News Flash

कॅल्शियम कार्बाइडयुक्त फळे खा आणि विविध रोग ओढवून घ्या

सध्या फळांचा राजा आंबा याचे बाजारपेठेत राज्य आहे. तो सर्वत्र मोठय़ा प्रमाणात दिसत आहे, पण तो खरोखरच नैसर्गिकरित्या प्रक्रिया करून पिकविला गेला आहे

| May 21, 2014 11:47 am

सध्या फळांचा राजा आंबा याचे बाजारपेठेत राज्य आहे. तो सर्वत्र मोठय़ा प्रमाणात दिसत आहे, पण तो खरोखरच नैसर्गिकरित्या प्रक्रिया करून पिकविला गेला आहे काय, याकडे ग्राहकांचे दुर्लक्ष असते. हीच बाब व्यापारी व इतर घटकांना फायद्याची ठरते. मात्र, त्यामुळे विषाक्त फळे खाणारांना विविध आजार, अगदी गंभीर आजारही होऊ शकतात, कारण ही फळे कृत्रिमरित्या पिकविली जात असून त्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा सर्रास वापर केला जात आहे.
कॅल्शियम कार्बाइडयुक्त आंबा व इतर कोणतेही फळ खाल्यास अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. त्यात कर्करोगाचाही समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांनी सांभाळूनच फळे घेतली पाहिजेत. सध्या मोठय़ा प्रमाणात व वेळेच्या आत भरपूर नफा कमाविण्याची व्यापारी वृत्ती झाली आहे. अशा वेळी बाजारपेठेत माल कोठून आणणार, असा प्रश्न सामान्यांना पडत असला तरी काही व्यापाऱ्यांना तो पडत नाही. कारण, कॅल्शियम कार्बाइड नावाचे परीस द्रव्य त्यांच्या हाती विज्ञानाच्या माध्यमातून लागले आहे. बाजारात केवळ १५ ते २० रुपयात २५० ग्रॅम कॅल्शियम कार्बाइड मिळू शकते. ५० किलाा फळे पिकविण्यासाठी १०० ग्रॅम कार्बाइड पुरेसे असते. वस्तूत: फळे पिकविण्यासाठी कार्बाइडचा वापर करण्यावर बंदी आहे, पण संबंधित यंत्रणांचे लक्ष नसल्याने हे विषारी द्रव्य व्यापाऱ्यांना सहजपणे प्राप्त होते. कार्बाइडच्या वापराद्वारे पिकवण्यात आलेली फळे खाल्ल्यास विविध रोगांना आमंत्रण दिले जाते. यामुळे डोकेदुखी, आळस, झोपाळूपणा,मानसिक असंतुलन, स्मृतीभ्रंश, तसेच कर्करोगासारखे भयंकर रोग होऊ शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात येते. विज्ञान पत्रिकांमध्ये सुद्धा यांचा उल्लेख आहे.
रुग्णाला भूल (अ‍ॅनेस्थेशिया) देण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. फळे कृत्रिमपणे पिकविण्यासाठी या द्रव्याचा वापर धोकादायक ठरतो. कॅल्शियम कार्बाइडयुक्त फळे वारंवार खाल्ल्यास विषाक्त  होऊ शकतात, असे वैज्ञानिकांचे मत आहे. रासायनिक फळे वारंवार घेतल्यास पचनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अतिसार, काविळ व यकृत कमजोर होणे, असे गंभीर रोग होऊ शकतात. इतकेच नव्हे, तर कर्करोगाकडेही वाटचाल होऊ लागते व ह्रदयाचे रोग, आर्थायटीस आणि अ‍ॅलर्जी, असे अनेक प्रकारचे रोग जडू शकतात. रासायनिक पद्धतीने फळे वा भाज्या पिकविण्यास या द्रव्यांचा प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी मानवाधिकार आयोगाने केली होती, पण देशात या समस्येक डे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही म्हणूनच व्यापारी वारेमाप नफा कमावण्यासाठी खुशाल या धोकादायक पद्धतीचा वापर करीत आहेत. अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर कठोर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. कारण, यात आर्सेनिक व फॉस्फरसचे प्रमाण आढळून आले आहे. हे घटक मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. यातील अ‍ॅसेंटिलीन वायू हा कॅल्शियम कार्बाइडमधूनच उत्पन्न होतो. तो याचा उपघटक आहे. त्याने भयंकर उष्णता निर्माण होते. याचा वापर मुख्यत्वे इंधन आणि वेल्डिंगमध्ये केला जातो. या वायूत विषारी घटक असल्याने मेंदूच्या प्रणालीवर त्याचा मारक परिणाम होतो. फळांच्या डब्यात वा कॅरेटसमध्ये हे द्रव्य ठेवले जाते. त्याच्या उष्णतेने फळे निसर्गाच्या नियमापेक्षा आधीच पक्व होतात. या वायूच्या उष्णतेने आंबे व संत्रीही पिवळी अथवा नारिंगी बनतात.
शासकीय अधिकाऱ्यांकडून नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याने व्यापारी हे अर्निबधपणे फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करतात. निसर्गाने प्रत्येक फळाच्या पिकण्याची व तयार होण्याची एक वेळ अथवा कालावधी ठरविलेला आहे. म्हणूनच त्या त्या हंगामात ते ते फळ मिळते, पण आता कोणत्याही हंगामात फळे दिसतात. ही बाब अत्यंत घातक आहे. बाजारात हंगाम नसतांना जर अशी फळे आली तर हमखास समजावे की, ती कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविण्यात आली आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच नैसर्गिकरित्या पिकणाऱ्या प्रत्येक फळात फरक असतो. त्याच्या चवीतही फरक आढळून येतो, पण कृत्रिमरित्या पिकविण्यात आलेल्या फळांचा रंग अगदी एकसारखा असतो व त्याची चवही खूपशी सारखी असते. ही कृत्रिम फळे ओळखण्याचे तंत्र असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 11:47 am

Web Title: calcium carbide fruits causes several diseases
Next Stories
1 हवेतील प्रदूषक घटक शोषणारी कविता ; कला व विज्ञानाचा सुरेख संगम
2 कर्करोगास वाहनांचा धूर कारणीभूत
3 भारतात मातामृत्यूंच्या प्रमाणात घट
Just Now!
X