– डॉ. सुरेश बिराजदार

करोना विषाणूने सध्या संपूर्ण देशाला वेठीस धरलं आहे. आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या रुग्णालयांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती एखादं आजारपण ओढावलं तरीदेखील करोनाची लागण होईल या भीतीपोटी रुग्णालयात जाणं टाळत आहे. तसंच अनेक पालक त्यांच्या लहान बाळांनादेखील लसीकरण वेळेवर देत नाहीत. अनेकांनी बाळांचं लसीकरण लांबणीवर टाकलं आहे. मात्र असं न करता आपल्या चिमुकल्यांना वेळेवर लसीकरण देणं गरजेचं आहे. निदान पाच वर्षांपर्यंत तरी हे लसीकरण सुरळीत ठेवणं गरजेचं आहे.

बाळाच्या जन्मानंतर त्याला बीसीजीची लस देतात. लहान बाळाला दमा किंवा तत्सम आजार होऊ नये म्हणून त्याला बीसीजी लस दिली जाते. त्यानंतर ३ ते ६ महिन्याच्या वयात बाळाला देवी, पोलिओ इत्यादी रोगांपासून बचाव करण्यासाठी लस देण्यात येते. या लस बाळासाठी फारच महत्त्वाच्या असतात.

करोनाचं संकट असताना लहान मुलांना लसीकरण देणं योग्य की अयोग्य?

करोना साथीच्या काळात बरचसे पालक सध्या संभ्रमात आहेत. या काळात लसीकरण करावे की नाही, कोणत्या लसी द्याव्यात? लसीकरण सुरक्षित आहे का? अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्याच्या काळात लसीकरण गरजेचे नाही, नंतर दिले तर चालेल, असेही काही डॉक्टर सांगत आहेत. परंतु हे सर्व चुकीचे आहे. लसीकरण सुरू राहणे अत्यंत म्हत्वाचे आहे. इबोलाच्या साथीनंतर गोवर, मलेरिया, टी. बी. ने सर्वांत जास्त मृत्यू झाले होते, हे विसरून चालणार नाही. पुढील काळातील गोवर, पिवळा ताप, पोलिओ, मेंदूज्वर, न्युमोनिया, गॅस्ट्रो, अशा आजारांमुळे होणाऱ्या मृत्युचं प्रमाण रोखायंच असेल तर लसीकरण सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका ओळखून किमान पहिल्या दीड वर्षांतील सर्व प्राथमिक लसी वेळेवर घेणे इष्ट राहील, असे भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने कळवले आहे.

आपल्या बाळाला लसीकरण करताना ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्या

१. लसीकरणाच्या वेळी दवाखान्यात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी खूप काळजी घेतली जावी. डॉक्टर तसेच स्टाफने सर्जिकल मास्क आणि ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे.

२. काही लस एकत्र तसेच एकाच दिवशी देता येऊ शकतात. त्याही द्याव्यात.

३. लसीकरण आणि इतर आजारी रुग्ण यांनी शक्यतो एकाच वेळी जाऊ नये. दोघांच्याही वेळा या वेगवेगळ्या असाव्यात.

४. लसीकरण करताना बाळाला ताप किंवा सर्दी, खोकला नाही ना याची खात्री करावी. असल्यास डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

५. शक्यतो आजी, आजोबांनी लसीकरणाला येणे टाळावे

६. बाळाबरोबर एकाच व्यक्तीने डॉक्टरांच्या केबिनमध्ये जावे

७. बाळ, पालक, डॉक्टर सर्वांनी मास्क घातलाच पाहिजे

८. पूर्व नियोजित वेळेनुसार लसी घ्याव्यात

९. शक्यतो डिजिटल पेमेंट करावे.

( लेखक डॉ. सुरेश बिराजदार हे खारघर येथील मदरहुड हॉस्पिटलमध्ये बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ आहेत.)