25 November 2017

News Flash

कल्लाकार : लयदार नृत्यप्रवास

पाचव्या वर्षांपासून ग्रीष्मा नृत्य शिकते आहे.

राधिका कुंटे | Updated: July 14, 2017 12:38 AM

 

अंगभूत लयीला आणि सुरांना तिने नृत्याचे कोंदण दिले. कलाक्षेत्रातील हा झळाळता हिरा म्हणजे गुरू ग्रीष्मा लेले. या लयदार नृत्यप्रवासाविषयी जाणून घेऊ या आजच्या कल्लाकाराकडून..

तंजावूर नृत्यशाळेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भरतनाटय़मचा प्रसार करण्याचे स्वप्न गुरू तेजस्विनी लेले यांनी पाहिले आणि त्यात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांची लेक गुरू ग्रीष्मा लेले हिची. पाचव्या वर्षांपासून ग्रीष्मा नृत्य शिकते आहे. सुरुवातीला तिने आईकडूनच नृत्याचे धडे घेतले. तिच्या दोन्ही आज्या गायनकलेत निपुण होत्या. त्यामुळे कलेचे वातावरण घरातच होते. तिची आई ज्याप्रमाणे घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ा सांभाळत होती, तोच आदर्श ग्रीष्मानेही घेतला.

नृत्यविशारद पूर्ण केल्यानंतर नववी-दहावीपासूनच ती आईच्या हाताखाली काम करत होती. आईकडून शिकत होती. गुरू म्हणून कसे वावरावे, याचा पाठ तिला आईने घालून दिला. कॉलेजला असताना तिने आईसोबत अनेक कार्यक्रम केले. तिने तत्त्वज्ञान या विषयात पदवी घेतलेली आहे. आईचेच गुरू असलेल्या पंडित वेणूगोपाळ पिल्ले आणि जयश्रीताई पिल्ले यांच्याकडे तिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तिचे आरंगेत्रम झाले. भरतनाटय़म नृत्यशैलीतील प्रसिद्ध ग्रंथ ‘अभिनयदर्पण’चा अभ्यास करण्याची संधी ग्रीष्माला मिळाली. पंडित पिल्ले यांचे गुरू पार्वतीकुमार यांच्याकडे तिने आईसोबत ५-६ वर्षे ‘अभिनयदर्पण’ या ग्रंथाचा अभ्यास केला. कालिदास विद्यापीठातून फाइन आर्ट्सची पदवी घेतली आणि त्यात चक्क सुवर्णपदक पटकावले.

तिच्या तंजावूर नृत्यशाळेचे देशविदेशात अनेक कार्यक्रम झालेले आहेत. त्यापैकी काही दौरे मात्र तिच्या मनात घर करून राहिले आहेत. त्याच्या आठवणीत रमताना ती म्हणते, ‘‘आम्ही इटलीला गेलो होतो. आमचे १८ परफॉर्मन्स होते तेव्हा आम्ही बर्चिटो या छोटय़ा शहरात राहत होतो. इतर देशांचे चमू एकेक करून येत होते. वेळेआधीच पोहोचलेले आमचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे मागून आलेल्या एका चमूचे स्वागत करण्यासाठी गेले; पण त्यांच्याकडून मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर त्या चमूच्या शिक्षिकेने भरल्या डोळ्यांनी मला घट्ट मिठी मारली. भाषा वेगळी असल्याने आमचा संवाद होऊ शकला नाही, पण देहबोली आणि डोळ्यांतून आम्ही बोललो. त्यांची नृत्याची कार्यशाळाही घेतली. त्या दिवशी संध्याकाळी शहरात फेरफटका मारायला गेलो असताना एका पेस्ट्री शॉपच्या दुकानदाराने विद्यार्थिनींना पेस्ट्री गिफ्ट देऊन आमच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर एकदा जपानमध्ये माझा सोलो परफॉर्मन्स झाला होता. त्या कार्यक्रमातील सर्वात हृदयस्पर्शी कार्यक्रम असल्याचा जाहीर अभिप्राय मला स्टेजवरून मिळाला. चीनच्या पेकिंग विद्यापीठातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत परफॉर्मन्स आणि पीपीटी प्रेझेंटेशन होतं. त्यात ‘जंगलतोड’ ही थीम होती. त्यावर मी एक बॅले बसवला. भरतनाटय़ममधील गीतांचा वापर करून प्राण्यांच्या चाली दाखवल्या. हे सर्वानाच भावले. आपल्या कलेला अशा प्रकारे जेव्हा रसिकांची निखळ दाद मिळते तेव्हा मन भरून येते. नवा हुरूप येतो.’’

