कॅनरा बँकेने बँकींग क्षेत्रात करीयर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बँकींग आणि फायनान्सचा पद्व्युत्तर डिप्लोमा कोर्स जाहीर केला आहे. यासाठी बँक बंगळुरूच्या मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हीसेसचे किंवा मंगळुरुच्या एनआयटीटीई एज्युकेशन इंटरनॅशनल प्रा.लि.चे सहकार्य घेणार आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना कॅनरा बँकेत प्रोबेशनरी ऑफीसर म्हणून नोकरी मिळू शकते. यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून यामध्ये चांगले मार्क मिळविणाऱ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना याचे रजिस्ट्रेशन canarabank.com या वेबसाइटवर करता येणार आहे. देशभरातील एकूण ४५० जागांसाठी हा कोर्स आणि परीक्षा असेल असेही सांगण्यात आले आहे.

ज्यांना या पदांसाठी नोंदणी करायची आह त्यांच्याकडे कोणत्यही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती तसेच अंध व दिव्यांग असणाऱ्यांना किमान ५५ टक्के मार्क असण्याची तर खुल्या गटासाठी किमान ६० टक्के मार्क असण्याची आवश्यकता आहे. यामध्ये वयाचीही अट असून २० ते ३० या वयोगटात येणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी आणि पदांसाठी नोंदणी करता येईल. या कोर्सच्या प्रवेशासाठी ऑनलाइन ऑब्जेक्टीव्ह टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतर मुलाखत आणि समूहचर्चाही घेतली जाईल. या पदासाठी २३,७०० ते ४२,००० पर्यंत पगार देण्यात येणार आहे. ३१ जानेवारी ही यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. ज्यांची निवड झाली आहे त्यांना २० फेब्रुवारीनंतर परीक्षेसाठी कॉल लेटर देण्यात येईल. ४ मार्च रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॅनरा बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा असे आवाहन बँकेने केले आहे.