पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० ऑगस्टच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये भारतीय कंपन्यांनी निर्माण केलेल्या अ‍ॅप्सचे कौतुक केलं. मोदींनी यावेळी अनेक अ‍ॅप्सच्या नावांचा उल्लेख केला. मोदींनी केलेल्या या कौतुकामुळेच गुगल प्ले स्टोअरवर अवघ्या दोन दिवसांमध्ये हे अ‍ॅप्स वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आलेत. सोशल या कॅटेगरीमध्ये गुगल प्ले स्टोअरवरील टॉप दहा अ‍ॅपमध्ये जोश, स्नॅपचॅट, मोज, रोपोसो आणि चिंधिगिरी या अ‍ॅप्सचा समावेश आहे. तर शिक्षण या कॅटेगरीमधील लोकप्रिय अ‍ॅप्सच्या यादीमध्ये एपी सरकार सेवा, दृष्टी, सरळडेटा, व्हूट किड्स, पंजाबएज्यूकेअर, डाउटनट, कुटूकी कीट्स या अ‍ॅप्सची चलती आहे. त्याचप्रमाणे आरोग्यविषय अ‍ॅप्सच्या यादीमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅपबरोबरच भारतीय बनवटीची स्टेपसेटगो, होम वर्कआऊट, लूज वेट अ‍ॅप फॉर मेन, इन्क्रीज हाइट वर्कआऊट, सिक्स पॅक्स इन ३० डेज ही अ‍ॅप्स असल्याचे दिसून येत आहे.

३० ऑगस्टच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांनी भारतीय बनवटीच्या अ‍ॅप्सला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केलं होतं. या माध्यमातून केवळ आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ मिळणार आहे. या अ‍ॅप्सला प्रोत्साहन दिल्यास ही अ‍ॅप्स सध्या लोकप्रिय असणाऱ्या मात्र परदेशी कंपन्यांच्या मालकीची असल्याने वापरासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अ‍ॅप्सला टक्कर देऊ शकतील का याचीही चाचपणी करता येईल, असं मोदी म्हणाले होते. यावेळी मोदींनी भारतीय अ‍ॅप निर्मिती करणाऱ्या कूकू, स्टेपसेट गो, झोहो, चिंधिगिरी, कुटूकी, एफटीसी टॅलेंट यासारख्या कंपन्यांचे कौतुक केलं होतं.

आत्मनिर्भर अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेमध्ये देशभरातून आलेल्या सात हजार अर्जांपैकी सर्वोत्तम अ‍ॅप्स निवडण्यात आली आहे. ही सर्व अ‍ॅप्स वेगवेगळ्या कॅटेगरीमधील आहेत. यामध्ये प्रमुख्याने गेमिंग, मनोरंजन, व्यापार, वापर (युटीलिटी), सोशल मिडिया आणि आरोग्यसंदर्भातील अ‍ॅप्स या कॅटेगरींचा समावेश आहे. “या महिन्याच्या सुरुवातील देशातील तरुणाईला अ‍ॅप इनोव्हेश चॅलेंज देण्यात आलं होतं. आपल्या देशातील तरुणाईने या आत्मनिर्भर अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये जवळजवळ सात हजार अ‍ॅप्सच्या माध्यमातून निर्मात्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे त्यापैकी दोन-तृतीयांश अ‍ॅप्स हे देशातील टू आणि थ्री टायर शहरांमधील तरुणांनी बनवले होते,” असं सांगत मोदींनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अ‍ॅप निर्मात्यांचे अभिनंदन केलं.

“पुढील गुगल, फेसबुक आणि ट्विटर भारतामध्ये निर्माण होईल. या सर्व लोकप्रिय साईट्सला भारतीय पर्याय उपलब्ध करुन देण्याचा आमचा हेतू आहे,” असं मत या स्पर्धेशी संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे. भारतीय तरुणांनी तयार केलेल्या अ‍ॅप्सला जागतिक पातळीवर मान्यता मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.