News Flash

फॅशनबाजार : क्रेझी तरुणाईचा लावण्यालंकार – भिकबाळी

मुंबई, नाशिक, सातारा इथेही भिकबाळीला तरुणांची पसंती मिळते आहे.

कॅज्युअल शर्ट, जीन्स, हातात भारी मोबाईल आणि कानात भिकबाळी असं चित्र गणेशोत्सवाच्या काळात हमखास पाहायला मिळतं. भिकबाळी हा पारंपरिक दागिना आता ट्रेंडी आणि यंग लूकच्या पंक्तीत येऊन बसलाय. पुणेरी तरुणाईचा तर हा खास दागिना आहे. भिकबाळी घातलेले तरुण पुण्याचेच असू शकतात, असाही पुण्याबाहेरील लोकांचा एक समज आहे. अर्थात भिकबाळीचं हे लोण केवळ पुण्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. मुंबई, नाशिक, सातारा इथेही भिकबाळीला तरुणांची पसंती मिळते आहे. गणेशोत्सव काळात कुर्ता, पायजमा, मोजडी किंवा एखादी कोल्हापुरी चप्पल या साजश्रृंगारात भिकबाळीची भर पडते आणि पाहणाऱ्यांच्या नजरा आपोआपच त्या व्यक्तीवर खिळतात.

भिकबाळीची परंपरा

कितीही दागिने घातले, तरी नाकात सुंदर, मोत्यांची ठसठशीत नथ जशी स्त्री सौंदर्याला शोभा आणते, तशीच दोन टप्पोरे मोती आणि मध्ये माणिक असलेली भिकबाळी पुरुषांचं सौंदर्य खुलवते. भिकबाळीला पेशवेकालीन परंपरा असल्याचे मानतात. पेशवेकाळात बुद्धिमत्ता, कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर वस्त्रे, पगडी देऊन जेव्हा एखाद्याचा सन्मान केला जाई, त्यावेळी भिकबाळी दिली जात असे. भिकबाळी ही स्वतहून घालण्याची पद्धत नव्हती, ती सन्मानाने प्रदान करण्याची गोष्ट होती, अशा काही गोष्टी भिकबाळीबद्दल सांगितल्या जातात. भिकबाळी ही उजव्या कानाच्या वरच्या बाजूला घातली जाते. अर्थात भिकबाळीमुळे आता बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व सिद्ध होत नसले, तरी तुम्ही ट्रेंडी आहात की नाही हे मात्र नक्की सिद्ध होते.

हटके लुक

भिकबाळी हा दागिना खरा सोन्याचाच. सोन्याच्या तारेत मोती, माणिक किंवा मोती पोवळे गुंफून भिगबाळी तयार केली जाते. मात्र आता सोन्याबरोबरच, चांदीची किंवा खोटी भिगबाळीहीसुद्धा आता तयार करून मिळते. मोती आणि माणका ऐवजी रुद्राक्ष किंवा चांदीचे कोरीव मणी (बिड्स), ‘टायगर आय’ सारखे दगड, लाकडी मणी हे देखील भिकबाळीसाठी वापरले जातात. चांदीच्या तारेतील या भिकबाळीही हटके लुक देऊ शकतात. मुद्दाम भिकबाळी घालण्यासाठी कान टोचून घेणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी चापाच्या भिकबाळीचा पर्यायही उपलब्ध आहे. पुरुषांचा दागिना म्हणून मानली जाणारी भिकबाळी आता मुलींच्या कानातही दिसू लागली आहे. मुलींसाठी कानात वरच्या बाजूला घालण्याचा दागिना म्हणजे बुगडी. ही बुगडीही सध्या ट्रेंडमध्ये आहे. बुगडी आणि त्याखाली भिकबाळी हा पर्यायही वेगळा लुक देऊ शकतो. सराफ दुकानांमध्ये भिकबाळीची डिझाईन्स तयारच पाहायला मिळतात. छोटी, मध्यम, मोठी अशी हव्या त्या आकारत भिकबाळी मिळू शकते. साधारणपणे पाचशे रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत भिकबाळी मिळते. अ‍ॅमेझॉन, स्नॅपडिल, इ-बे या संकेतस्थळांवरही भिकबाळीची विक्री होत आहे.

कोणी म्हणतात भिकबाळी घातल्यामुळे हाíनया टाळता येतो, कोणी म्हणतो यामुळे पोट व्यवस्थित राहते, भिकबाळीबद्दल असे अनेक समज समाजात आहेत. त्यांच्या खरे-खोटेपणाबाबत नक्की सांगता येणार नाही, मात्र एक गोष्टी नक्की ही भिकबाळी हटके लुक देते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2016 3:23 am

Web Title: bhikbali fashion
Next Stories
1 बालकांमधील कर्करोगाबद्दल जनजागृतीची मोहीम
2 ‘ग्रीन टी’मुळे धमन्यांचे कार्य सुरळीत
3 मधुमेही व्यक्तींची इंजेक्शनमधून मुक्तता
Just Now!
X