untitled-5

चित्र हे संवादाचं माध्यम आहे, असं मानणारी मनस्वी चित्रकार – केतकी पिंपळखरे. ती रंग-रेषा आकारांत जितकी रमते तितकीच मुलांबरोबरच्या कार्यशाळेत रमते. तिच्या कलाकृतींमधून चिंतन-मननातून आलेले विचार दिसतात आणि सामाजिक जबाबदारीची जाणही त्यातून प्रतित होते. केतकीच्या चित्र आणि कलाकृतींचं प्रदर्शन पुणे, मुंबई, चेन्नई, लंडन, ऑस्ट्रिया आदी ठिकाणी भरलेलं आहे. तुर्कस्तान आंतरराष्ट्रीय कला आणि संस्कृती परिषदेतही ती भारताकडून सहभागी झाली होती. या संवेदनशील कल्लाकाराशी बातचीत.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

‘अनेकदा एखादा विचार व्यक्त करायचं माध्यम ठरतं चित्र. विचार व्यक्त होता होता पटकन एखादं चित्र काढलं जातं. म्हणजे अर्थातच लहानपणचं ते काहीतरी गिरबटणं असतं. पुढं भाषा शिकली जाते. शब्द वापरले जातात. मग आपल्या भावना शब्दांत मांडता येतात. कला ही लहानपणापासून अंगात असतेच. म्हणून मलाही लहान मुलांबरोबर काम करायला खूप आवडतं. मुलांसाठी चित्रं काढणं हे खूप सोप्पं साधन असतं. त्यातून ते त्यांचे विचार आणि भावना चांगल्या रीतीनं मांडू शकतात,’ असे विचार मांडते, तरुण चित्रकार केतकी पिंपळखरे.

मध्यंतरीच्या ‘पुणे बिनाले’मध्ये केतकीच्या चित्रकला कार्यशाळेत अनेक दिव्यांग मुलं सहभागी झाली होती. त्यांच्या प्रत्येकाच्या आजाराचं स्वरूप वेगळं होतं. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. त्यांना कागद, कॅनव्हास देऊन रंग हाताळणीची थोडीशी माहिती केतकी देते. मुलं स्वकल्पनेनं चित्र काढतात. त्यांना सांगायची असलेली गोष्ट आपसूकच कागदावर काढली जाते. तो कागद, रंग, ब्रश, पाणी यांच्यासोबत केलेला दंगाच असतो. फक्त त्यातून साकारतं ते चित्रं. एरवी अनेकदा शाळांमधल्या चित्रकलेच्या तासाला मोजूनमापून दिलेला वेळ, माध्यम आणि ठरावीक विषय अशी ठरावीक चौकट असते. त्यातून त्यांना मज्जा येण्यासारखं काही नसतं. त्यांना ते शिकायलाही अवघड असतं आणि त्यांच्या ते लक्षात राहणंही अवघड असतं. पण त्यांना आवडेल, मज्जा येईल, असं काही करायला दिलं तर ते चांगल्या पद्धतीनं करू शकतात. त्यांना मिळालेल्या मोकळेपणामुळं मुलं स्वत:चं असं काहीतरी शोधतात. या दीड-दोन तासांच्या अ‍ॅक्टिव्हिटीतून त्यांना फ्रेश वाटतं. आत्मविश्वास वाढतो. बरेचदा त्यांना काहीतरी शारीरिक त्रास होत असतो. औषधपाणी चालू असतं. चित्रांच्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळं त्यांना रीलिफ मिळतो आणि मज्जाही येते. केतकी पुण्यातल्या एक-दोन संस्थांसोबत चित्रकार्यशाळेचं काम करते. रंग, ब्रश, कॅनव्हास वगैरे ती घेऊन जाते. पहिल्या बिनालेमध्ये तिची शिल्पं, लॅण्डआर्ट वगैरे होती. दुसऱ्या बिनालेत पेंटिंग होतं आणि यंदा तिनं लहान मुलांची कार्यशाळा घेतली.

