06 March 2021

News Flash

फॅशन परंपरेची..!

 गुढीपाडव्याचा म्हणून एक लुक मुलांसाठी आणि मुलींसाठीही निश्चित झाला आहे.

एरव्ही पारंपरिक प्रथा, सणवार आणि त्या अनुषंगाने येणारा पेहराव, खाणंपिणं सगळ्याच गोष्टींना नाकं मुरडणारी तरुणाई काही सणांना मात्र जाणीवपूर्वक आपलंसं करते. मराठी नववर्षांचा शुभारंभ म्हणजे गुढीपाडवा.. या सणाला मात्र पहाटे-पहाटे सजूनसवरून बाहेर पडलेले तरुणाईचे जथेच ठिकठिकाणी दिसतात आणि याला राज्यभरातलं कुठलंही शहर अपवाद नाही. एकीकडे नव्या उत्साहाचा, नव्या विचारांची सुरुवात क रून देणारा हा सण मराठी मुलामुलींसाठी, विशेषत: मुलींसाठी पारंपरिक फॅशनचा मोठा सोहळा असतो..

गुढीपाडव्याचा सण म्हणजे जोश, उत्साह, नवी सुरुवात. या दिवशी तरुणांमध्ये असलेला उत्साह मोठा असतो. विशेषत: तरुणींसाठी तर पाडव्याचा दिवस म्हणजे हौसेचा भलामोठा दिवस. चैत्र महिना मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यातला पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा नवसंवत्सराचा म्हणजे नववर्षांचा पहिला दिवस. या दिवशी दारोदारी गुढी उभारून नव्या वर्षांचे स्वागत केले जाते. पाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारायची ही आपली जुनी परंपरा आहे. परंपरा जुनी म्हणजे किती? तर असे सांगतात की, त्या ब्रह्मदेवाने जेव्हा ही सकल सृष्टी निर्माण केली, त्या वस्तुमात्रांचा कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी उभारायची. आणखी एक आख्यायिका याच्याशी जोडली गेली आहे. प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस. त्या दिवशी अयोध्यावासीयांनी गुढय़ा, तोरणे उभारून श्रीरामाचे स्वागत केले तो हा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसाची महती तरुणाईसाठी अर्थातच सणपलीकडे जात सोहळा म्हणून साजरा करण्यापुरतीच उरली आहे. या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण ठरतेय ते म्हणजे घराघरांत उभारली जाणारी गुढी आणि पहाटे पहाटे शहराशहरांमधून निघणारी शोभायात्रा. या शोभायात्रेच्या निमित्ताने पारंपरिक पेहरावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जीन्स-शर्ट, वनपीस, क्रॅप टॉप, फार फार तर हटके फॅशनचा कुर्ता, लेगिन्स किंवा पलाझो या अशा फॅशनेबल वस्त्रभांडारात अडकून पडलेल्या मुलींना पाडव्यासाठी मात्र नऊवारीच हवी असते.

नेहमी कामावर जाण्याच्या गडबडीत किंवा कॉलेजच्या धावपळीत कधी तरी ‘ट्रेडिशनल डे’च्या निमित्ताने, तर कधी लग्न-पूजेच्या निमित्तानेच तेवढा कपाटातील पारंपरिक साडय़ा, सदरे, धोती यांना प्रकाशाचा किरण दिसतो. सणावाराचा विचार केला तर हे कपडे फक्त दिवाळी आणि गुढीपाडवा या दोनच सणांना आवर्जून बाहेर पडतात. तेही दिवाळी काही फक्त पारंपरिक पेहरावाशी बांधील नसल्याने संस्कृ ती आणि पारंपरिकता या दोन्हींचा मिलाफ साधायला गुढीपाडव्याचा मुहूर्तच तरुणाईला गाठावा लागतो. गेल्या काही वर्षांत दिवाळी पहाट, मैफली यांना वाढता प्रतिसाद मिळतो आहे, मात्र तरीही दिवाळीच्या दिवशी सगळ्यांनाच घराबाहेर पडता येत नाही. पाडव्याला मात्र आबालवृद्ध आनंदाने, उत्साहाने शोभायात्रेत सहभागी होतात. त्यामुळे शोभायात्रेचे आकर्षण दिवसेंदिवस वाढते आहे. मुंबईत गिरगाव, ठाणे, डोंबिवली, तर पुणे, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्य़ांमध्येही शोभायात्रेचे लोण पसरले असल्याने या सांस्कृतिक सोहळ्यात पारंपरिक पेहरावात बाहेर पडून वेगळी शान अनुभवण्याचे वेड तरुण मंडळींमध्ये दिसून येते आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक जण आपापल्या पद्धतीने, आवडीने वेगवेगळ्या रंगांचे सदरे-पायजमा, पायात कोल्हापुरी, कानात भिकबाळी, डोक्यावर फेटा घालून अगदी थाटात तयार होतात. ‘फॅशन विथ कल्चर’ असा हा मेळ घातला गेला असल्याने या दिवशी पारंपरिक पेहरावाची फॅशन पुरेपूर अनुभवायची आणि त्यासाठी अक्षरश: महिना-महिनाभर तयारीत घालवला जातो.

