्षेचा आहे. २००७ मध्ये लियोनिड हर्विक्झ, एरिक मॅस्किन, रॉजर मायरसन या तीन अर्थशास्त्रींना नोबेल पुरस्कार देण्यात आला. या तिन्ही अर्थशास्त्रींनी वेगवेगळी भाषणे केली, परंतु भूमिका जवळपास समान मांडली होती. ती म्हणजे, राजकीय संस्था आणि आर्थिक संस्थांच्या एकीकरणाची आवश्यकता. इतकेच नव्हे, तर दोन्ही संस्था परस्परावलंबी असणाऱ्या आहेत. त्यामुळे राज्यशास्त्राला तोडून अर्थशास्त्राला प्रमुखता देता येत नाही, अशी स्पष्ट भूमिका मायरसन यांनी घेतली होती. प्रत्येक सामाजिक संस्थेला आर्थिक व राजकीय पलूचा आधार देऊन तिची उभारणी करावी लागते.  या दोन्ही पैलूंचे मिश्रण सद्सदविवेक बुद्धीने केले तरच अयोग्य निर्णय व विविध अडचणी यांना पार करून जाण्याची क्षमता प्राप्त होत असते. हीच अंतर्दृष्टी हर्डीकर यांच्या या पुस्तकामध्येही दिसून येते.

या ग्रंथातील युक्तिवाद चिरकालीन टिकणारे आहेत, तसेच त्या युक्तिवादाचा विकासही पुढे करता येईल. राजकीय अर्थकारणाची प्रारूपे वेगवेगळी आहेत (समाजवादी, मार्क्‍सवादी, नवमार्क्‍सवादी, आर्थिक सुधारणावादी, हिंदुत्ववादी, इ.). हर्डीकरांचे राजकीय अर्थकारणाचे प्रारूप सर्वच अर्थकारणांची चिकित्सा करणारे आहे. मात्र पुस्तकातील बहुतांश स्पष्टीकरणे ही उदारमतवादी राजकीय अर्थकारणाची दिली आहेत. तसेच समाजवादी-मार्क्‍सवादी द्विक्षेत्रीय (मिश्र अर्थकारण) अशा राजकीय अर्थकारणाचा प्रतिवाद या पुस्तकात केलेला आहे. सामाजिकशास्त्राच्या विशेषीकरणामुळे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र अशा शास्त्रांनी स्वायत्तता जपली खरी, पण त्यामधील आंतरविद्याशाखीय आशय हरवला गेला. हर्डीकरांनी हरवलेला हा राजकीय अर्थकारणाचा आंतरविद्याशाखीय आशय सहज प्रवाहीपणे व औपचारिक भूमिका न घेता स्पष्ट केला आहे. त्यामुळे हा ग्रंथ राजकीय अर्थकारणाची कोंडी फोडणारादेखील आहे.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
special provisions in constitution of india for sc st and obc
संविधानभान : सामाजिक न्यायाची गुंतागुंत
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..

प्रदीर्घ राजकीय अनुभव व चिंतनामधून ‘जन ठायीं ठायीं तुंबला’ ही वैचारिक साहित्यकृती आकाराला आली आहे. अर्थातच हे व्यापक राजकीय लेख आहेत. हर्डीकरांनी व्यापक अर्थाने राजकीय प्रक्रियेचा बहुपदरी वेध घेतला आहे. शहरी-ग्रामीण अशा राजकीय द्वंद्वाचा त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे. हिंदुत्ववादी चळवळीमध्ये त्यांची आरंभीची जडणघडण झाली. त्याचा ठसा या राजकीय लेखांवर उमटलेला दिसतो. परंतु हिंदुत्वाची आत्मचिकित्साही त्यांनी केली आहे. म्हणजेच हिंदुत्व चळवळ आणि त्या चळवळीची समीक्षा हा या पुस्तकाचा एक महत्त्वाचा आशय आहे. तर दुसरा आशय गरहिंदुत्व हा आहे; त्यामध्ये काँग्रेस, समाजवाद, मार्क्‍सवाद, नक्षलवाद, पक्ष व संघटना, इत्यादींचा समावेश होतो. या पुस्तकातील तिसरा आशय शेतीशी संबंधित आहे. तर चौथा आशय मध्यमवर्ग आणि बुद्धिजीवी या स्वरूपाचा आहे. अशा या चौपदरी आशयाचे विश्लेषण पाच भागांमध्ये मांडणीकार राम जगताप यांनी केले आहे. चालू शतकातील एका दशकामध्ये (२००४-२०१५) लिहिलेल्या निवडक २६ लेखांचा या ग्रंथात समावेश आहे. म्हणून समकालीन राजकीय प्रक्रिया यात स्पष्ट झाली आहे. ग्रंथातील पाच विभागांतील लेखांची पाच वेगवेगळी वैशिष्टय़े दिसतात. आरंभीचा विभाग पक्षीय सत्ता स्पर्धा आणि विचारप्रणालीचा ऱ्हास यासंबंधीचा आहे. दुसरा विभाग शेती आणि समाजाचे विश्लेषण, तिसरा विभाग शरद पवार आणि त्यांचे राजकारण, चौथा विभाग व्यक्तीआणि विचार आणि शेवटचा- पाचवा विभाग संकीर्ण स्वरूपाचा आहे. या पाच विभागांमध्ये पक्षीय राजकारण, सामाजिक-आर्थिक हितसंबंध, राजकारणाला वेगवेगळी वळणे देणारे नेतृत्व, विचारप्रणालींचा ऱ्हास आणि विचारप्रणालींचा वेध असे सर्वसाधारणपणे पाच ठळक मुद्दे मांडले आहेत. मूलभूत प्रश्नांवर आधारित मांडणी ग्रंथात केली आहे. त्यामुळे या प्रश्नांना भिडण्याची दृष्टी पुस्तकात दिसून येते. दृष्टी, अंतर्दृष्टी आणि दूरदृष्टी या तीन गोष्टींचा धागा या ग्रंथामध्ये जोडला गेला आहे. दूरदृष्टी जनांच्या तुंबलेपणावर मात करून लोकशाहीला प्रवाही करणारी आहे. अर्थातच, जन आणि लोकशाही यांचा निखळलेला सांधा जोडण्याची आवश्यकता व्यक्त झाली आहे.

