News Flash

आऊट ऑफ फॅशन : नॉस्टॅल्जियाचा आजार

‘रोडरॅश’ गेम नव्या स्वरूपात येत्या नोव्हेंबरमध्ये परतत आहे.

 

 

‘आमच्या काळी’ हे बिरुद म्हणजे आईबाबांचा काळ, ही समजूत आता विरत चालली आहे. आता जुन्या काळात रमणारी पिढी एक काळ पुढे सरकली आहे. सध्या २५ ते ४०च्या वयोगटातील पिढीला नॉस्टॅल्जियाचा आजार जडला आहे. अर्थात आज ‘गरज तिथे बाजार’ ही संस्कृती बळकावत आहेच, त्यामुळे या संधीचा फायदा घेण्याचा मोह बाजारपेठेला आवरला नाही.

मागच्या आठवडय़ात फेसबुक चाळताना एक पोस्ट समोर आली. ‘रोडरॅश’ गेम नव्या स्वरूपात येत्या नोव्हेंबरमध्ये परतत आहे. लहानपणी एक तर संगणक हे प्रकरणच नवीन. आजच्या पिढीसारखं पाळण्यातच आयपॅडचे धडे मिळाले नव्हते. त्यावर हा गेम खेळणं, नियमाचं होतं. हा खेळ तसा मोटरसायकल शर्यतीचा. खेळ सुरू करताच दिसायचे हातावर टॅटू, लेदर जॅकेट, हातात बीअरचे कॅन आणि रौद्र हसणारे रावडी..यावरूनच खेळाच्या स्वरूपाची कल्पना यायची. इतर शर्यतीच्या खेळांसारखाच हा खेळ असला तरी या खेळाचं वैशिष्टय़ म्हणजे शर्यतीदरम्यान इतर स्पर्धकांना मारणं, पाडणं, काठीने एकमेकांवर वार करणं. हे सगळं यात करायला मिळायचं. त्यात पडलात तर धावत जाऊन बाईक उचलायची आणि परत पळायचं, पोलिसांनी पकडलं की थेट तुरुंगात. ही सगळी मज्जा त्यात होती. अर्थात वर्णनावरून काहीसा आक्रमक वाटत असला, तरी ९०च्या दशकात हा खेळ न खेळलेल्या मुलांची संख्या अगदीच तुरळक असेल. यंदा हा खेळ परत येतोय, याचं कौतुक सध्या कॉलेजमध्ये असलेल्या पिढीला नसणार, पण २५ ते ३५च्या वयोगटातील पिढीला याचा आनंद जास्त असणार. आज या खेळाचा विषय निघायचा उद्देश म्हणजे, सध्या नव्वदीच्या दशकात जन्मलेली ही पिढी बालपणाच्या आठवणींमध्ये रममाण झाली आहे. त्यामुळे तिला आता ‘आमच्या काळात’चा रोग जडला आहे. अर्थात हा रोग फक्त खेळांच्या बाबतीत नाही, तर कपडे, जीवनशैली, सिनेमा, गाणी या सगळ्याच बाबींमध्ये दिसून येतो. त्यामुळे साहजिकच बाजारपेठेने हा मुद्दा नेमका पकडला आहे आणि नव्वदीच्या दशकातील कित्येक गोष्टी नव्या स्वरूपात पुन्हा येत आहेत. पटत नसेल, तर अगदी आताच ‘जुडवा २’ या सिनेमाचं उदाहरण घेता येईलच. नव्वदीच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक सिनेमा नव्या स्वरूपात पुन्हा आणायचं कारणच मुळी या नॉस्टॅल्जियाच्या आजारात दडलेलं आहे.

एरवी ‘तो काळच वेगळा होता’, ‘आमच्या काळची गाणी, कपडे, खेळ त्याची सर नाही तुम्हाला,’ ‘आमचं बालपणच वेगळं होतं,’ हे सगळे डायलॉग आई-बाबा, आजी-आजोबांच्या पिढीचे ही सार्वत्रिक समजूत होती. पण काळ बदलतो आणि पिढीही. आई-बाबांच्या भूतकाळात रमण्याला चेष्टेत घेणाऱ्या नव्वदीच्या दशकातील पिढीने आता सांसारिक जगात प्रवेश केलाय. नोकरी, लग्न, संसार, मुलं यांचे हिशेब मांडण्यात सध्या ही पिढी गुंतली आहे. आणि नेमकं तेव्हाच त्यांना नॉस्टॅल्जियाच्या भुताने पछाडलेलं आहे. कॉलेजला जाणाऱ्याला शाळा खुणावते. ऑफिस, टॅक्सच्या गोंधळात अडकलेल्याला कॉलेजच बरं वाटू लागतं. लग्न झालेल्यांना बॅचलरच्या जगण्याचा हेवा वाटतो. तसंच काहीसं आता या पिढीचं झालं आहे. अर्थात त्याला कारणही तितकंच साहजिक आहे. ही पिढी आता लग्न, मुलं, एक स्थिर आयुष्याचा विचार करते आहे. त्यात बालपणीचा काळ खुणावत असतोच. या वयात आपल्या व्यापात अडकल्याने मित्रांची आठवण, त्यांना भेटण्यासाठी सवड काढणं, शक्य होत नाही. मग मागे पडलेल्या या गोष्टींची ओढ जाणवू लागते.

