भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) प्रीपेड ग्राहकांना दणका देणारा निर्णय घेतलाय. BSNL ने अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता अनलिमिटेड कॉलिंगऐवजी दररोज केवळ 250 मिनिटं कॉलिंग करता येईल.

गेल्या काही महिन्यांमध्ये जिओ, एअरटेलसारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांसोबत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवे प्लान जारी करुन ग्राहक संख्या वाढवण्याचा कंपनीने प्रयत्न केला. पण आता कंपनीने एक पाऊल मागे घेतलंय. सुरूवातीला कंपनीने अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असणारे प्लॅन्स आणले होते. मात्र, ‘टेलीकॉमटॉक’ने दिलेल्या वृत्तानुसार, BSNL ने अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, ज्या ग्राहकांकडे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असलेले प्लान्स आहेत त्या ग्राहकांना दररोज केवळ 250 मिनिटं किंवा 4 तास 10 मिनिट मोफत कॉलिंग करता येईल. त्यानंतर ग्राहकांना 1 पैसे प्रति सेकंद प्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. हे नियम सध्या काही खास प्लान्सवर लागू झाले आहेत, पण लवकरच सर्व प्रीपेड प्लान्सवर हे नियम लागू होणार आहेत. सध्या 186 रुपये, 429 रुपये, 666 रुपये आणि 1 हजार 699 रुपयांच्या प्री-पेड प्लानचा यात समावेश आहे.

गेल्या काही काळापासून बीएसएनएल कंपनी तोट्यात आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यातही कंपनी असमर्थ ठरलीये. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने आता अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.