अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने (Amazon Prime Video) स्ट्रीमिंग बिटरेट्स कमी करण्याचा निर्णय घेतलाय. करोना व्हायरसमुळे अनेक शहरे लॉकडाउन झाली असल्याने इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. युजर्स व्हिडिओ पाहण्यास पसंती देत असून व्हिडिओंची मागणी प्रचंड वाढल्याने दूरसंचार सेवा देणाऱ्या सर्वच कंपन्यांच्या नेटवर्कवर ताण येत आहे. त्यामुळे इटंरनेट स्पीड कमी झाल्याची तक्रार अनेकांकडून केली जात आहे.

अधिक बिटरेटच्या व्हिडिओ स्ट्रीमिंगमुळे नेटवर्कवर दबाव वाढतो आणि मागणी अधिक असल्यास ‘नेटवर्क जाम’ होण्याचाही धोका असतो. परिणामी, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COAI) सरकारला पत्र लिहून नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओसारख्या प्लॅटफॉर्म्सना बिटरेट कमी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. इंटरनेटवरील ‘अत्यावश्यक’ कामे तातडीने करता यावीत आणि नेटवर्कवर आलेला प्रचंड ताण कमी व्हावा यासाठी ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर, “करोना व्हायरसमुळे अनेक लोक संपूर्ण वेळ घरातच आहेत. अशात इंटरनेटच्या वाढलेल्या मागणीचा योग्य पुरवठा व्हावा या बाजूचे आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही दूरसंचार कंपन्यांचे समर्थन करतो. स्ट्रीमिंग बिटरेट्स कमी करण्यास आम्ही सुरूवात केली आहे. नेटवर्कवरील ताण कमी करण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकारी, मोबाइल सेवा आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांसोबत कामही करत आहोत”, अशी माहिती अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता अ‍ॅमेझॉन प्राइमच्या युजर्सना कमी Quality चे व्हिडिओ पाहावे लागणार आहेत.

दुसरीकडे, नेटफ्लिक्सने याबाबतच्या प्रश्नांवर उत्तर दिललेले नाही. पण, नेटफ्लिक्सने 21 मार्च रोजी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये युरोपीय संघाच्या आवाहनानंतर युरोपीय संघातील नेटवर्कवर नेटफ्लिक्सची ट्रॅफिक 25 टक्के कमी करण्यास सरुवात केल्याचं म्हटलं होतं. इटली आणि स्पेनमध्ये याची सुरूवात झाली असून संपू्र्ण युरोप आणि ब्रिटनमध्ये अमलबजावणी होईल अशी माहिती ब्लॉगद्वारे नेटफ्लिक्सने दिली होती.