टेक्सास विद्यापीठाचे संशोधन
चिकुनगुनिया या रोगाच्या निदानासाठी कमी खर्चाची निदान चाचणी वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे, या रोगाचे निदान डास चावल्यानंतर दोन तासांनीही करता येते. चिकुनगुनिया या रोगाने सांधे दुखतात व त्या रोगाचे निदान अवघड असते. आता या रोगावर ज्या चाचण्या आहेत त्या खर्चीक आहेत. टेक्सास विद्यापीठातील वैद्यकीय शाखेने हे संशोधन केले असून त्यात डासामार्फत पसरणाऱ्या दुसऱ्या एका विषाणूचा वापर करण्यात आला.
इनबायोस इंटरनॅशनल या अमेरिकेतील कंपनीचाही त्या संशोधनात सहभाग आहे. पूर्वी माहिती नसलेला इयालट विषाणू हा तीन दशकांपूर्वी तो इस्रायलच्या नेगेव वाळवंटात सापडला होता, असे संस्थेचे संचालक स्कॉट विव्हर यांनी सांगितले. इयालट विषाणू हा डासांमध्ये वाढतो त्याची संख्या वाढते पण तो माणसाला धोकादायक नसतो.
या विषाणूत चिकुनगुनियाच्या विषाणूची प्रथिने टाकण्यात आली व त्यामुळे तो चिकुनगुनियाचा विषाणू आहे असे प्रतिकारशक्ती प्रणालीला वाटू लागले, त्यातून या नवीन चाचणीचा जन्म झाला आहे, असे जेसी इॅरसमस यांनी सांगितले.
सध्या ज्या चाचण्या आहेत त्यात चिकुनगुनियाचा विषाणू निष्क्रिय करून वापरला जातो, त्यामुळे आताच्या चाचण्या खर्चीक आहेत.
चिकुनगुनिया विषाणूची क्षमता यात मारलेली असते. इनबायोस इंटरनॅशनल व यूटीएमबी या संस्थांनी एलियाट विषाणूचे एक वेगळेच रूप वापरून ही निदान चाचणी शोधली आहे. ही चाचणी सुरक्षित व सोपी आहे.
या चाचणीत रक्तद्रव घेतला जातो व चाचणी संचाने त्याची तपासणी करून दोन तासांत निदान करता येते, असे विव्हर यांनी सांगितले. प्लॉस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.