एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी नुकताच एक नवा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० मेसेजची सुविधा मिळणार आहे. याबरोबरच ग्राहकांना या प्लॅनमध्ये रोज १.२५ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांना महिन्याला एकूण ३५ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची किंमत १९५ असून देशातील ठराविक राज्यातच हा प्लॅन लागू होणार आहे. सध्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आणि इतर काही ठिकाणी हा प्लॅन लागू होणार आहे. मात्र दिल्लीमध्ये हा प्लॅन लागू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

रिलायन्स जिओ बाजारात आल्यापासून सर्वच स्पर्धक कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे एअरटेलचा हा नवीन प्लॅन आहे. याआधी कंपनीने १६८ रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, मोफत मेसेज आणि १ जीबी डेटा मिळत होता. या प्लॅनची व्हॅलिडीटीही २८ दिवसांची होती. म्हणजेच ग्राहकांना एकूण २८ जीबी डेटा आणि २८०० मेसेज या प्लॅनमध्ये मिळत होते. मात्र आताच्या प्लॅनमध्ये थोडीशी किंमत वाढवून इंटरनेट डेटाही जास्त दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत जास्त सुविधा मिळत आहेत.