केतकी सांगते की, ‘कॅनव्हासवर ऑईलपेंटिंग करणं मला खूप पूर्वीपासूनच आवडतं. मध्यंतरीच्या काळात मी अ‍ॅक्रॅलिक कलर्सही वापरले होते. पण ऑइलमध्ये एक वेगळीच मजा असते. मी सिरॅमिक्सही केलं पण ते केवळ बदल म्हणून. काही वेळा स्टुडिओत काम करताना एकटेपणा येतो कधी कधी.. आपण, रंग आणि कॅनव्हास. पण सिरॅमिकमुळं एखादं वर्कशॉप करायला, इतरांसोबत काम करण्यामुळं कामात थोडासा सर्जक बदल मिळतो. पण एरवी माझं सगळं काम ऑइलमध्ये आणि कॅनव्हासवर असतं.’

केतकीच्या चित्रांमध्ये आणि इतर कलाकृतींमध्ये ‘चेहरा’ हा एलिमेंट प्रकर्षांनं जाणवतो. त्याबद्दल ती सांगते की, ‘मी चित्र काढायला सुरुवात केली तेव्हा मला डोळेच काढायला खूप आवडायचे. डोळ्यांची छोटी छोटी ड्रॉइंग्ज काढत राहायचे. माझे आईवडील खूप छान चित्र काढायचे. सांसारिक कामांमुळं आईचं चित्र काढणं मागं पडलं, तरी तिचं ड्रॉइंग खूपच सुंदर होतं. तिच्याकडच्या स्केचबुकमध्ये त्या काळच्या अभिनेत्री उदाहरणार्थ- शर्मिला टागोर, मुमताज वगैरेंचे डोळे ती काढायची. ते मला बघायला फार आवडायचं. मीही तसे डोळे काढायला लागले. पुढं हळूहळू चेहरा काढायला शिकले. त्यातून आपसूकच एक भाव उमटू लागला. मुद्दाम एखादी भावना उमटवायचा प्रयत्न कधीच केला नाही. डोळे एकदम बोलके व्हायचे. अनेकदा माझा मूड असायचा तसे डोळे यायचे. मग त्यात अधिक-उणं काढलं की, त्यांचा भाव बदलायचा. भावनांचं ते सहज प्रगटन होतं. त्यानंतर फिगर काढू लागले. मग अ‍ॅक्शनकडं गेले. सध्या अ‍ॅबस्ट्रॅक्शन आणि थोडंसं रिअलॅस्टिक असं संमिश्र स्वरूपाची असतात माझी चित्रं.’

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आणि जुन्या चित्रकारांपैकी व्हॅन गॉग वगैरेंबद्दल आपण वाचतो आणि त्यांची चित्र आपल्याला आवडतात. पण आपल्या इथल्या चित्रकारांपैकी दोन जण केतकीचं प्रेरणास्थान ठरले. त्यांच्याकडून तिला प्रोत्साहन मिळालं. ती सांगते की, ‘मला दोन चित्रकारांचा सहवास लाभला पुण्यात. एक माझ्या कॉलेजचे तत्कालीन डीन होते ज्येष्ठ चित्रकार मुकुंद केळकर आणि दुसरी माझी आत्या ज्येष्ठ चित्रकार शोभा पत्की. त्यांच्या स्टुडिओमध्ये मी लहानपणापासून जायचे. त्यांच्यामुळं चित्रकलेतला आत्मविश्वास मला लहानपणीच गवसला. माझ्यासमोर कॅनव्हास ठेवला जायचा आणि त्यावर काहीही काढण्याची मुभा मला होती. ऑइलपेंट्स मी त्यांच्याकडून शिकले. माझ्या कलादृष्टीला दोघांनी खूप आकार दिला. पुढं मी कमर्शिअल आर्ट केलं. केळकर सरांनीही मला खूप काही शिकवलं. त्यांची पेंटिंग्ज मला फार आवडतात. आत्याच्या चित्रांचीही एक विशिष्ट शैली आहे, मात्र मी ती शैली आत्मसात करावी, असं तिनं कधीच म्हटलं नाही. स्वत:ची शैली निर्माण करा, अशी तिची शिकवण होती. पुढं फग्र्युसनमधून मी फोटोग्राफी शिकले. आताशा डिजिटल कॅमेरामुळं गोष्टी खूपच सोप्या झाल्या आहेत. आता कुणीही केव्हाही फोटो काढतात.’

