रक्ताची गरज असलेल्यांना सहकार्य; शेतकरी व विद्यार्थ्यांनाही सल्ला

१०४ याआरोग्यविषयक सल्ला देणाऱ्या या कॉल सेंटरवरून निराशेच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तींना समुपदेशन केले जाते असे नव्हे, तर या सेवेचा उपयोग आरोग्य सेवकांनाही होत आहे. रोज किमान २० दूरध्वनी त्यांच्या समस्यांबाबत असतात. यात औषधांचा तुटवडा, ग्रामीण रुग्णालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच रुग्णांवर डॉक्टरांकडून उपचारांबाबत होणारा विलंब याबाबत असतात.

२०१२ मध्ये हे कॉल सेंटर सुरू झाल्यापासून आतापर्यंत २४ लाख ४६ हजार कॉल्स त्यांनी स्वीकारले आहेत. जबाबदार व्यक्तींना याबाबत पत्रव्यवहार केल्यानंतर याबाबतची समस्या मार्गी लागते. उदा. दुर्गम भागात डॉक्टरांच्या उपलब्धतेचा मुद्दा तातडीने सोडवण्यात आला आहे. औषधांच्या तुटवडय़ाबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी काही कालावधी लागतो. औषध खरेदी हा मुद्दा वरिष्ठ पातळीवरचा आहे. आरोग्य सेवकांच्या प्रश्नाला तातडीने उत्तर दिले जाते असे पुण्यातील कॉल सेंटरच्या प्रमुख नीरजा बनकर यांनी स्पष्ट केले.

१०४ क्रमांकाच्या दूरध्वनीवर रक्ताची गरज असल्याचे अनेक कॉल्स येतात. त्यातील ५६ टक्के जणांना मदत केल्याचे निदर्शनास आणले. आम्हालाही यात काही समस्या येतात. रक्तदाते पाहिल्यानंतर अनेक वेळा दूरध्वनी करणारे प्रतिसाद देत नाहीत असा अनुभव येतो, असे बनकर यांनी सांगितले.

अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यास लक्षात राहात नसल्याच्या तक्रारी करतात. मानसिक आजारांबाबत रुग्णांचे नातेवाईक उपचारांच्या सुविधेबाबत विचारणा करतात. यात छळवणूक किंवा मद्याच्या आहारी गेलेली प्रकरणे जास्त असतात. अभ्यासाबाबत पालकांचा दबाव यामुळे विद्यार्थी गांगरून जातात, त्यामुळे शिक्षणविषयक मुलांचे प्रश्न जाणून त्याची कल्पना दिली जाते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यजोती सिंह यांनी स्पष्ट केले.