अमेरिकेतील संशोधन
वयपरत्वे होणाऱ्या स्मृतिभ्रंशाच्या (अल्झायमर) आजाराला अटकाव करण्यासाठी खाण्याच्या कोकोचा अर्क उपयोगी असतो व त्यापासून बनवलेले चॉकलेट मेंदूचे आरोग्यही सुधारते, असे संशोधकांचे मत आहे. कोकोचा अर्क असलेल्या चॉकलेटमुळे मेंदूचा ऱ्हास होण्याच्या प्रक्रियेचा वेग मंदावतो याचे पुरावे आतापर्यंत मिळत नव्हते, पण आता ते सिद्ध करण्यात आले आहे. या चॉकलेटला स्मार्ट चॉकलेट असे म्हटले गेले आहे.
कोकोचा अर्क व संबंधित मिश्रणे यामुळे हा फायदा होतो. न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलमधील इकान स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. गुलियो मारियो पॅसिनेटी यांच्या मते हे चॉकलेट अभिनव असून त्यामुळे स्मृतिभ्रंशाला अटकाव होतो. वयपरत्वे स्मृतिभ्रंश जडलेल्या लोकांची संख्या जगात ४.४ कोटी इतकी आहे. कोकोच्या अर्कात पॉलिफेनॉल ही सूक्ष्म पोषके असतात ती आरोग्याला फायदेशीर असतात. त्यात मेंदूची बोधनशक्ती व मेंदूचे आरोग्य राखण्याची क्षमता असते. पॅसिनेटी यांच्या प्रयोगशाळेत कोको अर्काची मिश्रणे तयार करून काही प्रयोग प्राण्यांवर करण्यात आले त्यात हे दिसून आले. कोकोच्या अर्कामुळे मेंदूत विषकारक प्रथिनांचा संचय होत नाही. त्यामुळे मेंदूतील विशिष्ट जोडण्या शाबूत राहतात. त्यामुळे बोधनशक्ती कायम राहते.
याबाबत आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज असल्याचे पॅसिनेटी यांचे म्हणणे असून त्यांच्या मते कोको उत्पादक, घाऊक विक्रेते व जैववैद्यक शाखेतील लोकांनी मदत केली तर त्यातून आरोग्यास आणखी लाभदायक असा कोकोचा अर्क तयार करता येईल. कोकोवरील प्रक्रियेवर पॉलिफेनॉलचे प्रमाण अवलंबून असते. कोकोवरील प्रक्रियेमध्ये अनेक वेळा ९० टक्के पॉलिफेनॉल्स नष्ट होतात. त्यामुळे आपण खातो त्या चॉकलेटचा चांगला परिणाम होत नाही असे डॉ. पॅसिनेटी यांचे मत आहे. त्यासाठी कोकोचा अर्क विशिष्ट पद्धतीनेच काढावा लागतो. कोकोमधील पॉलिफेनॉलबाबचे संशोधन फार महत्त्वाचे असून त्यामुळे कोकोवरील प्रक्रियेत बदल करून त्याची जैविक परिणामक्षमता वाढवता येईल. अल्झायमर डिसीज या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.