गुढीपाडव्याचा म्हणून एक लुक मुलांसाठी आणि मुलींसाठीही निश्चित झाला आहे. अर्थात, मुलींना यातही वैविध्य मिळत असले तरी या दिवशी सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडीच नेसण्याचा अट्टहास असतो. त्यामुळे हल्ली नऊवारी साडय़ांमध्येही वैविध्य आढळून येते आहे. येवल्याची पैठणी, कांजीवरम, काठापदराची, जरतारी, बुट्टय़ाची साडी अशा अनेक प्रकारच्या आणि रंगांच्या नऊवारी साडय़ा नेसलेल्या मुली आपल्याला शोभायात्रेत हमखास दिसतात. मात्र त्या एका दिवसाच्या पेहरावासाठी बऱ्याच आधी ठरवून विचारपूर्वक खरेदी केली जाते. ‘‘पाडव्याच्या निमित्ताने स्वत:साठी खरेदी करता येते आणि ही खरेदी दर वेळेपेक्षा वेगळी असते. सहसा मुली टीशर्ट, जीन्स अशा गोष्टींची खरेदी करताना दिसतात; पण पाडव्यासाठी आम्हाला साडी, दागिने या पारंपरिक गोष्टींची खरेदी करता येते,’’ असं श्रुती बोबडे सांगते. पाडवा जवळ आला की माधवबाग, रूप संगम, वर्धमान, फॅशन वर्ल्ड, मंगलदास मार्केट अशा अनेक ठिकाणी आपल्याला तरुणींची वर्दळ दिसून येते. साडी विकत घेत असताना काही जणी साडीचा काठ किती भरदार आहे याला महत्त्व देतात, तर काही जणी साडीचा रंग बघतात. तर काही जणी साडीवरचं नक्षीकाम कसं आहे यावर साडीची निवड करतात. आपल्या हवी तशी साडी आणि त्यातही आपलीच साडी कशी वेगळी ठरेल हा एक्स फॅक्टर लक्षात घेऊन साडी खरेदी करणं यात खरा कस लागतो. नऊवारी नीट नेसवणं, तेही अगदी सकाळी हाही तसा किचकट, सहजी न जमणारा प्रकार. मग आपल्याकडे कोणाची आई, आजी, मावशी, काकू  नऊवारी साडय़ा नेसून देणार याची चाचपणी होते. हल्ली या एकाच नेसवण्याच्या प्रकारासाठी रेडिमेड नऊवारी साडीचा पर्याय निवडला जातो. म्ड्रेससारखी सहज चढवली की काम फत्ते.. मग त्यासाठी आपल्याला हवी तशी ती शिवून घेण्यासाठी खटापट करावी लागते.

एरव्ही कितीही दगदग असली तरी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वत:ची तयारी करणं, साडी नेसून, नटूनथटून उत्साहात मिरवण्यात वेगळी गंमत वाटते, असं देवयानी जोशी सांगते. गुढीपाडव्याला अनेक स्त्रियांना साडय़ा नेसवून देण्यासाठी, फेटे गुंडाळण्यासाठी ऑर्डर दिली जाते. हा दिवस तेही सकाळचा वेळ त्यांच्यासाठी खूप गर्दीचा, खूप कामाचा असतो. चापूनचोपून साडी नेसवून देणाऱ्या या महिला त्या दिवशी पंचवीस ते चाळीस मुलींना साडय़ा नेसवून देतात. साडी कोणती व कोणत्या प्रकारची नेसायची यानुसार त्याची वेगवेगळी रक्कम ठरलेली असते. साडीच्या नेसवण्याच्या प्रकारावरून त्याचीही रक्कम ठरलेली असते. साधारणपणे ३०० रुपयांपासून ८०० रुपये हे फक्त साडी नेसवण्यासाठी घेतले जातात. पारंपरिक म्हटलं की साडय़ांची तयारी ही दागिन्यांशिवाय अर्धवटच असते. इथे दागिनेही पारंपरिक असले तरच तो मराठमोळा साज खुलून दिसणार. त्यामुळे गळ्यात गरसळी, चाफेकळी माळ, चौसरा, चिंचपेटी, वज्रवाळ असे विविध प्रकारचे दागिने शोधले जातात.  हातातही बांगडय़ा, पाटल्या घातल्या जातात. पायात पैंजणांची छमछम, कानात कर्णफुले, बुगडी, झुमके, मग त्याच कर्णफुलांना जोडून केसात अडकवली जाणारी विविधढंगी वेल असे वेगवेगळे प्रकार असतात. या सगळ्यात विशेष म्हणजे नाकातली नथ. प्रत्येक मुलगी गुढीपाडव्याच्या दिवशी साडी नेसल्यानंतर नथ घालण्यास उत्सुक असते.