केतकीच्या चित्र आणि कलाकृतींचं प्रदर्शन पुणे, मुंबई, चेन्नई, लंडन, ऑस्ट्रिया आदी ठिकाणी भरलेलं आहे. त्यातल्या काही आठवणी ती शेअर करते. ती सांगते की, ‘मुंबईतल्या जहांगीर कलादालनात माझ्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. सामान्य रसिकांसोबतच जाणकार मंडळींचे चांगले अभिप्राय मिळाले. त्या प्रदर्शनादरम्यान साध्या माणसांशी चित्रांबद्दल गप्पा मारायला खूप मज्जा आली होती. तुर्कीमध्ये मला चौथ्या आंतरराष्ट्रीय कला आणि संस्कृती परिषदेसाठी बोलावलं होतं. सिनेमा, संगीत क्षेत्रासह शिल्पकार, चित्रकार आदी वेगवेगळ्या कलाक्षेत्रांतली कलाकार मंडळी होती. तिथं भारतीयांचा दृष्टिकोन मी चित्राच्या माध्यमातून मांडला होता. तिथल्या लोकांशी बोलायला मला खूप छान वाटलं. त्यांना आपल्या संस्कृतीविषयी खूप उत्सुकता होती. माझ्यासारखी एक संसारी बाई एवढय़ा लांब चित्रांचं प्रदर्शन करायला कशी काय येते, वगैरे खूप प्रश्न पडले होते त्यांना. अशा वेळी आपण केवळ कलाकार राहात नाही तर आपल्या संस्कृतीचे, देशाचे प्रतिनिधी होऊन जातो. तो खूप छान अनुभव होता. अर्बन इंडिया – भारतातल्या शहरांचा तोंडावळा कसा आहे, ते अप्रत्यक्षपणं आपण त्यांना सांगू लागतो अशा वेळी. त्या दिवशी आपल्याला भेटलेली लोकं किंवा वर्कशॉपमधले सदस्य असोत, त्या लोकांच्या मनात भारतीय स्त्रीविषयी एक प्रतिमा निर्माण होते. त्यांच्याकडची खूप कमी लोकं भारतात येतात. सामान्यांना ते परवडत नाही, ते टीव्हीवर जे बघतात तेच. तिथल्या टीव्हीवर भारताची प्रतिमा बरीचशी ग्रामीण भाग, गरिबी अशी आहे. त्यामुळं आपल्याला बघून त्यांना आश्चर्य वाटतं. ही परिषद मुख्यत्वे पर्यावरणाच्या संदर्भातली होती. त्या अनुषंगानं एक चित्र होतं. मी International Contemporary Artist’s Residency मधल्या चित्रप्रदर्शनासाठी दुसऱ्या विषयावरचं चित्र काढलं होतं.’

केतकीचं सध्या आपल्या भोवतालाच्या गोष्टींसंदर्भात चित्र काढायचं काम चालू आहे. या चित्रांची शैली अमूर्त असून छानपैकी फुरसतीत तिचं हे काम चालू आहे. तिच्यासारख्या संवेदनशील चित्रकर्तीला रंगभऱ्या विचारांच्या भरभरून शुभेच्छा.

 

कलेची एकच एक व्याख्या करता येणार नाही. पूर्वीच्या काळातली कला त्या त्या काळातील कलाकृतींतून आणि तिच्या संदर्भातून उलगडते. त्यातून  अनेकदा तत्कालीन सामाजिक परिस्थिती समजते. त्या काळातलं राहणीमान, विचार त्या त्या कलाकाराच्या दृष्टिकोनातून बघायला मिळतात. – केतकी पिंपळखरे

 

राधिका कुंटे

viva@expressindia.com