11 December 2017

News Flash

आऊट ऑफ फॅशन : ‘लुक’ विकणे आहे!

फॅशन शोला जाताना अमुक डिझायनर म्हणजे कपडे, तमुक म्हणजे अ‍ॅक्सेसरीज ही समीकरणं ठरलेली असायची.

मृणाल भगत | Updated: September 22, 2017 12:37 AM

काळ बदलतो, तशी बाजारातील समीकरणंसुद्धा बदलतात. कपडय़ांच्याच बाबतीत बोलायचं झाल्यास आधी फक्त कपडे, दागिने, बॅग्ज, शूज, अ‍ॅक्सेसरी अशी विभागणी करणारी दुकाने आता ग्राहकांना पूर्ण लुक विकू लागली आहेत. अर्थात, ही सोय ग्राहकांची गरज आहे की आळशीपणा हे मात्र येणारा काळच ठरवेल.

अगदी इसापनीतीच्या काळातली नाही, तर कालपरवाची गोष्ट आहे. फॅशन शोला जाताना अमुक डिझायनर म्हणजे कपडे, तमुक म्हणजे अ‍ॅक्सेसरीज ही समीकरणं ठरलेली असायची. त्यामुळे डोळ्यांचा ताण बऱ्यापैकी वाचायचा. कारण त्या ठरावीक डिझायनरच्या शोला फक्त कपडे किंवा बॅग अशी एकच गोष्ट पाहिली जायची. अगदी भारतातील कित्येक नामवंत डिझायनर्सच्या कलेक्शन्समध्ये आजही शूजना तितकंसं महत्त्व दिलं जात नाही. शोची थीम काहीही असो काळे, सोनेरी किंवा चंदेरी हिल्स सगळीकडे जुळून येतात, हा अलिखित नियमच असतो. कित्येकदा शोच्या पाठीमागच्या बाजूला असे शूजचे जोड पडलेले असतात. दोन किंवा तीन डिझायनर्सचा शो एकाच वेळेस असेल, तर सगळ्या शोसाठी एकच शूज घालूनही मॉडेल्स येतात. यामुळे मॉडेल्सचा कपडे बदलण्याचा वेळ वाचतो.  त्यानंतर हळूहळू अ‍ॅक्सेसरीज आणि कपडय़ांचे डिझायनर्स  एकत्र येऊ न एखादा शो करू लागले. बऱ्याचदा बडे अ‍ॅक्सेसरीज ब्रँड असे शो प्रायोजित करतात. कित्येक परदेशी अ‍ॅक्सेसरीज डिझायनर्स भारतात येऊ न इथल्या नामांकित डिझायनर्ससोबत शो करू लागले. त्यामुळे एकाच शोमधून दोघांची प्रसिद्धी होत असे आणि प्रेक्षक आणि ग्राहकाला पूर्ण लुक पाहायला मिळत असे. पण हल्ली डिझायनर्स स्वत:हून कपडय़ांच्या पलीकडे आपल्या कक्षा विस्तारत आहेत. त्यामुळे रॅम्पवर कपडे, दागिने, शूज, बॅग्ज असं संपूर्ण एकाच डिझायनरने सादर केलेलं कलेक्शन पाहायला मिळतं आहे. अर्थात यामागे डिझायनर्सचा उत्साह हे कारण असलं तरी बाजारातील कित्येक बदलती समीकरणं यामागे आहेत. विशेषत: आपल्या खरेदीची मानसिकतासुद्धा यातून दिसते.

