जगातील आघाडीची इ-कॉमर्स कंपनी Amazon लवकरच भारतात आपली Electric delivery rickshaw (इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा) उतरवण्याच्या तयारीत आहे. २०२५ पर्यंत भारतीय रस्त्यांवर १० हजार, तर २०३० पर्यंत जगभरात एक लाख इ-रिक्षा धावताना दिसतील असं लक्ष्य कंपनीनं ठेवलंय. या इलेक्ट्रिक रिक्षांचा वापर कंपनीकडून भारतात प्रोडक्ट्स डिलिव्हरीसाठी म्हणजेच वस्तू घरोघरी पोहोचवण्यासाठी केला जाईल.

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी सोमवारी याबाबत एक ट्विट करुन घोषणा केली. भारतात शून्य कार्बन उत्सर्जन करणारी इ-रिक्षा येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘हे, इंडिया! आम्ही इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षाच्या रुपात एक नवे उत्पादन घेऊन येत आहोत. “ही रिक्षा पूर्णतः इलेक्ट्रिक असून शून्य कार्बनचं उत्सर्जन करते”, असं ट्विट बेझॉस यांनी केलं. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ClimatePledge’ हा हॅशटॅगही वापरलाय. यासोबतच एक व्हिडिओही त्यांनी शेअर केला असून त्यात बेझोस आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा चालवताना दिसत आहेत.

आणखी वाचा – …म्हणून Amazon च्या सीईओंनी चालवली इ-रिक्षा

गेल्या आठवड्यातच बेझॉस आपल्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी भारतातील छोट्या आणि मध्यम उद्योजकांना डिजिटल करण्यासाठी एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. तसेच, २०२५ पर्यंत ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील १० अब्ज डॉलरच्या वस्तूंची अ‍ॅमेझॉन निर्यात करेल, अशी घोषणाही बेझॉस यांनी केली होती. भारत दौऱ्याच्या अखेरीस “जेव्हा जेव्हा मी भारतात येतो तेव्हा मी नव्याने भारताच्या प्रेमात पडतो. अफाट ऊर्जा, संशोधक वृत्ती आणि हिंमत मला प्रेरणा देते,” अशा आशयाचं एक खास पत्रही त्यांनी भारतीयांसाठी लिहिलं होतं.