आजवर ग्रीष्माने गीतरामायण, स्त्रीशक्ती, दशावतार, कालियामर्दन अशा अनेक विषयांवर बॅले केले आहेत. सह्य़ाद्री वाहिनीच्या एम२जी२ मालिकेसाठी दिवाळीच्या थीमवर भरतनाटय़म-कथ्थकचे फ्यूजन, मर्सिडीझच्या लाँचिंगच्या कार्यक्रमासाठी भरतनाटय़म-कलाहरी पट्टमचे फ्यूजन, डॉक्टर परिषदेसाठी भरतनाटय़म, ओडिसी, कथ्थक, कुचीपुडी यांचे फ्यूजन अशा अनेक प्रकारे विविध प्रकारचे सादरीकरण केले आहेत.

ग्रीष्मा म्हणते, ‘‘नृत्य बसवताना संगीतही अत्यंत महत्त्वाचे असते, कारण नृत्य अधिक उठावदार होण्यासाठी संगीताचाच उपयोग होतो.’’ ग्रीष्माला स्वत:ला गाण्याची खूप आवड आहे. तिने एकदा लहानपणी तिच्या गुरू लक्ष्मी पार्थसारथी यांचे गाणे ऐकले आणि कर्नाटक संगीताची भूलच तिला पडली. ती त्यांच्याकडे गाणे शिकायला जाऊ लागली. संस्थेच्या कार्यक्रमात जेव्हा ती नृत्य करत नसते तेव्हा तिचा आवाज तरी कार्यक्रमात असतोच. त्याशिवाय तिला चित्रकलाही खूप आवडते. फॅशन डिझायनिंगचीही तिला विशेष आवड आहे.

स्वत: विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोन्ही भूमिकांत वावरणारी ग्रीष्मा म्हणते, ‘‘आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणे, हे एका परीने मोठे शिक्षणच असते. अनेक संज्ञा सोप्या करून, समजतील अशा करून सांगाव्या लागतात. त्या गोष्टींबद्दल नव्याने अधिक सखोल विचार होतो. यातून कळत नकळत बरेच काही शिकायला मिळते. आपल्या विचारांची दिशा बदलते. पुढच्या वेळेचे शिकवणे अधिक प्रगल्भ होत जाते. म्हणूनच मी विद्यार्थिनींना आग्रह करते की, फक्त शिकू नका. तर शिकवायलाही शिका.’’

नृत्य हे पूर्वीसारखे कोशात राहिलेले नाही. आता ते घराघरांत मोकळेपणाने आणि अभिमानाने पोहोचले आहे. नृत्याचा प्रसार वाढला आहे, या पाश्र्वभूमीवर ग्रीष्मा आपली मते मोकळेपणाने व्यक्त करते. ती म्हणते, ‘‘’रिअ‍ॅलिटी शोजचे वाढते प्रस्थ पाहता आता कोणी नृत्यकलेकडे दुर्लक्ष करत नाही; पण नृत्य आत्मसात करण्यासाठी शिकण्यासाठी पुरेसा वेळही देताना दिसत नाही. शास्त्रीय नृत्य शिकायचे तर त्यासाठी एकाग्रता, अभ्यासूपणा, जिद्द, समर्पण वृत्ती लागतेच. हे पालक आणि विद्यार्थ्यांना समजवावे लागते. आताच्या विद्यार्थ्यांना जास्त संधी उपलब्ध आहेत. नृत्याबद्दल जागृती असल्याने पाश्चिमात्य नृत्य प्रकारही शिकवले जातात; पण त्यामुळे काही जण भारतीय शास्त्रीय नृत्याला कमी लेखू लागले आहेत. हे चुकीचे आहे.’’

नृत्य हेच जीवन मानणारी ही तरुण नर्तिका आता गुरू या पदाला पोहोचली आहे; पण तिथेही तिच्यातला विद्यार्थी सतत जागा आहे, हेच आपल्याला सतत जाणवते. त्यामुळे कल्पकता आणि नवनिर्मिती हा आदर्श असलेले भरतनाटय़म हे ग्रीष्मासाठी केवळ नृत्य नाही तर अपार आत्मानंदाचे साधन आहे.

viva@expressindia.com

First Published on July 14, 2017 12:38 am

Web Title: indian classical dancer grishma lele bharatanatyam dancer