निवडणुकीय राजकारण म्हणजे सत्ताकारण हा चर्चाविश्वाचा मुख्य गाभा सातत्याने राहिला आहे. त्यामुळे औपचारिक संस्थांमधील सत्तासंबंधावर खूप लिहिले गेले आहे. परंतु या निवडणुकीय किंवा औपचारिक संस्थांच्या खेरीज चळवळीमध्ये ‘जनां’ची खरी ताकद आहे. त्याकडे दुर्लक्ष होत गेले. साठ-सत्तरीच्या दशकामध्ये तर चळवळींमधील कार्यकत्रे, नेते, बुद्धिजीवी यांना मानसशास्त्रीय आजार म्हणून मांडले गेले. मात्र या वैश्विक प्रवाहाच्या उलटी भूमिका लेखक या ग्रंथात मांडतात. त्यांनी तुंबलेल्या जनांची ताकद प्रवाही करणे हाच लोकशाहीचा केंद्रबिंदू असल्याचे चर्चाविश्व विकसित केले. जनकेंद्रित मांडणीत त्यांनी जनांचीदेखील चिकित्सा केली आहे. जनांच्या चिकित्सेचे प्रतिबिंब या ग्रंथाच्या नावामध्ये सुस्पष्टपणे दिसते. याबरोबरच हर्डीकरांनी ‘जन’ आणि ‘अभिजन’ यांच्यातील सत्तासंबंधांची चिकित्सा करून नवीन सत्तासंबंधांची मांडणी केली आहे. अभिजनांकडे जनांसाठीची विषयपत्रिका नाही, हा त्यांच्या विवेचनाचा मुख्य मुद्दा आहे. या अर्थाने त्यांना भारतीय अभिजन वर्ग हा जनांपासून वेगळा झालेला दिसतो. जनांच्या हितसंबंधांचे प्रतिबिंब त्यांना अभिजनांमधील आणि पक्षांमधील सत्तास्पर्धेत दिसत नाही. थोडक्यात, जन आणि अभिजन यांच्यातील आटलेले संबंध प्रवाही करण्याची त्यांची इच्छाशक्ती पुस्तकामध्ये अभिव्यक्त होते. लेखक स्वत: बुद्धिजीवी भूमिकेत आहेत. त्यांना राजकीय विषयपत्रिका निश्चित करण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे. या अनुषंगाने त्यांनी शरद पवार, प्रमोद महाजन, लालूप्रसाद यादव, नीतिशकुमार, जॉर्ज फर्नाडिस, रा. प. नेने यांच्या राजकीय विषयपत्रिकांची सविस्तर चर्चा केली आहे.

