करोना व्हायरसबाबत सतर्क करणाऱ्या आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने या अ‍ॅपमध्ये समस्या येत होत्या. अ‍ॅपला ओपन केल्यानंतर ‘503 टेंपररली अनअवेलेबल’ अशाप्रकारचा Error दिसत होता. अनेक युजर्सना लॉग-इन करण्यासही अडचण येत होती. आरोग्य सेतूच्या टीमने जवळपास दोन तासांनंतर या अ‍ॅपमधील तांत्रिक समस्या दूर केल्यानंतर आता हे अ‍ॅप पुन्हा पूर्वीप्रमाणेच काम करत आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये मंगळवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला होता. याबाबत काही युजर्सनी तक्रार केल्यानंतर रात्री उशीरा साडे अकराच्या सुमारास, ‘आमची टीम समस्या दूर करत असून लवकरच अ‍ॅप पूर्ववत होईल’ अशाप्रकारची माहिती आरोग्य सेतूकडून ट्विटरद्वारे देण्यात आली होती. नंतर रात्री साडेबाराच्या सुमारास हे अ‍ॅप पूर्ववत झाले.


काय आहे आरोग्य सेतू अ‍ॅप:-
आरोग्य सेतू अ‍ॅप करोना व्हायरसच्या धोक्यापासून युजरला अलर्ट करतं. हे अ‍ॅप संपर्क ट्रेसिंगद्वारे आणि युजर्सच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे त्याच्याभोवती करोनाग्रस्त असेल तर त्याची माहिती देतं. याशिवाय या साथीच्या आजाराशी संबंधित बरीच महत्वाची माहितीही दिली जाते. करोना संसर्गापासून बचाव आणि लक्षणांचीही माहिती मिळते. आरोग्य सेतू अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.