बजाजची पल्सर ही बाइक देशातील सर्वाधिक लोकप्रिय बाइक्सपैकी एक आहे. कंपनीने पल्सर ‘एनएस160’ ही वर्ष 2017 मध्ये लाँच केली होती. ही बाइक तरुणांच्या चांगलीच पसंतीस उतरली. ‘एनएस160’चं डिझाइन ‘एनएस200’ सोबत मिळतं जुळतं आहे. पण आता नव्या Pulsar NS 160 मध्ये कंपनीकडून ABS सिस्टीमचा सपोर्ट दिला जात आहे. लवकरच Pulsar NS 160 ABS ही बाइक कंपनी लाँच करणार आहे.

काय आहे एबीएस –
एबीएस म्हणजे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. या तंत्रज्ञानासह अपघाताच्या किंवा अडचणीच्या वेळी तातडीने ब्रेक दाबल्यास बाइक घसरत किंवा लॉक होत नाही. येत्या काही दिवसांमध्ये 125 सीसी पेक्षा अधिक क्षमता असलेल्या सर्व बाइकमध्ये एबीएस सिस्टीम जोडली जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने पल्सर 220 एफ आणि क्रुझर अॅव्हेंजर 220 या बाइक्सदेखील एबीएस सपोर्टसह लाँच केल्या होत्या.

2 ते 3 किलोग्राम वजन वाढणार –
सिंगल चॅनल ABS सिस्टीमचा सपोर्ट मिळाल्यानंतर बाइकचं वजन 2 ते 3 किलोग्राम वाढणार आहे. बजाज पल्सर NS160 मध्ये स्टील पेरिमीटर फ्रेम आणि एक बॉक्स सेक्शन स्विंगवार्म आहे. बाइकमध्ये कन्वेंशनल टेलिस्कोपिक फोर्क आणि गॅस चार्ज्ड मोनोशॉक आहे. दोन्ही टायर 17 इंचाचे असून पुढील चाकाला 240mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला 230mm डिस्क ब्रेक आहे. या बाइकमध्ये 160.3cc, एअर कुल्ड, ट्विन स्पार्क मोटर असून ऑइल कुलिंगसह येणारं हे इंजिन 8,500 आरपीएमवर 15.5 हॉर्सपावर ची ताकद आणि 6,500 आरपीएमवर 14.6 न्युटन मीटर टॉर्क जनरेट करतं.