कला माणसाला समृद्ध करत असते आणि याच कलेचा योग्य वापर करणं गरजेचं असतं. हल्ली असाच कलेचा योग्य वापर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी केला जातो जे पर्यावरणाला देखील फायदेशीर ठरत असतं. अनेक तरुण कलाकार अशा पर्यावरणपूरक कलेच्या माध्यमातून सुंदर वस्तू घडवत आहेत. पुण्याच्या स्नेहाली आणि वृषाली पाटील या भगिनी वर्तमानपत्राच्या, कागदाच्या रद्दीचा योग्य उपयोग करून त्यापासून विविध वस्तू तयार करतात.

तसेच वापरलेल्या बाटल्यांचा वापर करून देखील त्या वस्तू बनवतात. ‘अप्सी आर्टी’च्या माध्यमातून या कलात्मक वस्तू बनवतात. यातून काही महिलांना रोजगाराची संधीदेखील उपलब्ध करून देत आहेत. गेली सात र्वष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. पेशाने इंटीरियर डिझायनर असणाऱ्या स्नेहाली म्हणाल्या, ‘‘पर्यावरणाच्या संवर्धनास थोडासा हातभार म्हणून आम्ही हे काम करतो. कागद वाया घालवण्यापेक्षा आम्ही त्याचा वापर वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी करतो. अपसायकलिंग ही कला आहे. आम्ही हाताने तयार केलेल्या या वस्तू दुबई, यूके, बहरीन या देशांत देखील विक्रीसाठी जातात.’’ टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी बनवण्याचं प्रशिक्षणदेखील स्नेहाली आणि वृषाली देतात. पुण्यात आणि मुंबईत त्यांनी असे प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत आणि आता अहमदाबादमध्येही आम्ही वर्कशॉप्स घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अपसायकल्ड वस्तू विकून ‘अप्सी आर्टी’ला मिळणारा मोबदला किंवा नफा हा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या गरजू महिलांना देण्यात येतोय हे विशेष. ‘आमच्याकडची कला आम्ही शेअर करू इच्छितो. याचा जितका प्रसार होईल तितकं ते पर्यावरणासाठी चांगलं ठरेल’. स्नेहाली सांगतात. सोलापूरच्या हिरळी गावात जाऊन देखील महिला बचत गटाच्या महिलांना याचे मोफत प्रशिक्षण त्यांनी दिलेय; जेणेकरून त्यांना स्वत: उदरनिर्वाह यावर त्या करू शकतील.

मुंबईची प्राची बाहुलीकर देखील गेली तीन र्वष ‘आर्ट श्ॉक’ या नावाने याच क्षेत्रात काम करतेय. अपसायकलिंगच्या माध्यमातून अशाच कलात्मक वस्तूंची पुनíनर्मिती करतेय. प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांच्या साहाय्याने लॅम्प, फुलदाणी इत्यादी वस्तू ती बनवते. प्राची म्हणाली, ‘‘मला वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या गोळा करण्याचा छंद आहे. पण त्या नुसत्या ठेवून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करायला हवा. मग मी बाजारात थोडी चौकशी केली, बाटल्या कलात्मक कशा करता येतील यावर विचार केला. मग स्वत: त्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली. केवळ शोभेच्या वस्तू नाहीत तर त्याचा कसा वापर होईल यासाठी प्रयत्नशील असते.’’ अशा प्रकारच्या टाकाऊपासून टिकाऊ गोष्टींना कलात्मकतेची जोड देऊन करण्यात आलेल्या वस्तूंचं प्रदर्शन ‘तंबू मार्केट’च्या माध्यमातून पुण्यात आणि मुंबईत भरवण्यात येणार आहे. मुंबईत ७ आणि ८ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क येथे प्रदर्शन भरणार आहे, तर पुण्यात गुरुगणेशनगर, कोथरुड येथील राजलक्ष्मी सभागृहात १४ आणि १५ मे रोजी भरणार आहे.
– कोमल आचरेकर