रात्रपाळीत काम करण्याचा व महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा संबंध नसल्याचे संशोधनात दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००७ मध्ये असे म्हटले होते, की रात्रपाळीमुळे शरीराचे घडय़ाळ बदलते व त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रीसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने आता असे म्हटले आहे, की रात्रपाळीमुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो ही गोष्ट काही प्राण्यांवर आधारित प्रयोगाच्या आधारे म्हटली होती. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने म्हटले आहे, की आम्ही या निष्कर्षांचा अभ्यास केला असता तसे काहीही आढळून आले नाही. यात १४ लाख स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. त्याचे एकूण दहा संशोधन प्रकल्प आखण्यात आले होते. त्यातील तीन अभ्यासांचा संयुक्त निष्कर्ष ८ लाख स्त्रियांचा अभ्यास करून काढण्यात आला. मिलियन विमेन स्टडी, एपिक-ऑक्सफर्ड व यूके बायोबँक कोहोर्ट यांनी अमेरिका, चीन, स्वीडन व नेदरलँड्समधील अभ्यासातील माहिती पाहून हे निष्कर्ष काढले आहेत. ज्यांनी रात्रपाळी केलेली नाही त्यांच्या तुलनेत २० किंवा ३० वर्षे रात्रपाळी केलेल्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची जोखीम तेवढीच कमी असते. ब्रिटनमधील तीन व एकू ण दहा संशोधन प्रकल्पांत हेच दिसून आले आहे, असे ऑक्स्फर्डचे वैज्ञानिक रूथ ट्रॅव्हिस यांनी म्हटले आहे. रात्रपाळी करणे किंवा न करणे याच्याशी कर्करोगाचा संबंध असत नाही. रात्रपाळीमुळे असलेली जोखीम ०.९९ टक्के, तर २० ते ३० वर्षांच्या रात्रपाळीत १.१ टक्के जोखीम असते. त्यापुढे ही जोखीम एक टक्का असते. ते प्रमाण नगण्य आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)