शारीरिक किंवा मानिसकरित्या तुम्ही जास्त थकला असाल तर तुम्हाला सातत्याने अकार्यक्षमता जाणवते. अशावेळी झोपेतून उठल्यावर किंवा दिवसातील कोणत्याही वेळेस अशी व्यक्ती थकलेली दिसते. अशा व्यक्तींना अस्वस्थता आणि एकप्रकारची गुंगी आल्यासारखे जाणवते. अशक्तपणा आणि जास्त दमल्यामुळे थकवा येतो. अनेकदा हा थकवा तुमच्या जीवनशैलीशी निगडीत असतो. दिर्घकाळ काम करणे, जेवण टाळणे, अतिश्रम आणि कमी झोप ही थकवा येण्याची काही मुख्य कारणे आहेत. मात्र हा थकवा जाण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यास नक्कीच फायदा होतो. पलक अग्रवाल यांनी दिलेल्या या काही खास टिप्स…

दही

शरीरातील एकदम कमी झालेली शक्ती पुन्हा मिळविण्यासाठी दही खाणे अतिशय फायदेशीर ठरु शकते. दह्यात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. याशिवाय दह्यातील प्रोबायोटिक्सच्या पुरेशा प्रमाणामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला थकवा आल्यासारखे वाटल्यास एक बाऊल दही खा.

केळी

केळ्यामध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराची गेलेली शक्ती पुन्हा मिळविण्यास त्याचा फायदा होतो. केळी कोणत्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध होण्यासारखे फळ आहे. याशिवाय यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. हे सर्व घटक थकवा दूर होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

अंडी चांगली राहण्यासाठी ‘हे’ करा

ग्रीन टी

‘ग्रीन टी’मध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटसमुळे तो प्यायल्यावर आपल्याला तरतरी आल्यासारखे वाटते. ‘ग्रीन टी’मधील पॉलिफिनोल्समुळे ताण दूर होण्यास तसेच मानसिक स्थैर्य येण्यास मदत होते. ‘ग्रीन टी’ आरोग्यासाठीही चांगला असतो. त्यामुळे ज्यांना वारंवार थकवा आल्यासारखे वाटते त्यांनी ‘ग्रीन टी’चे अवश्य सेवन करावे.

लाल सिमला मिर्ची

शरीरात व्हीटॅमिन सीची कमतरता असल्यास थकवा येऊ शकतो. लाल सिमला मिर्चीमधून जास्त प्रमाणात व्हीटॅमिन सी मिळत असल्याने त्यांचा आहारातील समावेश फायदेशीर असतो. शक्ती वाढविण्यासाठी या भाजीचा आहारात जरुर समावेश करा.

पालक

पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पालेभाज्या उपयुक्त ठरतात. पालकामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असते. तसेच शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरविण्याचे काम पालक करतो. पालकाच्या सेवनाने शरीरातील शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे पालक सूप, पालक पराठा, पालक भाजी यांचा आहारात समावेश करावा.

…या सुकामेव्यामुळे वजन घटण्यास मदत