रिलायन्स जिओशी स्पर्धा कऱण्यासाठी व्होडाफोन आणि आयडिया या दोन मोठ्या कंपन्या एकत्र आल्या तसेच एअरटेलही वेगवेगळ्या ऑफर्सच्या माध्यमातून जिओला टक्कर देऊ पाहत आहे. मात्र जिओशी स्पर्धा करताना या कंपन्यांना मोठे नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ जून महिन्यामध्येच व्होडाफोन आणि आयडियाची सेवा ४.८२ मिलियन म्हणजेच ४८ लाख ग्राहकांनी बदलली आहे. तर एअरटेलने १.१२ मिलियन म्हणजेच ११ लाख ग्राहक गमावेल आहेत. यावरुन मागील काही वर्षांपासून टेलीकॉम क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संपल्पना राबवणारी मुकेश अंबानींच्या मालकीची रिलायन्स जिओ इतक्या वर्षानंतरही प्रसिस्पर्ध्यांवर भारी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. जिओच्या ग्राहक संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केवळ जून महिन्यामध्येच ४५ लाख नवीन मोबाईल युझर्स जिओची सेवा वापरु लागले आहेत. यावरुन व्होडाफोन आणि आयडिया तसेच एअरटेलऐवजी अनेकजण जिओला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

नवीन ग्राहक जोडले गेल्याने जिओच्या ग्राहकांची संख्या ३९ कोटींहून अधिक झाली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये टेरिफ हाईक म्हणजे इतर कंपन्यांनी दरवाढ केल्यानंतर अनेक ग्राहकांनी जिओकडे मोर्चा वळवला होता. डिसेंबरमधील दरवाढ आणि लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फीचर फोन्स म्हणजेच बेसिक फोन वापरणाऱ्या अनेकांनी रिचार्ज न करता आल्याने आपली सेवा रद्द केली. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये भारती एअरटेल, आयडिया-व्होडाफोन आणि रिलायन्स जिओने तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच प्रीपेडच्या सेवेमध्ये दरवाढ केली. ही दरवाढ १४ ते ३३ टक्क्यांच्यादरम्यान होती. टेलिकॉम रेग्युलेट्री अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) माहितीनुसार जून महिन्यामध्ये जिओ युझर्सची संख्या ३९ कोटींहून अधिक झाली आहे. यासंदर्भातील वृत्त द मिंटने दिलं आहे.

व्होडाफोन आणि आयडियाने एकत्र येऊन स्थापन केलेल्या व्हीआयला ग्राहक संख्या कमी झाल्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. या दोन्ही कंपन्यांचे मिळून ३०.५ कोटी ग्राहक आहेत. एअरटेलचेही मोठे नुकसान झालं आहे. एअरटेलची परिस्थिती व्हिआयपेक्षा चांगली असली तरी ग्राहकांच्या संख्येत ते रिलायन्स जिओच्या बरेच मागे आहेत. एअरटेलचे देशामध्ये ३१.६ कोटी ग्राहक आहेत. ग्राहक बाजरपेठेतील टक्केवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास सर्वाधिक हिस्सा रिलायन्स जिओचा आहे. एकूण ग्राहकांपैकी ३४.८२ टक्के ग्राहक जिओची सेवा वपरतात. तर एअरटेलचा या बाजारपेठेतील वाटा २७.७६ टक्के इतका आहे.

व्हिआयचा टेलिकॉम ग्राहकांच्या बाजरपेठेतील हिस्सा २७.०९ टक्क्यांवरुन २६.७५ टक्क्यांपर्यंत एका महिन्यात घसरला आहे. अ‍ॅक्टीव्ह युझर्सची माहिती देणाऱ्या व्हिजिटर लोकेशन रजिस्टरनुसार मोबाइल नेटवर्कवर अ‍ॅक्टीव्ह सबस्क्रायबरर्समध्ये ९८.१४ टक्के ग्राहक एअरटेल वापरतात. ८९.४९ टक्के व्हीआय वापरतात तर जिओ वापरणाऱ्यांची टक्केवारी ७८.१५ इतकी आहे.