News Flash

खाबूगिरी: ‘शोर्मा’ना क्या!

खाबू मोशाय सौंदर्याचा भोक्ता आहे. त्यामुळेच चवीने खाण्यामागची गंमत खाबू मोशायला कळते

पडद्यामागे लपलेल्या पडदानशींचा दिदार मोहक असतो, असं म्हणतात. आतापर्यंत रोटीच्या नकाबमध्ये लपेटून खाबू मोशायच्या हाती येणारा शोर्मा खायची सवय खाबू मोशायला होती. पण वांद्रय़ाच्या कार्टर्स ब्लू या हॉटेलमध्ये नकाब बाजूला केलेल्या शोम्र्याचा दिदार झाला आणि खाबू मोशायवर उल्फतची आफत ओढवली.

खाबू मोशाय सौंदर्याचा भोक्ता आहे. त्यामुळेच चवीने खाण्यामागची गंमत खाबू मोशायला कळते, असा खाबूचा दावा आहे. उत्तम गाणं, लज्जतदार खाणं आणि बेहोश करेल असं लावण्यं.. खाबू मोशाय एकाच सौंदर्यदृष्टीने सगळ्याचा आस्वाद घेण्यात काही गैर वाटून घेत नाही. आतापर्यंत खाबू मोशायने गाणं आणि खाणं यांबाबत अनेकदा दिल खोल के लिहिलंय. पण आजच नेमकी लावण्याची आठवण कशी झाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं कारण म्हणजे खाबू मोशायने नुकताच खाल्लेला एक पदार्थ!

वांद्रे, खार ही पश्चिम उपनगरं खवय्यांसाठी एक वेगळीच संस्कृती घेऊन येतात. वांद्रय़ात ख्रिस्ती, मुसलमान, गुजराती आणि मराठी अशा सगळ्याच समाजांची सरमिसळ असल्याने इथल्या खाद्यसंस्कृतीला एक वेगळाच आयाम मिळाला आहे. याच वांद्रय़ातील उच्चभ्रूंच्या समजल्या जाणाऱ्या कार्टर रोड भागात कार्टर्स ब्लू नावाच्या हॉटेलमध्ये ओपन शोर्मा नावाचा पदार्थ मिळतो, हे कळल्यावर खाबूने खार-वांद्रे परिसराकडे प्रस्थान ठेवलं. गुगल मॅपवर कार्टर्स ब्लू हे हॉटेल खारपासून जवळ आहे, हे समजल्यावर खाबूने प्रवासाचे पैसे वाचवण्यासाठी खारला उतरायचं ठरवलं.

पश्चिम उपनगरांत खार, सांताक्रूझ आणि विलेपार्ले ही मोठी मोहक उपनगरं आहेत. खार पश्चिमेला ११वा, १२ वा असे अनेक रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांवर अजूनही मुंबईवर साह्य़बाचं राज्य होतं हे पटवून देणारी जुन्या धाटणीची बंगलेवजा घरंही आहेत. पहिल्यांदाच या भागात जात असल्याने खाबूने रिक्षाला पसंती दिली. खारहून रिक्षा खारदांडय़ाच्या परिसरात आली आणि सुक्या मासळीच्या गंधाने खाबूच्या अंतरंगाचा ठाव घेतला. अस्सल मत्स्यप्रेमींच्या पोटात कालवाकालव करणारा हा सुक्या मासळीचा गंध खाबू मोशायला तुर्यावस्थेत घेऊन गेला. या गंधाशी हितगूज करता करता रिक्षा एकदम समुद्रालगतच्या कार्टर रोडवर वळली. कार्टर रोड सुरू झाल्या झाल्या खाबूने कार्टर्स एक्स्प्रेस हे हॉटेल बघून रिक्षा थांबवली.

इथे खाबू मोशायचा गाढवपणा नमूद करायलाच हवा. कार्टर्स एक्स्प्रेस हेच कार्टर्स ब्लू आहे, किंबहुना कार्टर्स ब्लूचं नाव बदलून ते कार्टर्स एक्स्प्रेस झालं आहे, या समजुतीने खाबूने कोणतीही खातरजमा न करता जगज्जेत्या शिकंदराच्या आवेशात कार्टर्स एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला. बरं, या हॉटेलमधल्या मेन्यूकार्डमध्येही लेबनीज पदार्थाना स्थान असल्याने आणि या हॉटेलमध्येही ओपन शोर्मा मिळत असल्याने खाबूचा प्रचंड गोंधळ झाला. पण प्रसंग आल्यावर माघार म्हणून घ्यायची नाही, या बाण्याने खाबूने या हॉटेलमध्येही ओपन शोर्मा मागवला. तो येईपर्यंत गुगल मॅपवर आणखी कार्टर्स ब्लू नावाचं हॉटेल आसपास आहे का, हे शोधलं. हे हॉटेल अगदी ३० मीटर अंतरावरच आहे, हे गुगलरावांनी दाखवल्यावर केवळ डोक्यावर हात मारत खाबूने तो समोर आलेला ओपन शोर्मा संपवला आणि बिल चुकतं करत मुकाटपणे कार्टर्स ब्लूची वाट चालायला सुरुवात केली. कार्टर्स एक्स्प्रेसच्या पुढेच थोडं आतल्या बाजूला समोरच्या फुटपाथवरच कार्टर्स ब्लू ही पाटी वाचून खाबूने पुन्हा एकदा डोक्यावर हात मारला आणि मुकाटपणे कार्टर्स ब्लूची पायरी चढली.

