News Flash

काळ्या आजाराच्या उच्चाटनासाठी देशभर मोहीम

जिल्ह्य़ांमधून या रोगाच्या उच्चाटनाचे लक्ष्य साध्य करण्याकरिता आक्रमक मोहीम राबवावी

| April 11, 2016 01:34 am

देशभरात ‘काळा आजारा’चा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ांमधून या रोगाच्या उच्चाटनाचे लक्ष्य साध्य करण्याकरिता आक्रमक मोहीम राबवावी, असे आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. कुष्ठरोगाची प्रकरणे शोधून काढण्यासाठी ५० जिल्ह्य़ांमध्ये सुरू असलेल्या मोहिमेचा १६३ जिल्ह्य़ांमध्ये विस्तार केला जाईल असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
कुष्ठरोग आणि काळा आजार यांचा एका बैठकीत आढावा घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली जाईल. ही समिती कुष्ठरोगांचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव असलेल्या राज्यांमध्ये मायकोबॅक्टेरियम इंडियन प्रानी (एमआयपी) ही लस सुरू करण्याची शिफारस करेल.
काळ्या आजाराचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्य़ांमधून हा रोग संपवण्यासाठीची मोहीम आणखी आक्रमकपणे राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मंत्रालयाने राज्यांसोबत समन्वयाने काम करून येत्या तीन महिन्यांत राज्यांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे.
बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तर प्रदेशचा पूर्वेकडील भाग यांसारख्या प्रभावित राज्यांमधून काळ्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आतापर्यंत झालेल्या प्रगतीची नड्डा यांना यावेळी माहिती देण्यात आली. कृत्रिम पायरेथ्रॉईड स्प्रेची उपलब्धता, स्टरअप पंप्स चालवण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता, जनजागृती मोहीम व इतर उपायांचा यात समावेश होता.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा घेताना या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची आरोग्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. कुष्ठरोगांची नवी प्रकरणे शोधून काढण्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा, महाराष्ट्र, झारखंड व छत्तीसगड या राज्यांमधील ५० अतिप्रादुर्भावग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये घरोघरी जाऊन शोध घेण्याची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून ६० हजारांहून अधिक प्रकरणे शोधण्यात आली असून, रुग्णांचा मागोवा घेण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या ऑनलाइन सॉफ्टवेअरमुळे या प्रकरणांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2016 1:34 am

Web Title: black disease
Next Stories
1 हृदयरोग, मधुमेह यांवरील भारताचा खर्च वाढणार
2 मुंबई शॉपिंग फेस्टिवलमध्ये ‘ती फुलराणी’
3 फॅशनबाजार : जुन्या दागिन्यांचा नवा साज ‘टेंपल ज्वेलरी’
Just Now!
X