साडी, दागिने हा सगळा साज सुरू असताना यात भर पडते ती म्हणजे कपाळावरच्या चंद्रकोरीची. आपल्या रूपात भर पाडण्यासाठी, आपली शान मानून मुली कपाळावर चंद्रकोर लावतात. चंद्रकोर ही ठळक आणि चांगली मोठी असायला हवी. पारंपरिक पेहरावाला थोडा मॉडर्न टच हवा. मग त्यासाठी ब्रँडेड गॉगल डोळ्यांवर हवाच. शोभायात्रेत हा मराठमोळा शृंगार करून थाटात उतरायचं म्हटल्यावर डोक्यावर फेटा आणि चालवायला बुलेट हवी. नऊवारी साडी नेसून, सगळा साजसांभार घेऊन बुलेटवर बसून ऐटीत शोभायात्रेत झेंडा घेऊन नेतृत्व करणं हा मुलींसाठी ट्रेडमार्क ठरू लागला आहे. या एका दिवसासाठी, क्षणासाठी सगळी जय्यत तयारी केली जाते. अनेकदा या पेहरावात, सळसळत्या उत्साहाने शोभायात्रेत सामील होऊ न ढोल वाजवणाऱ्या सुंदर ललना हे शोभायात्रेत हमखास टिपलं जाणारं चित्र आहे. गिरगावात, पुणे-कोल्हापुरात होणाऱ्या शोभायात्रेमध्येही आपल्याला दरवर्षी नऊवारी नेसून बुलेटस्वार होणाऱ्या महिलांचे फिरते जथे पाहायला मिळतात. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अपर्णा बांदोडकर या गिरगावातील ‘बुलेटराणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या आवडीमुळे, सहभागामुळे, इच्छेमुळे शोभायात्रेत अशा बुलेटस्वार तरुणींची संख्या दरवर्षी वाढलेली आपल्याला दिसते. दरवर्षी उत्साहाने शोभायात्रेत सहभागी होणारी गौरी जंगम सांगते, ‘‘माझ्यासाठी पाडवा हा सण म्हणजे एक मस्त निमित्त आहे जिथे मला साडी नेसून छान तयार होता येतं. स्वत:ला असं पारंपरिक पेहरावात बघता येतं आणि मग त्यासोबत हटकेगिरी करण्यासाठी गॉगल आणि हातात कॅ मेरा या दोन्ही गोष्टी मस्ट असतात.’’ फॅशन मग ती आधुनिक असो किंवा पारंपरिक.. ती करायला, त्यासाठी खरेदी करायला मुलींना आवडतंच. सण आणि फॅशन दोन्ही साध्य करून देणारा पाडवा हा म्हणूनच प्रत्येकीचा आवडता असतो, असं मत पूनम पाटील हिने व्यक्त केलं.

एकंदरीतच गुढीपाडवा हा आपला वर्षांचा पहिला सण असला तरी त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी निघणाऱ्या शोभायात्रा म्हणजे मुलींना पारंपरिक पद्धतीने सजण्यासाठी, नटण्यासाठी मिळणारा आपला असा हक्काचा दिवस असतो. त्यामुळे याही वर्षी पाडव्याला अशी मराठमोळी, देखणी नार होऊनी बुलेटवर स्वार.. पद्धतीची छबी सगळीकडे दिसेल आणि पाडव्याचा गोडवा अधिक वाढेल. त्या जोडीने या वर्षीची फॅशनची गुढीही उंच उभारली जाईल!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 5:32 am

Web Title: fashion tradition fashion trend
Next Stories
1 ‘बुक’ वॉल
2 ‘जग’ते रहो : भाषाभिमान आणि बरंच काही..
3 फॅशनेबल
Just Now!
X