खाबूचं बाकी काहीही असो, एखादा पदार्थ एखाद्या विशिष्ट ठिकाणीच चांगला मिळतो हे कळल्यावर त्या विशिष्ट ठिकाणीच जाऊन खाण्याबाबत तो आग्रही असतो. इथे खाबूने पुन्हा ओपन शोर्मा ऑर्डर केला. आधीच्या हॉटेलपेक्षा वेगळा आणि खाबू मोशायने ऐकलेल्या वर्णनाला साजेचा ओपन शोर्मा खाबूच्या समोर आला आणि तेव्हाच खाबूचं समाधान झालं. शोर्मा म्हणजे वेगवेगळे सॉस, कोबी, सलाड लीव्ह्ज, चिकनचे काही तुकडे एका रोटीत भरून त्याची गुंडाळी केली जाते. हा पदार्थ साधारणपणे आखाती देशांमध्ये उत्तम मिळतो. पण सध्या मुंबईतही शोर्मा अनेक ठिकाणी मिळतो. पण हा ओपन शोर्मा खास प्रकार आहे.

दर दिवशी नकाबमधून केवळ डोळ्यांचा दिदार होणाऱ्या एखाद्या मुलीच्या तेवढय़ाच सौंदर्यावर एखाद्या आशिकने जीव ओवाळून टाकावा आणि अचानक एक दिवस ‘सरकती जाए हैं रुख से नकाब’ असं होऊन तिच्या रूहानी सौंदर्याने त्या आशिकची झोप उडावी, असंच काहीसं खाबूचं झालं. ओपन शोर्मा म्हणजे रोटीच्या आतमधील चिकन आदी स्टफिंग प्लेटच्या मधोमध ठेवतात आणि रोटीचे त्रिकोणी तुकडे करून ते त्या स्टफिंगच्या बाजूने आकर्षक पद्धतीने मांडतात. त्यामुळे इतर वेळी रोटीच्या आवरणात बंदिस्त असलेला मसाला नेमका कसा असतो आणि त्यात काय काय असतं, हे सहज दिसतं. चिकनचे तुकडे, त्यात टाकलेली इतर घासफुस, ऑलिव्ह्जची पखरण आणि बाजूला असलेले फ्रेंच फ्राइज यांच्या नुसत्या दर्शनानेच खाबू थक्कं झाला. विशेष म्हणजे आधीच्या हॉटेलमध्ये खाल्लेला शोर्मा आणि कार्टर्स ब्लूमधली शोर्मा यांची जातकुळीच भिन्न होती. कार्टर्स ब्लूमधला शोर्मा दिसायला तर अप्रतिम होताच, पण चवीलाही नुसता काकणभर नाही, तर हातभर सरस होता. मध्येच येणाऱ्या ऑलिव्ह्जमुळे एक वेगळीच चव या शोम्र्याला लाभली होती.

अशा पद्धतीने एका नाही, तर मूर्खपणामुळे दोन दोन हॉटेलांमधील शोर्मा खाऊन खाबूचं पोट आकंठ भरलं. तरीही इथलं कॅरॅमल कस्टर्ड खायचा मोह खाबूला आवरला नाही. त्यामुळे तेदेखील खाबूने मागवलं आणि त्यावरही डल्ला मारला. हा ओपन शोर्मा इतर शोम्र्याच्या तुलनेत थोडासा महाग आहे. म्हणजे रोटीत गुंडाळलेला शोर्मा इथे १४० ते १८० रुपयांदरम्यान मिळतो. तर ओपन शोर्मा २३० रुपयांना मिळतो. पण इथे जाऊन ही चीज खाल्लीच पाहिजे, अशी आहे. या हॉटेलमध्ये आणखी अनेक लेबनीज, मोगलाई, चायनीज पदार्थही मिळतात. पण ओपन शोर्मा हे खाबूच्या मते इकडलं वैशिष्टय़ म्हणायला हवं.
ल्ल

कुठे – हॉटेल कार्टर्स ब्लू, कार्टर रोड
कसे जाल – वांद्रे किंवा खार स्थानकात उतरून पश्चिमेला २२० क्रमांकाची बस पकडून तुम्ही कार्टर रोडला पोहोचू शकता. किंवा सोबत एखादी जिवाभावाची मैत्रिण असेल, तर खार पश्चिमेकडून खारदांडय़ाला जाणारा रस्ताही खूप रोमँटिक आहे. २० मिनिटांच्या पायपिटीनंतर तुम्ही तिथे पोहोचू शकता. हा रस्ता एवढा सुंदर आहे की, खाबूबरोबर कोणतीही मैत्रिण नसतानाही त्याने हा रस्ता आरामात तुडवला. (दुसरं करेल काय, दोन दोन ओपन शोर्मा खाल्लय़ावर वैराण वाळवंटातही काही पावलं चालल्याशिवाय खाबूला राहावलं नसतं.)

– खाबू मोशाय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2016 1:04 am

Web Title: shorma in carters blue
टॅग : Marathi Artical,Viva
Next Stories
1 सौंदर्याची परिभाषा बदलतेय?
2 ट्रेण्डिंग: ‘मंडे ब्लूज’वरचे उतारे
3 विदेशिनी: केळीच्या सालीवरून गरुडझेप
Just Now!
X