अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क लवकरच कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून याबाबत विचार सुरू असून पुढील महिन्यापासून हे शुल्क कमी केले जाण्याची शक्यता आहे. झी बिझनेसने सुत्रांच्या आधारे याबाबतचं वृत्त दिलं आहे.

एटीएम वापराबाबतच्या सर्व शुल्कांची समीक्षा करण्यासाठी आरबीआयने एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल तयार केला असून यामध्ये अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल आरबीआयकडे सुपूर्द करेल. एटीएमचा गेल्या काही काळातील वाढलेला वापर पाहून आवश्यक त्या सर्व शुल्कांची समीक्षा करून या समितीने आपला अहवाल तयार केला आहे.

एटीएमच्या वापरासाठीचे शुल्क कमी करण्याची मागणी ग्राहकांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींसह बँकांचे अधिकारी आणि ग्राहकांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता. या समितीचा अहवाल आता तयार झाला असून पुढील महिन्यात तो सादर केल्यानंतर आठवडाभरात त्या शिफारशी अंमलात येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सध्या महिन्यातून पाच वेळा अन्य बँकांचे एटीएम विनाशुल्क वापरता येते. तर ही मर्यादा मेट्रो शहरांसाठी तीन व्यवहारांची आहे.