News Flash

डाएट डायरी: सुट्टीतली अन्नपूर्णा

‘आई, परीक्षा संपल्यावर छोटीचा काय प्लॅन आहे?’ माझ्या प्रश्नावर आईने अपेक्षेप्रमाणे प्रतिप्रश्न केलाच

डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!

‘आई, परीक्षा संपल्यावर छोटीचा काय प्लॅन आहे?’ माझ्या प्रश्नावर आईने अपेक्षेप्रमाणे प्रतिप्रश्न केलाच – ‘का? तुम्हाला काही करायचं आहे का?’ ‘हो, मे महिन्याच्या सुट्टीत जरा तू तिला काही तरी खायला-प्यायला बनवायला शिकव, म्हणजे माझी सोय होईल. तू घरी नसलीस तर तिने मला चमचमीत खायला करून घालणं गरजेचं आहे. अर्थात ती माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असली तरीही.’ मला माहिती होतं.. मी काय ओढवून घेतेय ते.. तरीही मी बोललेच. आई चक्क हसत म्हणाली, ‘अगं गधडे, बालमजुरीची तक्रार करेल ती’. मग मलाही चेव चढला.. ‘मुळीच नाही. मोठय़ांसाठी काम करणं गरजेचं आहे. मी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे’. झालं.. माती खाल्ली.. तुमच्याही लक्षात आलंच असेल. थोडक्यात सुट्टीचा महिना मला महाग पडणार होता.

आईने बाजारातून चार जुन्या वापरलेल्या कुंडय़ा माती वगरे घालून आणल्या. मला आणि बहिणीला एकामध्ये बेसील, एकात धणे, एकात कांदा आणि एकात बटाटा लावायला सांगितला. आमचे परीक्षेनंतरचे उद्योग सुरू झाले. धाकटी रोज त्यांना थोडं थोडं पाणी घालायची. मी नुसतीच त्या मातीमध्ये कधी खडे टाक, कुंडी पाडायची अॅक्टिंग कर वगरे करून तिला रडवायचे. काही दिवसांनी बटाटा कुजला, कांदा मेला, बेसिल उगवलंच नाही. कोथिंबीर मात्र आली. आम्ही तिघींनी कोिथबिरीवर समाधान मानून बाजारातून बाकीचं सामान आणलं आणि आता स्वत: पिकवलेल्या साधनांसह डिश करायला छोटी सज्ज झाली.

कुरमुरे, शेव आणली. चिंच-गूळ चटणी केली. कांदा, बटाटा कापून धाकटीने मला त्यावर ताजीताजी कोिथबीर पेरून दिली. वा! आज मला त्या ताज्या कोिथबिरीचा वास खूपच आवडला. आमच्या सोसायटीत अनेक जणांनी अशी किचन गार्डन केली आहेत. काहींनी टोमॅटो, कडिपत्ता, पुदिना, कोिथबीर तर काहींनी वाफे करून पालक, मेथी, चवळी, मुळादेखील लावला आहे. भेळेनंतर धाकटीने मला मस्त थंड मँगो कॅन्डी दिली. तिने केलेली. माझं बोलणं बरंच मनावर घेतलं तिने. मी विचारलं कशी केलीस? तर आमरस आणि दूध एकत्र करून कुल्फी साच्यात घालून त्यामध्ये काडय़ा लावल्या. मस्त मॅन्गो कॅन्डी तय्यार. आम्ही सर्वानी त्या गळक्याकॅन्डीज मस्त हात पुसत, अंगावर सांडत, भुरके मारत संपवल्या. सुट्टीतला पहिला मेन्यू पार पडला. भेळ आणि मँगो कँडी.

आता दुसरा दिवस. आईने मला आणि बहिणीला तिला हाताशी घेऊन केक करण्याचा प्लॅन केला. मदा, बटर, अंडी व बेकिंग पावडरचे प्रमाण घेतलं. दादर केटरिंग कॉलेजमध्ये कोटिभास्कर मॅडम आहेत. त्यांनी एकदा सांगितलं होतं – बेकिंग म्हणजे शास्त्र आहे. जर तुम्ही ठरावीक प्रमाण, ठरावीक पद्धतीने, ठरावीक तापमानात तयार केलेत तर केक बनतो. शास्त्राप्रमाणे चव, आकार येतो. त्याला डेकोरेट करायला कला लागते. पाककला. बेकिंग हे शास्त्र आहे आणि कलाही. अर्थात त्यांच्या सांगितलेल्या पद्धतीनुसार सर्व नियम पाळून आम्ही तिघींनी केक केला. तो सुपर झाला. पाच मिनिटांत चाखून, वाटून, मिटक्या मारत खाऊन संपला. मग उद्यापासून मदाविरहित पौष्टिक केक करायच्या मागे आई लागली आहे. मी तिची मुख्य साहाय्यक आहे. केळ्याचा केक, गाजराचा केक, अक्रोड-खजूरचा केक, ओट-मध-बदामाची बिस्किटं हे प्रकार ऐकूनच भूक लागायला लागली. थोडक्यात मे महिना सुरू व्हायच्या आधीच सगळ्या जणी अन्नपूर्णा बनल्या आहेत. तऱ्हेतऱ्हेची सरबतं, अरबट चरबट खाणं आणि मस्त गोड केक.. वा! प्लॅन तर झकास आहे. सुट्टी छान चवदार होणार. अर्थात मलाही कष्ट करावे लागणार आहेतच. आई माझ्या मागे लागणारच, ‘कधी शिकणार हे सगळं.. ब्ला ब्ला ब्ला..’ २१ दिवसांत कुठलीही गोष्ट शिकता येते असं म्हणतात. बघू या खरंच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 1:09 am

Web Title: diet diary of teenage girl 2
टॅग : Diet,Loksatta
Next Stories
1 बावरा मन: इन्सान की औलाद है..
2 खाबूगिरी: अ‘चाट’!
3 मी गुढी बोलतेय.
Just Now!
X