मध्यंतरी एका बडय़ा मासिकाच्या मुखपृष्ठावरील फोटो शूटमध्ये रॅम्पवरील लुक जसाच्या तसा उचलल्याची चर्चा होती. एरवी फॅशन शोच्या आधी किंवा नंतर डिझायनर्स आपापल्या कलेक्शन्सचे फोटोज मासिकांना पुरवतात. मासिके त्यातून त्यांच्या थीमनुसार कपडे, अ‍ॅक्सेसरीज निवडतात आणि ते ब्रँडकडून मागवून फोटो शूट करतात. त्यामुळे लुकमध्ये एखाद्या ब्रॅण्डचा स्कर्ट असेल तर टॉप दुसऱ्याचा असतो. बॅग्ज, शूज वेगळ्याचे. यामुळे ग्राहकांना सर्वच ब्रँड्सच्या कलेक्शन्सचा अंदाज घेता येतो. पण एकाच ब्रँडचा पूर्ण लुक वापरण्यामागे त्या विशिष्ट ब्रँडच्या प्रसिद्धी आणि त्यामागचं अर्थकारण हे कारण आहेच. पण त्याचबरोबर ग्राहकांच्या मानसिकतेचा कुशलतेने केलेला वापर हेही त्याचं कारण आहे. एकतर हल्ली वेळेच्या कमतरतेमुळे कपडे, उद्या बॅग, परवा शूज अशी खरेदीची चैन आपल्याला परवडत नाही. त्याऐवजी सगळे घटक एकाच ठिकाणी पुरवणारी बुटिक्स आपण पसंत करतो किंवा थेट मॉलकडे मोर्चा वळवतो. मॉलमधील बडी रिटेल फॅशन चेन्स आधीच ग्राहकांना सर्वच घटक एका छताखाली उपलब्ध करत असतात. त्यांच्याशी स्पर्धा करायची तर डिझायनर्सनासुद्धा फक्त कपडय़ांपुरतं मर्यादित राहण्यापेक्षा अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याकडील उत्पादनांची विविधता वाढवणे भाग असते. मल्टीडिझायनर्स अशी मागणी स्वत:हून डिझायनर्सना करतात. तसंच एखादा ग्राहक नेमका काय विकत घ्यायला दुकानात येईल, याचीही खात्री नसते. कपडय़ांऐवजी बॅग्ज किंवा शूज ही त्याची मागणी असू शकते. किंवा एखादा महागडा ड्रेस घेणं एखाद्याला परवडणार नाही, पण त्याच डिझायनरचा शूज किंवा नेकलेस घेता येऊ  शकतो. हा ग्राहकसुद्धा डिझायनर्सना हातातून घालवायचा नसतो. त्यात ब्रँड नवा असेल, तर जितकी विविधता तितका जास्त ग्राहकवर्ग हे साधं गणित नव्या डिझायनर्ससाठी अगदीच महत्त्वाचं असतं. त्यामुळे ‘क्वर्कबॉक्स’, ‘11:11’, ‘ह्युमस’ असे कित्येक नवे ब्रँड्स आवर्जून अ‍ॅक्सेसरीमध्येही भाग घेतात. नचिकेत बर्वे, सब्यासाची मुखर्जी, मनीष मल्होत्रा, रितू कुमार, अनिता डोंगरे, मसाबा यांसारखे प्रस्थापित डिझायनर्ससुद्धा हा मार्ग निवडू लागले आहेत. अगदीच शूज, बॅग्ज या बडय़ा अ‍ॅक्सेसरीज नाहीत पण क्लच, ब्रोच, ज्वेलरी, बेल्ट अशा छोटय़ा घटकांकडेसुद्धा लक्ष दिलं जातं.

ही झाली ग्राहकाची मागणी, पण ग्राहकाच्या मनोवृत्तीचासुद्धा इथे डिझायनर्स आवर्जून वापर करतात. दहा दुकानांमध्ये दिवसभर फिरून एक ड्रेस घेण्याची संस्कृती आता मागे पडली आहे. आताच काळ ऑनलाइन शॉपिंगचा. अशा वेळी एखादा कु र्ता घेताना त्यावर लेगिंग चांगली दिसते की सलवार की प्लॅझो हे समोरच्या चित्रावरून पाहिलं जातं आणि थेट खरेदी केली जाते. अशा वेळी प्रत्येक डिझायनर आपला पूर्ण लुक वेबसाइटवर टाकणं पसंत करतो. तसेच सोशल मीडियावरील प्रसिद्धी, जाहिराती यात सातत्याने हा लुक ग्राहकाच्या मनात बिंबवला जातो. साहजिकच ग्राहक इतर पर्याय पाहण्यापेक्षा तो अख्खा लुक विकत घेणं पसंत करतो. थोडक्यात एकदा दुकानात आलेल्या ग्राहकाने वस्तू विकत घेतल्याशिवाय बाहेर पडूच नये ही तजवीज यातून होते. यातून ग्राहकाला एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध होतात. हा बदल साहजिकच आपल्या खरेदी प्रक्रियेवर परिणाम करतो. त्यामुळे त्यामागची गंमत जाणून घेणं हे कधीही चांगलंच.

viva@expressindia.com

First Published on September 22, 2017 12:37 am

Web Title: famous fashion designers collections designers look sale