आजकाल प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन दिसतो. ऑनलाइन सुविधांमुळे अनेक कामं काही मिनिटांमध्येच होतात. गुगल प्ले स्टोअरवरून अनेक सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करता येतात. परंतु आता अॅड्रॉईड यूझर्सना एक धोक्याची सूचना आहे. प्ले स्टोअरवरून असं एक सॉफ्टवेअर समोर आलंय जे तुमच्या मोबाईलमध्ये असलं तर तुमचं बँक खातंच रिकामं होईल. सेक्युअर डी टीमकडून याबाबत एक सर्व्हे करण्यात आला. याध्ये ‘ai.type’ अशा नावाचं एक अॅप सापडलं आहे. हे अॅप जर मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला कळण्यापूर्वीच तुमच्या खात्यातून पैसे जातील.

‘ai.type’ हे अॅप युझरच्या परवानगीशिवाय प्रमिअम डिजिटल सर्व्हिस खरेदी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच याद्वारे प्रिमिअम डिजिटल कंटेंट खरेदी केल्याचं युझरलाही समजत नाही. मॅशबेल इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. हे अॅप मोबाईलच्या बॅकग्राऊंडला काम करतं. तसंच युझरच्या माहितीशिवाय यामध्ये खोट्या जाहीरातीही दाखवल्या जातात. त्यातच अॅपद्वारे डिजिटल खरेदी करून युझरच्या खात्यातून पैसे भरले जातात, असं सेक्युअर डी टीमकडून सांगण्यात आलं आहे.

आतापर्यंत ४ कोटी मोबाईल युझर्सनं हे अॅप डाऊनलोड केलं आहे. इस्त्रायलमधील कंपनी ai.type LTD ने ते तयार केलं असून त्याचं डिस्क्रिप्शन Free Emoji keyboard असं दिलं आहे. आतापर्यंत या अॅपद्वारे युझर्सची १२७ कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. सध्या १३ देशांमध्ये हे अॅप युझर्सकडून वापरण्यात येत आहे. सध्या हे अॅप अनइंन्स्टॉल करण्यासाठी सांगण्यात आलं आहे.