अनाम हशीम

पॅशनची व्याख्या सर्वासाठी वेगळी असते. मुलगी असो वा मुलगा प्रत्येक जण आपल्या परीने आपले करिअर जोमाने व जिद्दीने करतो. कोणतेही बंधन नसताना मुक्तपणे आपल्याला लागलेला बाईकचा नाद जोपासणारी, वाढवणारी धडाकेबाज, मुलांच्या तोडीस तोड अशी एक तरुणी केवळ या वेडाच्या जोरावर वयाच्या २१ व्या वर्षी स्टंट बायकर होते काय आणि भारतातील पहिली स्टंट बाईकरम्हणून लौकिक मिळवते काय..

पुण्याची अनाम हशीम ही वयाने लहान पण नावाजलेली अशी स्टंट बायकर. बाईकर होण्यासाठी वयाचं जसं बंधन नसतं तसंच बाईकलासुद्धा फक्त वेगाचंच बंधन असतं असं नाही. ‘दंगल’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे महावीर फोगट यांनी जसं जिद्दीने आपल्या मुलींना कुस्ती शिकवली त्याच पद्धतीने वडिलांनी मला बाईक चालवायला शिकवली, असं अनाम म्हणते. मी मूळची लखनऊची आहे. माझ्या बाईक प्रशिक्षणाची सुरुवात लखनऊमधूनच झाली होती. वडिलांनी मला मनापासून बाईक चालवायला शिकवली. आता मला बाईकर म्हणूनच यश मिळालं तेव्हा  त्यामुळे माझ्या वडिलांना माझा गर्व वाटतो, असं तिने सांगितलं.

खरं तर आपल्याला लहानपणापासूनच बाईकर होण्यात रस होता, असं अनाम सांगते. ‘मी शाळेत असतानाच मुलांना बाईक घेऊन स्टंट करताना पाहिलं होतं. इतरांना भीती वाटायची, पण मला त्याची अजिबात भीती वाटली नाही. त्यामुळे जर मला भीती वाटत नाही तर मी हे स्टंट का करू नयेत, असा विचार आला आणि शेवटी मी निश्चय केला की मी स्टंट बाईकर होणार.’ अनामने स्वत:च त्याबद्दलची माहिती शोधली आणि आपलं करिअर उभं केलं. ‘या क्षेत्रात मी माझं करिअर सुरू केलं ती म्हणजे अ‍ॅक्टिवा बाईक घेऊन. ‘चरिस्ट’ नामक स्टंट मी अ‍ॅक्टिवावरून केला. तो माझा पहिला स्टंट होता, तेव्हा मी फक्त १६ वर्षांची होते. माझ्या मित्राने त्याचा व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल झाला. लोकांनी माझ्या या धाडसाला चांगला प्रतिसाद दिला तेव्हा पहिल्यांदा हे वेड काय असतं ते लक्षात आलं. पहिल्याच फेरीत मला तो स्टंट जमला आणि पुढे मी नॉन-गिअर बाईक्सवर स्टंट करायला सुरुवात केली. खरं तर हे स्टंटही मी सुरुवातीला अ‍ॅक्टिवावरूनच केले. ‘होलीगन्स’ म्हणजे जास्त कोणत्याही प्रकारचे सेफ्टी गिअर नसतात अशा बाईक्स घेऊन मी स्टंट्स केले, अशी माहिती तिने दिली. अकरावीत असताना अनाम बाईकर म्हणून नावारूपाला आली होती, मात्र हे सगळं सुरू असतानाच तिला आई-वडिलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. ‘मला त्यांनी इंजिनीअर व्हायला भाग पाडलं, पण मला स्वत: चार र्वष फक्त इंजिनीअिरगसाठी घालवायची नव्हती म्हणून मी माझ्या आई-वडिलांना बाईकरचं व्यवस्थित प्रशिक्षण देणाऱ्या एका स्टंट बाईकर टीमकडे जायची इच्छा बोलून दाखवली. माझ्या वडिलांना माझी आवड आधीपासूनच माहिती होती. त्याआधी मी कोणतंही प्रशिक्षण न घेता बाईकवर स्टंट केले असल्याने माझ्याकडे असलेल्या कौशल्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. दोघांनीही मला परवानगी दिली आणि खरी वाट खुली झाली,’ असं अनाम म्हणते.

प्रशिक्षण घेताना मात्र तिला सुरुवातीला अडचणी येत होत्या. ‘प्रशिक्षणाशिवाय मी बरेच स्टंट एकटी करू शकते, याची सवय आणि आत्मविश्वास असल्याने मी प्रशिक्षण सोडलं. त्यानंतर मी अधिक आत्मविश्वासाने हे काम करू शकले आणि मला त्यात गती मिळाली,’ असं सांगणारी अनाम आता स्वत: तरुण मुलींना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देते आहे. ‘अडीचशे जणींचा माझा मी ग्रुप तयार केला जिथे मला नवीन सहकारी मिळाले त्यातून मी हा व्यवसाय माझ्या परीने वाढवत गेले. समाजात अजूनही मुलामुलींमध्ये या करिअरबाबतीत फरक केला जातो. मला हाच विचार मोडायचा आहे’, असा निर्धार तिने व्यक्त केला.

viva@expressindia.com