वैद्य प्रभाकर शेंडय़े drshendye@gmail.com

वमन विरेचन नंतर बस्ति हे कर्म येते. बस्ति या उपक्रमाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बस्ति हा वातदोषावर केलेला उपचार आहे. सर्व दोष हे शरीरात वातामुळे पसरत असतात. त्यामुळे वातावर बस्तिमुळे नियंत्रण आल्यामुळे अर्धी चिकित्सा होते, असे आयुर्वेदात वर्णन आहे.

बस्ति म्हणजे काय?

बस्ति म्हणजे गुद्द्वारातून शरीरामध्ये औषधी द्रव्य तेल अथवा काढा प्रवेशित करणे. पूर्वी ही क्रिया करण्यासाठी बकऱ्याचा मूत्राशय अथवा बस्ति वापरला जायचा यामुळे या कर्माला बस्ति असे नाव पडले आहे

बस्तिचे प्रकार-  बस्तिचे दोन प्रकार आहेत. अनुवासन बस्ति व निरुह बस्ति.

बस्ति करावयाचा काळ-  वर्षांऋतूमध्ये म्हणजेच जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये वात वाढल्यामुळे या काळात बस्ति करणे उत्तम ठरते. याशिवाय रोगाच्या विशिष्ट अवस्थेमध्ये वर्षभरात केव्हाही बस्ति करता येते.

कालावधी -रोगाप्रमाणे आठ दिवस, १५ दिवस वा ३० दिवसही बस्ति करता येतो.  सर्वसाधारणपणे सलग आठ दिवसांचा बस्ति के ला जातो. यालाच योग्य बस्ति क्रम असे म्हणतात. या भागात आपण अनुवासन अथवा तेल बस्तिचा विचार करू. अनुवासन म्हणजेच स्निग्ध द्रव्य आणि जसे तेल-तूप इत्यादी द्रव्यांनी दिलेला बस्ति. सध्या सर्वसाधारणपणे ४० ते १५० मिलिपर्यंत औषधी तेल बस्तिसाठी वापरले जाते.

बस्ति विधी :  जेवण झाल्यावर वा न्याहारी झाल्यानंतर अनुवासन बस्ति दिला जातो. बाह्य़ स्नेहन व स्वेदन करून घेतले जाते आणि त्यानंतर रुग्णांना डाव्या कुशीवर झोपवले जाते. उजवा पाय पोटाच्या जवळ घेऊन डावा पाय लांब सरळ ठेवला जातो. त्यानंतर रुग्णाच्या गुद भागाला तूप लावले जाते. त्यानंतर रबर कॅथेटर अथवा बस्ति नेत्र गुदात प्रवेशित केले जाते .  यानंतर समान जोर देऊन आत तेल सोडले जाते.

बस्ति दिल्यानंतर सर्वसाधारण दीड ते दोन तासांनंतर संडासला लागण्याची भावना निर्माण होते आणि थोडे  तेल व मल बाहेर पडतो.