03 March 2021

News Flash

एका बिनधास्त मुलीची गोष्ट

(१ ऑक्टोबरला) प्रकाशित होणाऱ्या या कादंबरीचे ट्रेलर सोशल मीडियावर बरेच गाजते आहे.

‘तुम्हाला मी आवडणार नाही. कारण नंबर एक – मी जास्त पैसे कमावते आणि दुसरं – माझं प्रत्येक गोष्टीत स्वत:चं असं स्वतंत्र मत असतं. मी व्हर्जिन नाही. मी लग्नाआधी सेक्स केलाय. हे ऐकल्यावर तर मी तुम्हाला नक्कीच आवडणार नाही.’ ही अशी बेधडक तरुणी राधिका आहे तरी कोण?  तर लेखक चेतन भगत यांच्या नव्याने येऊ  घातलेल्या ‘वन इंडियन गर्ल’ या कादंबरीची ही नायिका आहे. राधिका मेहता – एक सर्वसामान्य वर्किंग वुमन. हिचं लग्न खरं तर अगदी आठवडय़ावर आलंय आता. ती एका टॉप इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये कामाला आहे. सगळं छान वाटतंय ऐकून.. पण तरीही ती असं म्हणतेय की,  मी तुम्हाला आवडणार नाही. उद्याच्या शनिवारी

(१ ऑक्टोबरला) प्रकाशित होणाऱ्या या कादंबरीचे ट्रेलर सोशल मीडियावर बरेच गाजते आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच चेतन भगत यांनी स्त्री व्यक्तिरेखा म्हणून गोष्ट लिहिली आहे. या पुस्तकातून ‘फेमिनिझम’वर भाष्य केलंय, असं चेतन भगत म्हणतात. ते म्हणतात, ‘फेमिनिझम ही कन्सेप्ट स्त्री आणि पुरुष यांच्या समान हक्कांविषयी आहे. त्यात वेगळं किंवा किचकट असं काही नाही, तरीही ते साध्य होत नाही. कारण स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्याकडून असणाऱ्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. आपण कायम स्त्रीला कोणत्याही दोन गोष्टींमध्ये निवड करायला सांगतो – यशस्वी करिअर की घर वगैरे.. या दोन्ही पातळ्यांवर स्त्रीची कसरत होताना आपण पाहतो. याउलट पुरुषांना आपण या दोन्ही गोष्टींमध्ये निवड करायला सांगत नाही. ते विनासायास दोन्हीसाठी एलिजिबल ठरतात.’

भारतीय स्त्री म्हणून कायमच आपल्या डोक्यात एक प्रतिमा असते.  स्त्रीने कसं वागावं, राहावं याची पदोपदी जाणीव स्त्रियांना करून दिली जात असते. मुलीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर समाज तिच्या जडणघडणीची (कधीतरी नको इतकी) दखल  घेत असतो. काय करा, काय नको हे सतत मुलींना सांगण्यात येतं. केवळ स्त्री म्हणून लग्नाच्या वयाचं बंधन, चारित्र्याची व्याख्या, स्वतंत्र विचारांना आडकाठी, कामातील प्रगतीबाबतही काही ना काही टॅबू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तिच्या आवडीनिवडी, गरजा याकडे दुर्लक्ष करून एक स्त्री म्हणून तिने कसं असायला हवं त्या चौकटीत आपण तिला बसवू पाहत असतो. एखादी त्यात बसली नाही की मग ‘अवघड आहे बाई हिचं’ असं तिला ऐकावं लागतं.  काय चांगलं काय वाईट यामध्ये तिच्या चॉइसचा कोणी फारसा विचार करताना दिसत नाही. पण आता यावरही लोक खुलेपणाने बोलताना, लिहिताना दिसतात. अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील आपल्या नातींना लिहिलेल्या पत्रात असंच सांगितलंय की तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण तुम्ही जे काही कराल त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहेत, तेव्हा तुमचे निर्णय तुम्हीच घ्या. या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा या सगळ्यावर चर्चा होताना दिसतेय. सोशल माडियावर असेच विषय ट्रेण्डिंग दिसताहेत. अनेकांनी या पुस्तकाची प्रीऑर्डरदेखील केली आहे. त्यामुळे याविषयी उत्सुकता असल्याचं दिसतंय.

कोमल आचरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:06 am

Web Title: one indian girl chetan bhagat new novel
Next Stories
1 टिपिकल ते कलात्मक नवरात्र फॅशनचा नवा फ्यूजन फंडा
2 यंदा ब्रेकअप आहे..!
3 आय कॅन डू इट!
Just Now!
X