सत्ताधारी होण्याची प्रक्रिया ही ‘काँग्रेसीकरणा’ची आहे, असे भारतीय पातळीवरील चर्चाविश्व आहे. या चर्चेत हर्डीकरांनी भर घातली आहे. काँग्रेसला विचारप्रणाली नाही. परंतु सत्ता हीच विचारप्रणाली काँग्रेस मानते, हा मुख्य मुद्दा लेखक मांडतात. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसची विचारप्रणाली सल असल्याचाही दावा केला आहे. भाजप सत्ताधारी होणे म्हणजे त्यांचे काँग्रेसीकरण घडणे होय, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. ही विश्लेषणाची चौकट सर्वच सत्ताधारी पक्षांना लेखकांनी लागू केली आहे. त्यामुळे कमी-जास्त फरकाने स्वातंत्र्योत्तर काळातील सत्ताधारी पक्ष आणि नेते यांची स्थाननिश्चिती ‘काँग्रेसीकरण’ या प्रारूपात त्यांनी केली आहे. काँग्रेसची भाषाशैली मोघम, घसरडी असते. दिल्लीकेंद्रित धोरण ठरते, त्याबद्दल मतभिन्नता नोंदवली जात नाही.. नेहरू वगळता काँग्रेसकडे राजकीय अर्थकारणाचे वेगळे प्रारूप नव्हते.. काँग्रेस पक्षव्यवस्था घराणेकेंद्रित.. भावनिक लाट.. असे काँग्रेसीकरणाच्या वैशिष्टय़ांचे अनेक उल्लेख या ग्रंथामध्ये सतत येतात. अशा वैशिष्टय़ांना लेखक ‘काँग्रेस संस्कृती’ संबोधतात. काँग्रेस संस्कृतीचे प्रतिबिंब भाजपमध्ये दिसते. या अर्थाने ‘बौद्धिक शोकांतिका’ असे भाजपचे विश्लेषण त्यांनी केले आहे. संदिग्धपणा, द्वय़र्थी, ‘न सांगावे वर्म, जनी असू द्यावे भ्रम’, बाबाराव भिडेंच्या गप्पा व नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ अशी विविध उदाहरणे भाजपच्या काँग्रेसीकरणाची म्हणून यात दिलेली आहेत. संघ म्हणजे शाखा, राजकारण म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे निवडणुका ही राजकीय प्रतिभा आहे, असे विवेचन करत लेखक भारतीय राजकीय पक्ष आणि नेतृत्व यांच्या साहाय्याने होणाऱ्या राजकीय प्रक्रिया म्हणजे काँग्रेसीकरण, असा निष्कर्ष काढतात.

शेती, औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान संस्कृतीचे तुलनात्मक विवेचनही या ग्रंथात आले आहे. शेतीचे आकलन सर्वसमावेशक नाही असा त्यांचा दावा आहे. शेतीबद्दलचे भ्रम त्यांनी स्पष्ट केले आहेत. याबरोबर लेखक शेती म्हणजे नेमकं काय, असा यक्षप्रश्न उभा करतात. मोजमाप, कष्टाचे मूल्य यासंदर्भात लेखक शेतीची चर्चा करतात. शेतकरीविरोधी अस्मितांची मांडणी (लाखांचा पोशिंदा, काळय़ा आईचा लाडका मुलगा, इत्यादी) त्यांनी खोडून काढली आहे. अशा गौरवीकरणाच्या अस्मिता लेखक सहज वितळवतात. राज्यसंस्थेच्या शेतीविषयक बेबनावाची उदाहरणे लेखक मांडतात. थोडक्यात, मध्यमवर्ग, आधुनिक उत्पादन पद्धती, राज्यसंस्था (रयत आणि राजा) किंवा नागरी समाज व शेती यांच्या सहसंबंधांमध्ये शेतकरी शोषित आणि इतर शोषक अशी मांडणी त्यांनी केली आहे. शेतीप्रश्नांची दृष्टी आर्थिक सुधारणा कार्यक्रमाशी सुसंगत अशी मांडलेली आहे. तसेच शेतकरी वर्गातर्गत वर्गरचनेची मांडणी नाकारलेली आहे. शेतीबद्दलचे चर्चाविश्व बदलले आहे. म्हणजे शेती प्रश्न हा एकविसाव्या शतकाच्या आरंभी ‘रियल इस्टेट’ म्हणून व्यवहार करत आहे. (उदा. रस्त्यालगतची जमीन चांगला भाव आला म्हणून विकली) शहर सर्व शेतकऱ्यांना सामावून घेऊ शकत नाही. शहराची ती क्षमता नाही, यांची सुस्पष्ट जाण या ग्रंथात दिसते. अशा विविध समस्यांची दखल घेत त्यांनी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये त्यांची आधुनिक उदारमतवादी दृष्टी दिसते.

सहकार क्षेत्रामध्ये आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाल्याची त्यांनी सविस्तर मांडणी केली आहे. शेतकरी समाज काँग्रेसविरोधात गेला. ती घडामोड ‘शेतकऱ्यांची क्रांती’ या स्वरूपात लेखकाने व्यक्त केली आहे. काँग्रेसविरोधी शेतकरी व शेतकरी संघटनांशी भाजपने जुळवून घेतले. शरद जोशी आणि विविध शेतकरी संघटनांशी तडजोडीची रणनीती भाजपने ठेवली. हा मुद्दा सुस्पष्टपणे यात आला आहे. शेतकऱ्यांचे बंड हा भाजपसाठी एक राजकीय अवकाश होता. तर शेतकऱ्यांचे बंड ही काँग्रेसविरोधी क्रांती होती, असा अर्थ स्पष्ट होत जातो. या अर्थाने हा ग्रंथ राजकीय प्रक्रियेची नवी दृष्टी देणारा आहे. त्यामुळे राजकारणी, धोरण निश्चितीकार, संशोधक, माध्यमकर्मी, संशोधक विद्यार्थी आणि सामान्य वाचक यांच्यासाठी एक सातत्याने हाताशी ठेवण्याजोगा हा ग्रंथ आहे.

  • ‘जन ठायीं ठायीं तुंबला।’- विनय हर्डीकर,
  • जनशक्ती वाचक चळवळ,
  • पृष्ठे- ३४४, मूल्य- ४०० रुपये.

 

– प्रकाश पवार