पालकांनो लक्ष दय़ा! मुलांच्या दंत आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास तुम्ही त्यांना अतिलठ्ठ होण्यापासुन रोखू शकता असे एका अभ्यासात मांडले आहे. वजन हा काही जणांसाठी संवेदनशील मुद्दा असून जर तुम्ही मुलांना दंत आरोग्याबाबत माहिती दिली तर तुम्ही या समस्येवर वेगळय़ा प्रकारे हाताळू शकता, असे स्वीडन येथील साहलग्रेन्स्का अकादमीतील पीएच.डी. लुईस अरविड्सन यांनी सांगितले. या अभ्यासात त्यांनी स्वीडनमधील प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळेतील २७१ मुलांच्या बॉडी मास इंडेक्स आणि दंत आरोग्याचा अभ्यास केला.

उंची, वजन आणि एका दिवसाचा आहार याची तुलना लाळेतील कॅरोजेनिक सूक्ष्मजीवाच्या प्रभावाशी करण्यात आली. ज्या मुलांमध्ये कॅरीज जिवाणूचे प्रमाण जास्त होते, त्यांच्यामध्ये बॉडी मास इंडेक्सदेखील अधिक आढळून आला.

तसेच ही मुले आहारात शर्करेचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थाचा समावेश करीत असल्याचे आढळून आले. या मुलांना दातांची योग्य काळजी घेण्याबाबत समजावणे शक्य असून स्वीडनमध्ये मुले लहान वयातच दंतचिकित्सकांची भेट घेतात. त्याचप्रमाणे शाळेत देखील दंतआरोग्याबाबत मुलांना माहिती देण्याची गरज आहे. असे अरविड्सन यांनी सांगितले.

जी मुले आहारात फळे, भाज्या आठवडय़ातून दोन ते तीन वेळा मासे यांचा समावेश करतात आणि शर्करा आणि मेदयुक्त पदार्थ टाळतात त्यांचे मानसिक आरोग्यदेखील चांगले राहत असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.