News Flash

ब्रॅण्डनामा : ब्रॅण्डपूर्ती

सतत नव्या शोधात असणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे खिळवून ठेवण्याची कसरत ब्रॅण्डना करावी लागेल.

रश्मि वारंग viva@expressindia.com

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

ब्रॅण्ड्स आणि त्यांची सतत बदलती दुनिया हे निराळंच विश्व आहे. आज डिजिटल मीडिया प्रभावी झाल्याच्या काळात ही दुनिया अधिक लकाकत आपल्यासमोर येते. पण तो काळ, जेव्हा ‘ब्रॅण्ड’ ही संकल्पना ठळक नव्हती, तेव्हापासून शंभर, दीडशे, दोनशे वर्ष बाजारात टिकून राहिलेले ब्रॅण्ड आपल्याला थक्क करतात.

गेली सलग दोन वर्षे अशाच १०२ ब्रॅण्ड्सच्या जन्माची कथा, ब्रॅण्डकर्त्यांची स्फूर्तिदायी कहाणी, काही ब्रॅण्ड्सचं लुप्त होणं तर काहींचं सतत शिखरावर राहणं हे सारं आपण ‘ब्रॅण्डनामा’ सदरातून अनुभवलं. येणारा जमाना ब्रॅण्ड्सचाच असेल हे विविध ब्रॅण्ड्सची गाथा चाळताना निश्चितच जाणवतं. सध्या सगळं जग ऑनलाइनमुळे जवळ आलं आहे. कधी न ऐकलेले, पाहिलेले पण जागतिक दर्जाचे ब्रॅण्ड्स एका क्लिकवर आपल्यासमोर येतात. एके काळी परिचितांपैकी कुणी परदेशी गेल्यावर त्यांच्यामार्फत तिथल्या एखाद्या ब्रॅण्डची महती कळायची. मग हस्ते-परहस्ते ती गोष्ट मागवणं, तिची वाट पाहणं आणि नंतर इतरांसमोर तो ब्रॅण्ड मिरवणं ही एक पूर्ण प्रक्रिया असायची. आता मॉलच्या प्रशस्त दुकानांतून, ऑनलाइन खरेदीतून हे सारं इतकं सोपं झालं आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल? तर एकहाती एकसत्ता गाजवणाऱ्या ब्रॅण्डसमोर आपला ग्राहक टिकवण्याचं आव्हान राहील. सतत नव्या शोधात असणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे खिळवून ठेवण्याची कसरत ब्रॅण्डना करावी लागेल. आज दीडशे-दोनशे वर्ष झालेल्या जुन्या ब्रॅण्डना ही आव्हानं नव्हती असे नाही पण त्या काळात तुलनेने स्पर्धा कमी होती. आज एका साबणाचं उदाहरण घेतलं तरी अगणित पर्याय उपलब्ध होतात. ही आव्हानं पेलून बाजारपेठेत सातत्य राखणं कठीण असेल.

ब्रॅण्डनामाच्या निमित्ताने ही आव्हानं यशस्वीपणे पेलणारे उत्पादक, त्यांनी लढवलेल्या युक्त्या सारं सारं अनुभवता आलं. वाचकांनी या सदराला खूपच भरभरून प्रतिसाद दिला. कुणी यातून व्यवसाय मंत्र मिळवला, कुणी कधीही न वापरलेलं एखादं उत्पादन वापरून पाहिलं तर कुणी आठवणीतल्या ब्रॅण्डमधून स्मरणरंजनाचा आनंद मिळवला. ८००० रुपयांच्या भांडवलातून ६००कोटींचं ‘बिबा’चं साम्राज्य उभारणाऱ्या मीना िबद्रा, नापास झाल्यावर फावल्या वर्षांत आवड म्हणून केलेल्या गोष्टीतून ‘बॅगिट’सारखा ब्रॅण्ड निर्माण करणाऱ्या नीना लेखी यांसारख्या महिला ब्रॅण्डकर्त्यांची कथा आश्वासक होती. ‘पुमा’ आणि ‘आदिदास’ हे दोन्ही सख्ख्या भावांचे ब्रॅण्ड्स आहेत किंवा फ्रेंच ऑपेरातील लक्ष्मी या नावाचा ‘लॅक्मे’ हा उच्चार धारण करणारा ब्रॅण्ड भारतीय आहे हा अनेकांना धक्का होता. गोल्डस्पॉट, डालडा, अ‍ॅम्बेसेडर हे आता आठवणीतच राहिलेले ब्रॅण्ड स्मरण्याची गंमत अनेकांनी अनुभवली.

गोदरेज, मिहद्रा अ‍ॅण्ड मिहद्रा, एमआरएफ यांचं भारतीयत्व आणि जागतिक बाजारपेठेतलं वर्चस्व काहींना सुखावून गेलं. काही ब्रॅण्ड्सच्या कर्त्यांनी किंवा त्या ब्रॅण्डचा विशिष्ट विभाग सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून या सदराची घेतलेली दखल सुखावह होती.

या दोन वर्षांत जितके महत्त्वपूर्ण ब्रॅण्ड्स या सदरात समाविष्ट झाले त्याहून कैक अजून बाकी आहेत याची पूर्ण कल्पना आहे. पण या सदराच्या निमित्ताने, एखादा ब्रॅण्ड तुमच्या आवडीचा झाल्यावर त्याची कुळकथा तुम्हाला शोधाविशी वाटली तर ते या सदराचं खऱ्या अर्थाने फलित असेल.

एखादा ब्रॅण्ड फार सहज आपल्या घरात येतो, घरातील अविभाज्य भाग होतो. पण हे सगळं होण्यामागे ब्रॅण्डकर्त्यांनी घेतलेली मेहनत, दूरदृष्टी याकडे आपलं क्वचित लक्ष जातं. आपल्या नकळत आपल्या छोटय़ा छोटय़ा गरजांची काळजी घेणारे हे ब्रॅण्ड्स आणि त्यांची कहाणी म्हणूनच खास आहे. तुम्ही या सदराला जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून आभार! आज या सदराची पूर्ती होत असताना वैविध्यपूर्ण ब्रॅण्डच्या जंजाळात तुम्हाला सर्वोत्तम तेच मिळो आणि नववर्ष इच्छित ब्रॅण्डप्राप्तीचे जावो अशा खास ब्रॅण्डमय शुभेच्छा! ब्रॅण्डनामा आपला निरोप घेत असला तरी ब्रॅण्डशोध आणि ब्रॅण्डप्रेम कायम ठेवू या मंडळी! रामराम!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 2:39 am

Web Title: famous brands interesting stories behind famous brand
Next Stories
1 बॉटम्स अप : भरपूर खा, थोडी प्या, मजा करा..
2 व्हिवा दिवा :  ऐश्वर्या परब
3 आरोग्यम् ‘स्पा’संपदा
Just Now!
X