महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी दिवसातून सर्वसाधारणपणे ११ वेळा त्यांच्याकडील मोबाईलचा किंवा टॅब्लेटचा वापर करतात. वर्गामध्ये तासावेळी एसएमएस पाठविण्यासाठी, ई-मेल बघण्यासाठी तसेच ट्विट प्रसिद्ध करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती पुढे आलीये.
सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्के मुलांनी एसएमएससाठी, ६८ टक्के मुलांनी ई-मेल बघण्यासाठी तर ६६ टक्के विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंग साईटसाठी वर्गामध्ये मोबाईलचा वापर करतो, हे मान्य केले. ३८ टक्के मुलांनी वर्गात तास सुरू असताना वेबसाईट बघण्यासाठी तर आठ टक्के मुलांनी गेम खेळण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करतो, असे सांगितले.
सर्वेक्षणातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लॅपटॉप, मोबाईल, टॅब्लेट या वेगवेगळ्या गॅझेटमुळे शिकण्याकडे आपले दुर्लक्ष होते, हे मान्य केले. २५ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यामुळे आपल्या श्रेणीवर परिणाम होतो, असेदेखील वाटते. अमेरिकेतील वेगवेगळ्या विद्यापीठातील ७७७ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. अमेरिकेतील नेब्रास्का-लिंकन विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक बर्नी मॅकॉय यांनी हे संशोधन केले.