आंबा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अशी या फळाची जादू आहे. सध्या त्याचा सिझनदेखील सुरू आहे. ‘नाच रे मोरा…’, ‘आंबा पिकतो…’ अशा अनेक रचनांमध्ये, तसेच धर्म कार्यात, सणासुदीलादेखील आंब्याचे महत्व दिसून येते. फळांच्या या राजाचं आणि कोकणाच अतूट नात आहे. त्याच्या अनेक प्रजातींपैकी हापूस तर सर्वोत्तम. हापूसच्या माधुर्याला तोड नाही. कोकणातील सिंधुदुर्ग, देवगड भागातील हापूस उत्तम दर्जाचा मानला जातो. आंबा म्हटल की ओघानेच कोकणाचा उल्लेख येतो, असे असले तरी कोकणात पिकणाऱ्या या हापूसचे पोर्तुगालशी कनेक्शन आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना.

‘अफोन्सो दे अल्बुक्वेरक्वे’ Afonso de Albuquerque या पोर्तुगीज व्यक्तीने आंब्याच्या हापूस या प्रजातीचा शोध लावला. आत्तार्यंत तुम्हाला समजलेच असेल की, हापूसला इंग्रजीत ‘अल्फान्सो’ का म्हणतात. पोर्तुगीज नावाचा इंग्रजांनी अपभ्रंश केला आणि ‘अफोन्सो’चे ‘अल्फान्सो’ झाले.

अफोन्सो विषयी सांगायचे झाले तर, ही कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती. पोर्तुगीजाच्या अंमलाखालील भारताचा तो दुसरा गव्हर्नर होता. या पराक्रमी आणि धाडसी दर्यावर्दीने पोर्तुगीजांना अनेक लढाया जिंकून दिल्या. त्याने गोवा, मलक्का, इथिओपिया, मस्कत, पर्शियन आखातातील बरेच प्रदेश पोर्तुगीज अंमला खाली आणले होते. १५१० मध्ये त्याने गोवा काबीज केले होते. आजुबाजुने होणाऱ्या सततच्या हल्ल्यांनंतरदेखील गोवा हे पोर्तुगीजांचे भारतातील सत्तेचे केंद्रस्थान होते. अफोन्सोने भारतातील मुख्य व्यापारी बंदर म्हणून गोव्याचा वापर केला. त्याने गोव्यातच पोर्तुगीज आरमाराचा कायमस्वरुपी तळ उभारला होता. पोर्तुगालने त्याला ‘ड्युक ऑफ गोवा’ हा सन्मान बहाल केला होता. आयुष्याचा शेवटचा पाच वर्षाचा काळ त्याने प्रशासकीय कारभार पाहाण्यात घालवीला. भारतातील वास्तव्यात  त्याने आंब्याच्या झाडाचे कलम करून हापूस या प्रसिध्द प्रजातीचा शोध लावला.

सुमधुर आणि रसाळ हापूसने लोकांना मोहीत केले. हळूहळू हापूस प्रसिध्द होऊ लागला आणि त्याचा प्रवासदेखील सुरू झाला. गोव्याची हवा मानवलेल्या हापूसला कोकणातील प्रामुख्याने सिंधुदुर्ग, देवगड येथील हवा, पाणी आणि माती जास्त भावली. त्याची गोडी, आकार आणि सुवास कोकणाच्या मातीत जास्त बहरला. कोकणासाठी वरदान ठरलेल्या आणि जगभरातील खाद्यप्रेमींना नादावलेल्या हापूसची ही कूळ कथा.