कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने कर्करोगाचे निदान मानवी पातळीवरील निदानापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करता येते. फुफ्फुसाच्या कर्करोगात काही बारीक ठिपके सीटी स्कॅनमध्ये दिसत असतात, त्यांचे अवलोकन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जास्त चांगल्या प्रकारे करता येते. कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्थेने निदान ९५ टक्के अचूक होते. मानवी डोळय़ांनी निदान ६५ टक्के अचूक होते. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडाचे रॉडनी लालोंद यांनी सांगितले, की यात आमची कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली मेंदूवर आधारित आहे.

चेहरा ओळखण्याच्या सॉफ्टवेअरआधारे अलगॉरिथम यात वापरला आहे. यात किमान १००० सीटी स्कॅन वापरून सॉफ्टवेअर तयार केले असून, त्यामुळे संगणकीय आकलनातून कर्करोगाच्या गाठींचे निदान करता येते. यात संगणकाला सगळय़ा गोष्टी आधीच शिकवलेल्या असतात. सीटी स्कॅनमधील नेमका कुठला भाग बघायचा हे यात महत्त्वाचे असते.

चेतापेशी, ऊती व इतर घटक वेगळे कसे ओळखायचे व नेमकी त्यातील गाठ कुठली व ती कर्करोगकारक असल्यास कशी असते, याचे सर्व प्रशिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला दिले असल्याने रुग्णांची तपासणी जास्त अचूक पद्धतीने होते. डॉक्टरांच्या निदानापेक्षा यातील अचूकता जास्त असल्याने त्याची मदत घेणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.

आगामी काळात वैद्यक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे महत्त्व हे जास्त वाढत जाणार आहे. कर्करोगाची गाठ व साधी गाठ यातील भेद ओळखणे काही वेळा मानवी पातळीवर कठीण जाते, त्यात या प्रणालीचा वापर शक्य होणार आहे.