नव्वदीचा काळ म्हणजे पॉप स्टाइलचा. नव्याने आलेल्या संगणक, व्हिडीओ गेम्सने या पिढीला भुरळ घातलेली. मारियो, टिक-टॉक, डूम, प्रिन्स ऑफ पर्शिया, अलादिन (विषय निघालाच म्हणून गेल्या महिन्यात डिस्नीने अलादिन सिनेमाची घोषणा केली होती.) ‘शूट द डक’ असे कित्येक खेळ खेळण्यात या पिढीचं बालपण गेलं. संगणकाबद्दलच्या नवेपणामुळे पत्त्याचे गेमसुद्धा आवडीचे होते. कॅसेट्स, कॉडलेस फोन, रंगीत स्केचपेन, प्लॅस्टिकची छोटी खेळणी, वेफर्सच्या पाकिटात मिळणारे खेळ हे सगळं या पिढीचं वैभव. पोकिमॉन, शिंच्यानच्या आधी टॉम अ‍ॅण्ड जेरी, स्कूबी डू, पॉवर पॉफ गर्ल्स या कार्टून्सनी त्यांना वेड लावलं होतं. अगदी कपडय़ांच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास, डिजिटल प्रिंटिंग नुकतंच उदयाला आल्याने भडक, निऑन रंगाचे कपडे, रंगीत, झगमगीत केसांच्या क्लिप्स, प्लॅस्टिक ज्वेलरी, चोकर, क्रॉप टॉप, हाय हिल्स ही या काळाची वैशिष्टय़े. गोविंदा, सलमान, शाहरुख हे या पिढीचे नायक आणि जुही चावला, माधुरी, काजोल, करिश्मा कपूर या नायिका. जुडवा, बीवी नंबर १ अशा सिनेमातून काहीसा उथळ पण रंगेल, मनमौजी काळ तरुणांसमोर उभा ठाकलेला, तर कुछ कुछ होता है, कयामत से कयामत तक यांसारख्या सिनेमातून या पिढीने प्रेमाचे धडे घेतले. हे या पिढीच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेलं होतं. पण त्यांना बाहेर काढत त्यातून बाजारपेठ कमावण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे येत्या काही वर्षांत नव्वदीच्या दशकातील मागे पडलेल्या कित्येक गोष्टी ट्रेण्डमध्ये येताना नक्कीच दिसतील. फक्त कपडे आणि दागिने नाही, तर सिनेमा, गाणी, वस्तूंवर यांचा प्रभाव आवर्जून पाहायला मिळेल. अर्थात याचं कारण भावनिक आहेच पण आर्थिकसुद्धा आहे. ही पिढी आज कमावती झाली आहे. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीवर काहीसा जास्त पैसा खर्च करण्याची तयारी यांची आहे. त्यांच्या तुलनेत विसाव्या दशकातील पिढी अजूनही कॉलेजमध्येच आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर बंधन येतात. महागडय़ा वस्तू खरेदी करण्याच्या बाबतीत नव्वदीची पिढी सध्या थोडी पुढे आहे. त्यामुळे बडय़ा ब्रॅण्ड्सनी हा नॉस्टॅल्जिया नेमका पकडला आहे. स्कूबी डू, जॉनी ब्रोवो, सिल्व्हेस्टर, पॉवर पफ गर्ल्स असे कार्टून्स आवर्जून कपडय़ांवर पाहायला मिळताहेत. ज्वेलरीमध्ये झगमगीत, ग्लिटर शेड्स पसंत केल्या जातायत. कित्येक वर्षांपूर्वी हरवलेली ग्लिटर नेलपॉलिश आता परत आली आहेत. आता तर लिपस्टिकमध्येही ग्लिटरचा वापर होतो. ओव्हर साइज स्वेटर, पोलो टीशर्ट्स, रॅप अराउंड स्कर्ट, मॅक्सी, क्रॉप टॉप, फ्लेअर जीन्स ही याच दशकाची देणी. फंकी टॅटू, ब्राइट हायलाइट केलेले केस, भडक लीप-नेल कलर हेही पुन्हा रॅम्पवर येतंय. मोबाइल कव्हर, बॅग, शूजवर या काळातील आयकॉन, कार्टून्सचे प्रिंट्स पाहायला मिळताहेत. पण हे सगळं परत आणताना त्यातला तोचतोचपणा टाळून नव्या काळानुसार आवश्यक बदलही डिझायनर्स करत आहेत. कारण त्यांचा ग्राहक फक्त मागची पिढी नाही, तर नवी पिढीही आहेच. साहजिकच नव्या पिढीला या वस्तूंची नव्याने ओळख होत आहे. उदाहरण घ्यायचं झाल्यास, ‘रोडरॅश’ गेमच्या नव्या स्वरूपात ग्राफिकची प्रत सुधारली आहे. या पिढीला लक्षात घेऊन गेमचा वेग वाढला आहे. पण हे सगळं होतं असताना ऐंशीची पिढी आणि नव्वदीची पिढी यांच्यातील एक फरक म्हणजे या पिढीने त्यांच्या काळातील गोष्टी नव्याने येताना म्हणजेच त्याच्या ‘रिमिक्स’ आवृत्तीला नाकं मुरडली होती. पण नव्वदीची पिढी मात्र या रिमिक्सचं खुल्या मनानं स्वागत करते आहे. कदाचित या पद्धतीची सुरवातच त्यानी केली असल्यानेही असेल. म्हणूनच हे जुनं अंधाऱ्या पेटाऱ्यात कपाटात पडून न राहता, नवीन स्वरूपात जगासमोर येतंय.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2017 12:35 am

Web Title: changes in lifestyle nostalgia changing fashion
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : आयोडेक्स
2 Watchलेले काही : निसर्गाच्या रौद्र रूपाला पकडताना!
3 व्हायरलची साथ : सर्वश्रेष्ठ प्राणी?
Just Now!
X