मिरचीला तिखटपणा देणाऱ्या कॅपसायसिन या घटकामुळे दीर्घकाळासाठी वजन कमी करण्यात मदत होत असून चयापचय प्रिक्रियेत सुधारणा होत असल्याचे एका अभ्सासात आढळून आले आहे.

मेटाबोसिन या औषधातून दिवसभरात कॅपसायसिन शरीरात सोडले जाते. यामुळे लठ्ठपणाविरोधी उपचार केले जात असून त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे अमेरिकेतील वायोमिंग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले आहे. या औषधामुळे रक्तातील शर्करेची पातळी, कॅलेस्ट्ररॉलची पातळी, इन्सुलिनला प्रतिसाद आणि यकृताच्या रोगांच्या लक्षणांमध्ये सुधारणा होत असल्याचे आम्हाला आढळले, असे भास्करण त्यागराजन म्हणाले. मेटाबोसिनमुळे चरबीयुक्त आहाराने शरीरावर होणारे हानीकारक परिणाम उलटण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

मेदयुक्त पेशींमध्ये आढळून येणाऱ्या टीआरपीव्ही -१ या संवेदी चेतातंतूना या औषधाव्दारे लक्ष्य केले जाते. टीआरपीव्ही-१ या संवेदी चेतातंतूना उत्तेजन दिल्यामुळे मेदयुक्त पेशीतील ऊर्जा संचयीत राहण्याऐवजी जाळली जाते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. औषधाचे परिणाम दीर्घकालीन आहेत का? यामुळे कोणते दुष्परिणाम उद्भवतात का? हा संशोधकांसमोरील मुख्य प्रश्न आहे. या अभ्यासासाठी उंदरावर प्रयोग करण्यात आले होते. त्यांना आठ महिने हे औषध देण्यात आले. उपचारांनंतर कोणतेही दुष्परिणाम समोर आले नाहीत. लठ्ठपणाच्या समस्येने पीडित लोकांसाठी मेटाबोसिन हे एक प्रभावी औषध ठरू शकते, असे त्यागराजन यांनी म्हटले.

या निकालांच्या आधारावर जर लोकांनी तिखट पदार्थ खाण्यास सुरुवात केली, तर त्यांना अपेक्षित परिणाम मिळणार नाही असा इशारा संशोधकांनी दिला. तिखट पदार्थामधील बहुतांश कॅपसायसिन शरीरात शोषून घेतले जात नसल्याने हे परिणाम आढळून येणार नाहीत. त्यासाठी संशोधकांनी कॅपसायसिनमध्ये बदल केले आहेत.