करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी देशात २२ मार्चपासूनच लॉकडाउन सुरु झाला. या लॉकडाउनमध्ये सर्वच बंद असल्याने लोकांना काही महिने आपल्या आवडत्या रेस्टॉरंट, पबमध्ये जाता आले नाही. लॉकडाउन आणि त्यानंतर सुरु झालेल्या अनलॉकच्या फेजमध्ये लोकांचा खरेदी करण्याचा कल, खाण्या-पिण्याच्या सवयी आणि कुठल्या पदार्थाला त्यांची जास्त पसंती आहे, याचा स्विगीने अभ्यास केला. त्यातून खूपच रोचक माहिती समोर आली आहे.

स्विगी एक ऑन डिमांड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे. ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर खाद्यपदापर्थांपासून ते किराणामाल, जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा दिली जाते. स्विगीचे एजंटस रेस्टॉरंट, फाय स्टार हॉटेल्स आणि सुपरमार्केटसमधून त्या वस्तु कलेक्ट करुन, तुमच्या घरापर्यंत आणून देतात.

स्विगीच्या रिपोर्टनुसार, लॉकडाउन सुरु झाल्यापासून स्विगी ग्रॉसरीने आतापर्यंत ३२३ मिलियन किलो कांदे आणि ५६ मिलियन किलो केळयांची डिलिव्हरी पोहोचवली आहे.

भारतीयांनी कुठल्या पदार्थाची सर्वाधिक ऑर्डर दिली?
लॉकडाउन आणि त्यानंतर आता अनलॉकचा फेज सुरु असला तरी, अजूनही हॉटेल्स पूर्णपणे सुरु झालेली नाहीत. त्यामुळे लोकांना बाहेर जाऊन आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येत नाहीय. घरामध्ये असताना लोकांनी सर्वात जास्त ऑर्डर कुठल्या पदार्थाची केली असेल, तर तो बिर्याणी आहे.

स्विगीच्या रिपोर्टनुसार लोकांनी तब्बल ५.५ लाख बिर्याणी पार्सलची ऑर्डर दिली. त्याखालोखाल बटर नान आणि मसाला डोसा येतो. बटर नानची ३.३५ लाख तर मसाला डोसांच्या ३.३१ लाख ऑर्डर देण्यात आल्या.

मागच्या काही महिन्यात खाद्यपदार्थ, किराणामाल, औषधे, अन्य घरगुती वस्तू असे मिळून स्विगीने तब्बल चार कोटी ऑर्डरची डिलिव्हरी केली. दरदिवशी रात्री आठच्या सुमारास सरासरी ६५ हजार जेवणाच्या ऑर्डर दिल्या जायच्या. डेझर्टमध्ये स्विगीला १ लाख २९ हजार लाव्हा केकच्या ऑर्डर दिल्या गेल्या. त्याखालोखाल डेझर्टमध्ये गुलाब जाम आणि बटरस्कॉच केकचा नंबर येतो.